मी सुरतेला मिल मध्ये नौकरी करत होतो. तिथे आमच्या मिलची कॉलनी होती. आमच्या कॉलनीत सगळ्या जातीचे, धर्माचे लोक रहात होते. त्या काळी आमच्या कंपनीचे एक नवीन project सुरु होणार होते, त्यासाठी नवीन इमारती बांधण्याचे काम चालू होते. काम खूप मोठे होते. चार वर्षे तरी कमीत कमी चालणार होते. ह्या बांधकामाचा ठेका दुसऱ्या एका कंपनीने घेतला होता. आणि त्या कंपनीत काम करणारे २-३ इंजिनियर्स व काही ऑफिस स्टाफ ह्यांना राहण्यासाठी आमच्या कॉलनीतच जागा दिलेल्या होत्या. ह्या इंजिनियर्स पैकी एक होता ‘रशिद मिर्झा’. तो , त्याची बायको शबनम व छोटी सितारा तिघेजण आमच्या शेजारच्याच घरात राहत होते.
माझी बायको ‘रमा’ सतत काही ना काही काम करत रहायची. त्या काळी माझा पगार ही फार नव्हता. आणि जवळ आईवडील व हा मुलगा अशोक असे सगळे होते. अशोक खूप लहान होता. माझी आई बिछान्याला खिळलेली होती. वत्यामुळे रमाला ही सगळी घरची जबाबदारी सांभाळून बाहेर जाऊन नौकरी करणे शक्य नव्हते. पैशाची चणचण तर झ आम्हाला भासतच होती. रमा अतिशय हुशार आणि प्रेमळ होती. तिला लहान मुलांची अतिशय आवड होती. म्हणून तिने स्वतःची आवड व घरची जबाबदारी आणि पैशाची गरज यांचे सुंदर समीकरण तयार करून आनंदाने पाळणाघर चालविण्याचे काम चालू केले. ओळखीतील गरजू लोकांची मुले रमाच्या पाळणाघरात असायची.
राशीद मिर्झाची बायको शबनम शिकलेली होती. तिची ही मुलगी सितारा सहा महिन्याची झाल्यावर तिने नौकरी करायला सुरवात केली होती. आणि सितारा आमच्या पाळणाघरात दाखल झाली. तसे हे मिर्झा कुटुंब सुखी व आनंदी होते. सुट्टीच्या दिवशी सितारा त्यांच्याकडे असायची. अगदी शेजारचेच घर असल्यामुळे ती आमच्या घरातील सगळ्यांचे एक खेळणेच झाली होती आणि तिला पण आमच्या घरीच आवडायचे.
हा राशीद खूप महत्त्वाकांक्षी होता. त्याच्या मनात असे होते की दुसरीकडे नौकरी मिळाली तर थोडा पगार जास्त मिळेल. किंवा छोटासा धंदा करावा. तो नेहमी मोठी मोठी स्वप्न बघत असे. त्याला लवकरात लवकर श्रीमंत होण्याची इच्छा होती. मोठा बंगला, मोठी गाडी अशी त्याची स्वप्ने होती. त्यासाठी त्याची कष्ट करण्याची तयारी असायची. तो कधी कधी part-time दुसरा जॉब देखील करत असे. त्याची बायको शबनम सुद्धा पैसे मिळवण्यासाठी ओव्हरटाईम करत रहायची. आणि ह्या सगळ्या गोंधळात नवरा-बायकोचे मुलीकडे लक्ष कमीच होते. आणि आमच्या घरात आम्ही सगळेच ह्या मुलीच्या सभोवताली असल्यामुळे ती आमच्याकडे जास्त रहात होती.
तशात ह्या रशिदला दुबईवरुन नौकरीची ऑफर आली. इथल्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने पगार होता. फक्त सुरुवातीला एक वर्षासाठीच बोलावले होते. म्हणून नवरा-बायकोने असे ठरविले की शबनम सुरतलाच राहील. कारण तिची नौकरी होती. व सिताराला आमची खूपच सवय असल्यामुळे तिचा काही प्रश्न राहणार नाही. शबनमचे माहेर मुंबईला होते. ते काही फारसे लांब नव्हते. रशिद राजस्थानातील कुठल्या तरी खेड्यातला होता. परन्तु त्याचे सर्व शिक्षण ह्या भागातच झाले होते. तो शिक्षणाच्या कालावधीत सुरुवातीला कुठे नातेवाईकांकडे रहात होता. व नंतर वसतिगृहात राहून शिकला होता. त्याला एक मोठा भाऊ होता. तो ही कुठेतरी अबुधाबी वगैरें ह्याच भागात रहात होता. एकदा कधी तरी तो त्याच्याकडे आलेला मला आठवतोय. राशीदचे आईवडील तर आम्ही कधी पाहिलेच नाहीत. शबनम त्यांना सून म्हणून पसंत नव्हती. त्यामुळे ते कधी तिच्याकडे आलेच नाहीत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शबनमने सुरतमध्येच आमच्या सोबतीने रहाण्याचे नक्की केले होते. एक वर्षाचाच प्रश्न होता. एक मात्र होते सर, मिर्झा नवरा बायकोचा आमच्यावर खूप विश्वास होता.
