सकाळची वेळ होती. सूर्यनारायणाचे आगमन झाले होते. हवेत थोडा गारवा होता. मॉर्निंग walk संपवून खुर्चीत विसावलो होतो. पेपर वाचत निवांत बसावे असा डोक्यात विचार चालू होता. पाहिले तर पेपेर अजून आलेच नव्हते. शेवटी त्यांची वाट बघत बसलो होतो. अलीकडे जरा थकायलाच होतं. उभे आयुष्य पळापळ करण्यात गेले, आता आराम करावा अशी खूप इच्छा होत असे. परंतु शांत बसण्याचा स्वभावच नाही माझा. थोडेफार काम केलेले बरे ह्या विचाराने काम करत राहिलो. शाळेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झालो होतो. फक्त चारच महिने काय तो आराम केला असेल. एके दिवशी माझे एक जुने स्नेही प्रभाकरपंत त्यांच्या बरोबर काही लोकांना घेऊन माझ्याकडे आले. ही सगळी मंडळी म्हणजे ‘सरस्वती विद्यालयाचे’ ट्रस्टी होते. ह्या ट्रस्टच्या शाळा ग्रामीण भागात जास्त होत्या. काही भागात कन्या विद्यालये देखील होती. “सर, आमच्याबरोबर शाळेत काम करायला आपण यावेत अशी आमचे मुख्य ट्रस्टी प्रागजी शेठ यांची इच्छा आहे, तुमच्या सारख्या अनुभवी व्यक्तीची फार गरज आहे आम्हाला”. मनहरपंत म्हणाले; ते ट्रस्टींपैकीच एक होते.
मी थोडा विचारात पडलो होतो. परन्तु ते तसा आग्रहच धरून बसले होते. असाही चार महिने घरी बसून मी कंटाळलोच होतो. त्यामुळे दिवसातले चार तास त्यांच्याबरोबर काम करायला तयार झालो होतो. त्यांनी मला ‘मुख्य सल्लागार’ म्हणून शाळेत जागा दिली. वेगळे छोटेसे ऑफीस दिले. आणि मी चार तासांसाठी शाळेत जायला सुरवात केली होती. हळूहळू कामात इतका रमलो की चार तासाचे सहा तास आणि सहा तासाचे आठ तास कधी झाले ते कळलेच नाही. त्यानंतर दोन वर्षाने अचानक माझी धर्मपत्नी मला सोडून गेली. आयुष्यात एक मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. घरात मुलगा-सून-नातवंडे असूनही मी एकाकी झालो. एकटेपणा टाळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ शाळेत राहून काम करत राहिलो. आयुष्यातली हि पोकळी कामाच्या सहाय्याने भरण्यास सुरवात केली होती. आणि आता या कामात इतका गुरफटून गेलोय की स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता.
“बाबा, तुमचे ट्रस्टी मनहरपंतांचा फोन आहे”. सुनीलच्या आवाजाने एकदम भानावर आलो. फोन हातात घेतला आणि म्हणालो; “नमस्कार मनहरपंत , आज सकाळी सकाळीच काय काम काढलत?” “विशेष असे नाही, पण आपल्याला जरा बलसाड जवळ आपली शाळा आहे ना, तिथे जावे लागणार आहे.” मनहरपंत म्हणाले.
“अचानक बलसाडला, का हो काय झाले? काही problem झाला आहे?”
“हो तसेच समजा सर, काल तिथले मुख्याध्यापिक इनामदारांचा फोन आला होता. त्यांच्याकडे काही शिक्षकांनी समस्या उभी करून ठेवली आहे. ती सोडविण्यासाठी आपल्याला लक्ष घालावे लागेल असे ते म्हणत होते. त्यांच्याकडे एक “सितारा मिर्झा” नावाची शिक्षिका आहे. तिच्या विरोधात काही शिक्षक उठले आहेत. सर, तुम्हाला तर माहीतच आहे , ह्या ग्रामीण भागात जातीयवाद, धर्मवाद, प्रांतीयवाद असले प्रकार आहेतच. त्यांच्यातलाच हा प्रकार असावा. परंतु आपल्या इनामदारांचे असे म्हणणे आहे कि ही शिक्षिका अतिशय कर्तव्यदक्ष आणि सुशील आहे. शिवाय गरजू आहे. त्यामुळे तिच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या ते विरोधात आहेत. त्यांनी तसे काही केले तर इतर शिक्षक त्यांच्या विरोधात जातील. त्यामुळे आपल्याला तिथे जाऊनच हा काय प्रकार आहे ह्यात जातीने लक्ष घालावे लागणार आहे. तसा इनमदारांचा आग्रह आहे”. मनहरपंतांनी संक्षिप्त माहिती दिली. मी म्हणालो, “ ठीक आहे, मी शाळेत येतो नंतर आपण कधी जायचे ते नक्की करूया. आणि या संदर्भात अधिक काही मिळते का ते पण बघुया.” शाळेत भेटण्याचे नक्की झाले. त्यामुळे थकवा बाजूला सारून उठलो. पेपर आला होता, तो वरवर चाळला आणि कामाला लागलो. काम करताना लक्षात आले की “सितारा” आणि “मिर्झा” हि दोनही नावे ऐकल्यासारखी वाटत होती. जरा डोक्याला त्रास दिल्यावर लक्षात आले की, मिर्झा नावाचा माझा एक विद्यार्थी होता. अनेक वर्षे शाळेत नौकरी केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची नावे लक्षात असतात, पण नक्की कुठला कोण हे सांगताना जर गोंधळायला होते. त्यातुन मी तर सरकारी शाळेत नौकरी करत होतो; दर चार-पाच वर्षांनी कुठे ना कुठे बदली होत असे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर तसे सगळे कुटुंब बरोबर घेऊन फिरत होतो. नंतर मुले वरच्या वर्गात गेल्यावर घरची सगळी मंडळी बडोद्याला शहराच्या ठिकाणी रहात होती, मी आपला ‘अन्नासाठी दाही दिशा’ तसा गावोगाव फिरत होतो. तर हा मिर्झा नक्की कुठला हे काही मला आठवेना. परन्तु हे नाव चांगले आठवणीत होते. खरे तर त्याचा इथे काही संबध असण्याचीही शक्यता नव्हती.
