नवीन लेखन...

सितारा

एक आठवडा उलटून गेला होता. हळू हळू आम्ही सगळे आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये स्थिर झालो. सिताराची आठवण येत असे परंतु आम्ही कसेतरी adjust होत होतो. श्ब्न्मच्या ऑफिसातल्या मुलीने शबनम व इब्राहिमचा निकाह झाल्याचे सांगितले आणि ती महिनाभर त्याच्याबरोबर बाहेर गेली हे देखील सांगितले.

एके दिवशी रात्री जावेदचा फोन आला, “सिताराला खूप ताप आला आहे. तिला दवाखान्यात admit केले आहे. इकडे आल्यापासून तिने नीटसे जेवणही केलेले नाही. ती शबनमची खूप आठवण काढते. मी शबनमला फोन केला पण तिने फोन बंद केला आहे. तुम्ही जाऊन एवढा निरोप देता का?” मी त्याला वास्तुस्थती सांगितली आणि ती भेटणार नाही हे ही सांगितले. तो बिचारा गप्पच झाला होता. त्याने फोन ठेऊन दिला. रमाला झोप लागलेली होती. मी तिला काही उठवले नाही. पहाटे, पहाटे परत त्याचा फोन आला, “ तुम्ही आणि रमा आंटी येऊ शकाल का? तिला रमा आंटीला बघून बरे वाटेल. आणि आंटी तिला समजावतील. तुम्ही याल का please? मी उद्या ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवतो”. आता रमा ऐकत होती आणि ऐकून खूप बेचैन झाली होती. आपण त्यांच्याकडे कसे जावे? ते योग्य आहे का? असे अनेक विचार मनात आले. परंतु इथून जातानाचा तो सिताराचा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर आला आणि कसलाही विचार न करता मी म्हणालो, “हो गाडी पाठव, आम्ही येतो”. अशीही सितारा आईबापापेक्षा आमच्याकडेच जास्त राहिली होती. त्यामुळे आम्हाला बघून ती काहीतरी खाईल असे वाटत होते.

दुसऱ्या दिवशी एक दिवसासाठी अशोकची आणि माझ्या आई बाबांची काळजी घेण्यासाठी माझ्या बहिणीला घरी बोलावले आणि आम्ही मुंबईला गेलो. जावेद आम्हाला दवाखान्यात घेऊन गेला. रमाला पाहून सितारा बिछान्यात उठूनच बसली. खूप खुश झाली होती. आठवड्याभराच्या दुखण्याने मात्र सितारा खूप अशक्त झालेली दिसत होती. आम्हाला दोघांनाच पाहून अशोक दादा आणि आजोबा कुठे आहेत म्हणून विचारायला लागली. दादाची शाळा आहे असे सांगून तिची समजूत काढली. संपूर्ण दिवस तिने रमाला तिच्यापासून दूर होऊच दिले नाही. तीच्या हाताने पोटभर जेवण केले, तसे तिला थोडे बरे वाटायला लागले. डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सांगितले. ती रात्र आम्ही जावेद्कडेच राहिलो. त्याचे घर खूप मोठे होते. आणि छान व स्वच्छ होते. त्यांनी आमची छान सरबराई केली. दुसऱ्या दिवशी आम्ही लगेचच निघणार होतो. त्या रात्री तो आणि झेलम आमच्याशी खूप उशिरापर्यंत बोलत बसले होते. सिताराने तर रात्री पण आम्हाला सोडले नाही. आमच्याजवळच झोपली होती. सकाळी उठल्यावर ती आमच्याबरोबर यायला निघाली. रडून गोंधळ घातला होता. मामा मामीने अनेक प्रकारांनी तिची समजूत घातली. मामी म्हणाली, “आता तुझी मम्मी तिथे नाही, ती तुला भेटणार नाही. मीच तुझी मम्मी आहे ना,” तशी सितारा जोरात ओरडली, “तू नाही, ही माझी मम्मी आहे.” म्हणून रमाकडे बोट दाखवत राहिली. तिने इतका हट्ट धरला की शेवटी १५ दिवसांसाठी म्हणून ती आमच्या बरोबर आमच्या घरी आली. आणि त्यानंतर सितारा कधीही परत गेलीच नाही. मामा मामिंनी तिला त्यांच्याकडे परत घेऊन जाण्यासाठी अतोनात प्रयत्न केल. परंतु सगळे व्यर्थ गेले. ही परत गेलीच नाही.