ठरल्याप्रमाणे सगळे सुरळीत चालले होते. राशीद इथे नसल्यामुळे घरची सगळीच जबाबदारी शबनामवर आली होती. तिला ते आमच्या शेजारचे घरही सोडावे लागले होते. परन्तु तिने आमच्या घराजवळच जागा घेतली होती. हळूहळू सितारा सकाळी जी आमच्याकडे यायची ती रात्रीच तिच्या घरी जात असे. ती आमच्या घरातल्या सगळ्या चालीरीती नकळत शिकली होती. अशोकबरोबर माझ्या वडिलांजवळ बसून इसापनीती आणि पंचतंत्रातील गोष्टी ऐकायला तिला फार आवडायच्या. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी अशोक बरोबर देवाजवळ बसून सगळे श्लोक म्हणून झाले की दोघेही आजोबांच्याकडे धावत जायचे आणि नंतर त्यांच्या गोष्टी चालू व्हायच्या. रमानें जेवायला हाक मारेपर्यन्त हे चालूच असायचे. वर्षभर सगळे व्यवस्थित चालू होते. राशीद घरी व्यवस्थित पैसे वगैरे पाठवत होता. रोज त्याचा शबनमला फोन असायचा. कित्येकवेळा सितरासाठी तो आमच्या घरी फोन करत असे. काही वेळा माझ्याबरोबर किंवा रमाबरोबर देखील भरपूर बोलायचा. त्याची तिकडे ही नौकरी कायम व्हावी म्हणून धडपड चालू होती. तसा तो हुशार होता. आणि कष्टाळू देखील होता. त्यामुळे त्याच्या त्या धड्पडीचे थोडे चीज झाले होते. त्याला आणखीन दोन वर्षांसाठी काम मिळाले होते. त्या नंतर दोन वेळा शबनम सितारा त्याच्याकडे जाऊन आल्या होत्या.
काही कालावधीनंतर त्याला तिकडेच कोणीतरी अतिशय उत्तम terms वर धंद्यामध्ये भगीदारीची ऑफर दिली. ‘सोनेपे सुहागा’ त्याला तेच हवे होते. त्याने त्यावर उडी मारली. व नौकरी सोडून दिली. त्या दिवशी तो फार खुश होता. परन्तु नौकरी आणि धंद्यात खूप फरक असतो. हळूहळू तो खूप busy होत गेला. सुरवातीला नियमित येणारे त्याचे पैसे अनियमित झाले. शबनम ने विचारले की तो तिला ‘धंद्यात अजून जम बसतोय’ अशी उत्तरे द्यायचा. सितारा ही शाळेत जायला लागली होती. तिला शबनमने अशोकच्याच शाळेत घातले होते. रविवारी तिचा उर्दू शिकविणारा शिक्षक त्यांच्या घरी यायचा. त्यामुळे शबनमचा खर्च बराच वाढला होता. शबनमच्या एकटीच्या पगारावर तिला थोडे कठीण जात होते. तिचा भाऊ जावेद याने पहिले एखादे वर्ष तिला हातभार लावला. परन्तु नंतर तो मिर्झाच्या मागे लागला की शबनम आणि सिताराला तिकडेच घेऊन जा. ह्या गोष्टी नंतर त्याचे फोन येणे कमी झाले. इकडून शबनमने फोन केला तर तो घ्याचाच नाही. मग कधीतरी तिला फोन करून सांगायचा, कामात होतो म्हणून. जावेदला त्याचे हे वागणे विचित्र वाटायचे. कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे हळू हळू आम्हाला ही जाणवायला लागले होते. खूप विचार करून शेवटी जावेदने शबनम आणि सिताराला तिकडे पाठवून दिले.
ती जवळ जवळ सहा महिने तिकडे दुबईला होती. ती सांगत होती,हा घरी पंधरा पंधरा दिवस यायचाच नाही. आलातर दोन-तीन दिवस त्यांच्याबरोबर रहात असे आणि खूप विचित्रसारखा वागत असे. तिने काही विचारले कि तिला सांगायचा स्वतःचा धंदा आहे. Tour वर जातो. ही काही नोकरी नाही. एकदोन वेळा तर दोघांची भांडणे झाली. त्याने तिला रागाच्या भरात मारले. तेंव्हा शबनम ला शंका आली. तिने जावेदला तिकडे बोलावून घेतले. त्याने राशिदवर लक्ष ठेवले. जावेदच्या लक्षात आले कि राशीदने दुसरे घर मांडले आहे.