ब्रेकफास्ट करत असताना सहजच सुनीलला विचारले, “काय रे कोणी मिर्झा नावाची व्यक्ती, आपल्याला कुठे भेटल्याची तुझ्या आठवणीत येते का रे?” थोडासा विचार करून तो म्हणाला, ‘नाही बाबा, असे लगेच काही लक्षात येत नाही, हो काही काम आहे का? असे असेल तर शोधून काढतो”. “ नाही तसे काही नाही; बलसाड जवळच्या आमच्या एका शाळेत एक शिक्षिका आहे, तिचे नाव मिर्झा आहे. तिच्या नावावरून ह्या मिर्झा नावाची आठवण झाली. कदाचीत मला दोन-चार दिवस तिकडे जावे लागेल”. मी म्हणालो.
आम्ही आमचा ब्रेकफास्ट आटोपला आणि आपापल्या कामाला निघालो. नित्यनियमाप्रमाणे त्याने मला शाळेत सोडले व तो पुढे त्याच्या ऑफिसला निघून गेला. शाळेत आमचे मुख्य ट्रस्टी प्रागजिशेठ, प्रभाकरपन्त, मी ठाकूर व मनहरपंत सगळे मिळून त्या शाळेत काय झाले असावे ह्याच अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होतो. तातडीने निघण्याची जरुरी नसल्यामुळे इथले काम पूर्ण करून चार-पाच दिवसानंतर निघायचे ठरविले.
तशात आमचे एक ट्रस्टी आजारी पडले. त्या गडबडीत संपूर्ण आठवडा तसाच निघून गेला. शेवटी मी व ठाकूर आम्ही दोघांनी बलसाडला जाण्याचे नक्की ठरले. रात्री मी सुनीलला तसे सांगितले, “ मी उद्या चार-पाच दिवसांसाठी बलसाडला जाणार आहे. कदाचित एक दोन दिवस मुक्काम वाढू शकतो तसे मी तुला कळवीनच.”
त्याने विचारले,”बाबा, ते कोण मिर्झा त्यांची काही माहिती मिळाली का?” तो पुढे म्हणाला, “बाबा मला एक गोष्ट आठवली, बऱ्याच वर्षांपूर्वी आपण सुरतेला असताना तुम्हाला एक मिर्झा भेटायला आले होते. मला अंधुकसे आठवतंय; त्यांच्याबरोबर त्यांची एक गोरी, गोरी लहान मुलगी होती. तिचे डोळे निळे निळे होते आणि सोनेरी कुरळे केस होते. तिचे नाव मला आठवत नाही पण तिला बघून आई म्हणाली होती, काय नक्षत्रासारखी मुलगी आहे. तिचे नाव तिला अगदी शोभून दिसते आहे.” मी देखील आठवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मला इतकेच आठवले की माझा एक मिर्झा नावाचा विद्यार्थी होता आणि तो त्याच्या बायको व मुली समवेत मला भेटायला आला होता. तो आपला देश सोडून कुठेतरी आखाती देशामध्ये नौकरीसाठी जाणार होता. त्याला इथल्यापेक्षा दहापट जास्त पगाराची नौकरी तिकडे मिळाली होती. हा तसा पैशाचा लोभीच होता, त्यामुळे मी ओळखणारा मिर्झा तिकडचे सगळे सोडून इथे परत येणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्याचा ह्या मिर्झा नावाच्या शिक्षिकेबरोबर संबध लावण्याचे काही कारणच उरले नव्हते.
Leave a Reply