हळूहळू आम्हीही ही मुलगी देवाने आपल्याला दिलेली आहे हे मान्य केले. पुन्हा अशोकबरोबर ती शाळेत जायला लागली. सुरुवातीला आमच्या नातलगांना हे आवडले नव्हते. कित्येकांनी तुम्ही तिला तिच्या मामाकडे परत पाठवून द्या, नाहीतर ती मोठी झाल्यावर तुम्हाला त्रास होईल असा सल्लाही दिला होता. जावेदच देखील अशीच काहीशी आमच्यासारखीच अवस्था होती. त्याची परीने तो तिचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न करत होता. पण ह्या चिमुरड्या मुलीने जणू मनाशी ठाम निश्चयच करून टाकला होता. आणि ती आमच्या घरातच मोठी झाली. जावेदने आमच्या संमतीने तिला उर्दू शिकविण्यासाठी एका शिक्षकाची व्यवस्था केली. तो तिला कुराण वाचायला पण शिकविणार असे ठरले. आम्ही तिच्या ह्या शिक्षणाला कधीही कुठेही विरोध केला नाही.

पण ही मुलगी शिक्षकाजवळ बसायला तयारच नव्हती. मामाच्या घरून परत आल्यानंतर एक फरक आम्हाला प्रामुख्याने जाणवला होता तो म्हणजे, ती अशोक दादाला अजिबात सोडायला तयार होत नसे. तो शाळेचा अभ्यास करायला बसला कि ही त्याच्या बाजूला बसून राहायची. जेवताना देखील त्याच्या बरोबरच. त्यामुळे ते शिक्षक तिला उर्दू आणि कुराण शिकवायला यायचे, तेंव्हा देखील “दादा नाही शिकणार मग मी पण नाही” असा पवित्र तिने घेतला होता. तिला कुठे समजत होते की दडला शिकायचे नाही ते. तिचे तर बालमन होते. तिला आम्ही सांगणार तरी काय होतो? शेवटी रमाने अशोकला तिच्याबरोबर उर्दू आणि कुराण शिकायला बसवले.

त्या दिवशी मत्र आम्ही नवरा-बायको खूप विचित्र द्विधा मनस्थितीत अडकलो. आम्ही खूप upset झालो होतो. आपण हे काय करतोय? आपल्या मुलाला आपण कुठल्यातरी चुकीच्या मार्गावर तर ढकलत नाही ना असा एक मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला होता. तो ही तसा लहानच होता. त्याला आपण हिंदू आहोत हे साम्ज्न्यैटका तो मोठा होता परंतु अर्धवट समज असेल असे त्याचे वय होते. त्यामुळे त्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल ते आम्हाला काळातच नव्हते.

त्या दोन मुलांचे routine एकदमच वेगळे झाले होते. सकाळी शाळा, दुपारी उर्दू शिक्षक, त्यनंतर शाळेचा होमवर्क, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस आजोबांबरोबर शुभंकरोती, परवचा. एकाच घरात दोन्ही धर्म बरोबर एकमेकांचा हात धरून वाढत होते. आजही जाऊन बघा तिच्या खोलीत, नमाज अदा करण्याचा गालीचा आहे. मागच्या वर्षी अशोक काश्मीरला फिरायला गेला होता, तिच्यासाठी खास घेऊन आला आहे.