जावेद त्याच्या दोन-तीन ओळखीच्या लोकांना बरोबर घेऊन राशिदच्या ऑफिसमध्ये गेला. जावेद सांगत होता, त्याचे (राशिदचे) खूप आलिशान ऑफिस होते. त्याच्याकडे मोठी गाडी होती. जावेदला ऑफिसमध्ये पाहून रशिद थोडा गोंधळला होता. त्याने जावेदला मी घरी येतो नंतर बोलू, आत्ता खूप काम आहे वगेरे बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जावेद तीकडेच बसूनच राहिला होता. तेव्हा शेवटी राशिदने त्याला सांगितले, “हे बघ, ज्या माणसाने मला धंद्यात भागीदारी दिली आहे त्याचा एकुलत्या एका मुलीशी मी निकाह केला आहे. त्या अटीवरच त्याने मला धंद्यात भागीदारी दिली आहे. व गेल्या दीड वर्षापासून आम्ही दोघेही तिच्या वडिलांच्या बंगल्यातच राहत आहोत. व लवकरच ती प्रसूत होणार आहे.”
जावेदला हे ऐकून धक्काच बसला होता. तयाने राशिद असे काही करेल असा विचार हि केला न्हवता. त्याने पैशाच्या लोभाने दूसरा विवाह करताना शबनम व सिताराचा विचारही केला नव्हता. आणि हे सगळे सांगताना त्या लोभी माणसाला त्याची लाजही वाटत नव्हती.
घरी येऊन त्याने शबनमला सगळा प्रकार सांगितला. तो सांगत होता , हे ऐकून ती एकदम तुटूनच गेली होती. तिची इच्छा होती की राशीदला काहीतरी शिक्षा करावी पण सर, तुम्ही सांगा ही शबनम त्याला काय करणार होती? ह्या लोकांच्या मध्ये दोन-तीन लग्ने म्हणजे काहीच नाही. त्यांचा कायदा त्यांला मंजुरी देतो. शेवटी जावेद त्या दोघींना घेऊन परत मुंबईला आला. पहिले ३-४ महीने ती भावाकडे राहिली.परंतु शेवटी तिने सुरतला परत येऊन जुनीच नोकरी धरली.परत आमच्या घराजवळ भाड्याने घर घेतले. ह्या वेळेस मात्र तिने तिच्या पगारात परवडेल असे घर घेतले. सिताराला मात्र तिने जुन्याच अशोकच्या शाळेत दाखल केले होते. सिताराला आमच्याकडे ठेवायला म्हणून जेव्हा शबनम आली तेव्हा सितारा एकदम गप्प होती. ती थोडी मोठीही झाली होती. काहीतरी विचित्र घडले आहे हे तिला बहुतेक समजले असावे. एक सांगतो ठाकूरसाहेब ही सितारा लहानपणापासूनच अतिशय समंजस मुलगी आहे. पूर्वी ती आमच्याकडे पाळणाघरात म्हणून रहात होती पण ह्यानंतर मात्र ती घरचा मेम्बर म्हणून रहायला लागली होती. सकाळी ऑफिसला जाताना शबनम तिला सोडून जायची. नंतर मात्र संपूर्ण दिवस तिचे जेवणे खाणे, शाळेत जाणे, होमवर्क सगळे रमाच बघायची. अशोक तिला त्याच्याबरोबर शाळेत घेऊन जायचा आणि आणायचा. तिच्याकडे बघून रमाला खूप वाईट वाटायचे. कितीवेळा म्हणायची “ही सोन्यासारखी मुलगी कुठे ह्या घरात जन्माला आली, कधी मोठी होणार?”
रमानें हळूहळू तिच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली होती. एका बाजूला अशोक आणि एका बाजूला सितारा असे दोघांना घेऊन अभ्यासाला बसायची. आमचा अशोक अभ्यासात फारच हुशार होता. त्याच्या नादाने सितारा देखील अभ्यास करत असे. दोन वर्षे गेली. सितारा तिसऱ्या इयत्तेत गेली. खरे तर ती चौथ्या इयत्तेत गेली असती परंतु मधल्या ह्या प्रकारात त्या बिचारीचे एक वर्ष गेले. तिची तिसऱ्या इयत्तेची वार्षिक परीक्षा सुरु होती आणि नेमकी शबनमची आई खूप सिरीयस असल्याचा फोन आला होता. परत सिताराचे नुकसान होऊ नये म्हणून शबनम तिला आमच्याकडे ठेवून गेली. तिची बहुतेक अपेक्षा होती कि ती दुसऱ्या दिवशी परत येऊ शकेल. परंतु तसे झाले नाही. दुसऱ्या दिवशी तिची आई हे जग सोडून गेली. त्यामुळे तिला मुंबईलाच रहावे लागले.सिताराची परीक्षा संपल्यावर जावेदचा मुलगा तिला मुंबईला घेऊन जाण्यासाठी आला होता परंतु हि मुलगी गेलीच नाही. ती आमच्याकडेच राहिली. शबनम जवळजवळ महिनाभर मुंबईला होती. ती रोज सिताराला फोन करत होती. ही मुलगी संपूर्ण सुट्टीत आमच्याकडेच मजेत राहात होती..
Leave a Reply