तिचे तरुणपण इतके सहज सोपे नव्हते. बालपण तर फारच विचित्र होते. ती जशी जशी मोठी होत होती तसे तसे तिला समाजाच्या चित्र विचित्र प्रश्नांना तोड द्यावे लागत होते. “हा तुझा भाऊ अशोक कोतवाल, मग तू मिर्झा कशी?” ह्या प्रश्नाने तर आजही तिचा पिच्छा पुरविला आहे. कित्येक वेळा तर ती एकटीच गप्प बसून रहायची. आमच्याकडे आमचे नातलग आले की थोडीशी बावचळल्यासारखी व्हायची. खरे तर नंतर नंतर आम्ही काय किंवा आमचे नातलग काय, ती आपली नाही हे विसरूनच गेलो होतो. आमच्या सगळ्यांसाठी ती फक्त सितारा होती. आम्ही तिला हिम्मत देत देत उभी केली.

मामा-मामीने तर तिला कधीच सोडले नाही. प्रत्येक सुट्टीत तिला घेऊन जायचे. तिच्यासाठी मामाच्या घराचा option कायमच उघडा होता. मामच्या support मुले थोडे तरी बिचारीचे आयुष्य ठीक गेले. आम्हाला सुद्धा असे होते की हिचा मामा आहे.

शबनमने काही वर्षानंतर सिताराला भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेस सितारा नवव्या किंवा दहाव्या इयत्तेत होती बहुतेक. कधी तिच्या शाळेत जायची, कधी तिच्या क्लासेसवर जायची, कधी तिच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर उभी राहायची. परंतु ह्या मुलीने “तू मला तोंड देखील दाखवू नकोस” असे स्पष्ट सांगितले होते. एक मात्र होते, जेंव्हा पण ती शबनम बरोबर वाद घालून यायची तेंव्हा ती खूप बेचैन असायची. एक दोन वेळा तरी सितारा तिच्या आईजवळ बसून खूप रडली.(सितारा रमाला आई म्हणायची आणि मला बाबा म्हणते.) रमाने तिला विचारले होते कि तुला इतके वाईट वाटते तर तू तिला भेटत का नाहीस? ह्या रमाच्या प्रश्नाला तिचे उत्तर होते “मी तिला भेटत नाही म्हणून मला वाईट वाटत नाही. असली घाणेरडी, दुष्ट बाई माझी मम्मी होती आणि मला तिचे तोंड बघावे लागते ह्याचा मला राग येतो. स्वतःच्या स्वार्थासाठी तिने मी लहान आहे, माझे काय होईल ह्याचा विचारही केला नव्हता. तिचा आता आणखीन काही स्वार्थ असेल का याची भिती वाटते, आई’. तिच्या या उत्तरानंतर आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो.

त्यानंतर मी रिटायर्डच झालो. आणि सुरत सोडून इकडे आलो. इथे आमचे घर असल्यामुळे आम्ही इथे स्थाईक झालो. सितारा ही कोलेजला जायला लागली होती. अशोकचे कोलेज एकच वर्ष शिल्लक होते त्यामुळे तो तिकडेच हॉस्टेल वर राहिला होता. इथे आल्यानंतरही शबनम आमचा पत्ता शोधत आली होती. परंतु सिताराने तिला स्पष्टच नाही म्हणून सांगितले आणि मामला कळविले होते कि तिला सांग “परत मला कधीही तोंड दाखवू नकोस.” त्या दिवशी शबनम रडवेली होऊन परत गेली ती नंतर कधीही आली नाही.

राशीदने देखील बऱ्याच वर्षानंतर तिची आमच्याकडे चौकशी केली होती आणि नंतरही करत राहिला. परंतु सीताराला भेटण्याचा किंवा तिच्याशी फोनवर बोलण्याचा त्याने प्रयत्न देखील केला नाही. तिचे लग्न ठरवा, कोणीही असो हिंदू किंवा मुस्लीम, तिच्या लग्नाचा सगळा खर्च मी करीन असे त्याने आम्हाला निक्षून सांगितले आहे. त्याच्या या वागण्यामुळे त्याला त्याची झालेली चूक कुठेतरी कळली आहे असे जाणवले.

कितीतरी वेळा लोकांनी आम्हाला, तिला दत्तक घ्या, तिचे नाव बदला असे सल्ले दिले होते. असे सल्ले ऐकणे आता आमच्या अंगवळणी पडले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..