नवीन लेखन...

स्काय व्ह्यू

100 दिवसांनी जहाजावरून परतण्याची पहिलीच वेळ होती. तीन महिन्यांचे सेकंड इंजिनियरचे पहिले कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून जहाजावरून उतरलो होतो. तुझ्यामुळे इंजिन क्रू आंनदी तर होताच पण तू स्वतः इनीशियेटीव्ह घेऊन कामे करत असल्याने मला सुद्धा निश्चिन्त राहता येतं होते असे बोलून चीफ इंजिनियरने निरोप देताना यु आर दि फर्स्ट यंग अँड मोस्ट डायनॅमिक सेकंड इंजिनियर आय हॅव सीन एव्हर म्हणून पाठीवर कौतुकाने थोपटले होते.

जहाजावर मोबाईल सिग्नल मिळत असल्याने घरी सान्वी आणि प्रियाशी पाहिजे तेव्हा व्हिडिओ कॉल वर बोलता येत होते त्यामुळे घरी परतताना तीन महिने भुर्रकन निघून गेले.

दर शुक्रवारी जहाजावर आणि ऑइल फिल्ड मध्ये असलेल्या इतर लहान मोठ्या बोटिंवर स्थानिक इंडोनेशीयन लोकांसाठी क्रू बोट येत असते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता क्रू बोट जहाजावरुन निघून सहा मैलावर असलेल्या बेटावर वीस मिनिटात पोचली. तिथल्या गॅस पॉवर प्लांट वरील कर्मचाऱ्यांना घेऊन पाऊण वाजता निघाली आणि सव्वा तीन वाजता जकार्ता मधील जेट्टी वर पोचली.

कंपनीचा एजंट सैफुल कार घेऊन वाट बघत होता. कंपनीकडून जकार्ता मध्ये एक दिवस विश्रांती मिळावी म्हणून दुसऱ्या दिवशीचे फ्लाईट बुक करून हॉटेल स्टे अरेंज केला जातो. जहाज जॉईन करायला आलो असताना ज्या हॉटेल मध्ये मेडिकल आणि इतर फॉर्मॅलिटी पूर्ण होईपर्यंत चार दिवस ठेवले होते ते शुक्रवार असल्यामुळे फुल झाले होते. चार वाजता मिनारा पेनीनसुला हॉटेल मध्ये सोडण्यापूर्वी सैफुल ने मनी एक्सचेंजर जवळ गाडी थांबवली होती. तिथून संध्याकाळी खरेदी तीनशे डॉलर्स चेंज करून घेतले. संध्याकाळी मुलांसाठी कपडे आणि इंडोनेशियन चॉकलेट्स घेतली.

दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता श्रीलंकन एअरवेज चे जकार्ता ते कोलंबो आणि पुढे संध्याकाळी साडे नऊ वाजता कोलंबो हुन मुंबई करिता कनेक्शन फ्लाईट होते.

सकाळी अकरा वाजता सैफुलने हॉटेल वर पिक अप करून जकार्ता इंटरनॅशनल एअरपोर्टला ड्रॉप केले. चेक इन करताना नेहमी प्रमाणे विन्डो सीट साठी रिक्वेस्ट केली, कोलंबो ते मुंबई विन्डो सीट मिळाली पण कोलंबो पर्यंत आईल सीट मिळाली असल्याने थोडं नाराज व्हायला झाले. इमिग्रेशन क्लियर होऊन बोर्डिंग सुरु झाले. फ्लाईट पूर्णपणे फुल नव्हते पण विन्डो सीट रिकाम्या नव्हत्या. सगळ्यात शेवटच्या रो मध्ये दोन्ही बाजूच्या सीट रिकाम्या होत्या, त्यावर प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट आणि इयर फोन ची पाकीटं ठेवली होती.

श्रीलंकन एअरवेज च्या सावळ्या एअरहॉस्टेस साडी मध्ये वावरताना बघून एअर इंडियाच्या फ्लाईट मध्ये आल्यासारखं वाटले. शेवटचा रो वरील ब्लँकेट आणि इयर फोन वाटून झाल्यावर सीट रिकाम्या झाल्या. विमानाच्या पुश बॅक ला सुरुवात झाली नसल्याने, पाठीमागे जाणाऱ्या फ्लाईट स्टीवर्डला मागे जाऊन बसू का विचारल्यावर त्याने तोंडावर खोटं खोटं हसू आणून येस शुअर म्हणून होकार दिला.

फ्लाईट ने ऑनटाइम टेक ऑफ केले. टेक ऑफ नंतर जकार्ता शहराचे दोन अडीच मिनिटे हवाई दर्शन झाले आणि जकार्ता जवळील समुद्रातील लहान मोठी बेटे दिसू लागली. माझे जहाज जकार्ता पासून 100 km अंतरावर समुद्रात ऑइल फिल्ड मध्ये असल्याने टेक ऑफ झाल्यावर विमान त्याच दिशेने जात असल्याचा अंदाज खाली समुद्रात दिसणाऱ्या बेटांना बघून आला. काही मिनिटातच जहाज आणि शेजारील तेलविहरी सुद्धा दिसू लागल्या. निळ्याशार पाण्यात तरंगणारे जहाज आकाशातून हजारो फुटांवरून बघताना खूप आनंद झाला.

जस जसे विमान पुढे पुढे जायला लागले तस तशी आणखीन लहान मोठी बेटे आकाशातून नजरेला पडायला लागली. वातावरण स्वच्छ आणि निरभ्र असल्याने पस्तीस हजार फुटांवरून खाली स्पष्ट दिसत होते. निळ्याशार समुद्रात एक बेट गेले की दुसरे जात होते. एका पुढे एक ओळीने चार पाच बेटं त्यातील एखादे लहान एखादे मोठे. निसर्गाची अनोखी किमया आणि अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवून घेताना खूप छान वाटत होते.

लहान बेटाच्या भोवती किनाऱ्याजवळ वर्तुळाकार पांढऱ्या वाळूचा पट्टा आणि त्यापुढे गडद निळे होत जाणारे पाणी. सगळी लहान मोठी बेटे अत्यंत हिरवीगार दिसत होती. मध्येच एखादे मोठे बेट आल्यावर त्यातून वाहणाऱ्या लहान मोठ्या नद्या आणि टेकडया व डोंगरांचे चढ उतार दिसायचे.

नद्यांमध्ये पावसामुळे गढूळ झालेले पाणी आणि समुद्रात येऊन मिसळताना गढुळलेल्या त्याच पाण्याचा हलका होत जाणारा गडदपणा बघताना खूप सुंदर दिसत होता. निळ्या, हिरव्या आणि गढूळलेल्या मातीच्या रंगांच्या असंख्य छटा आकाशातून बघताना विलोभनीय वाटत होत्या. मध्येच काही बेटांवर वस्ती आणि एकमेकांना छेदणारे रस्ते आणि किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या लहान लहान होड्या समुद्रात ठिपक्या प्रमाणे दिसत होत्या.

मध्येच एक जहाज नजरेस पडले. निळ्या रंगाला चिरून पाठीमागे दोन लाटांमध्ये कोना प्रमाणे पांढरा फेस उधळीत जहाज डौलाने निघाले होते. निळ्या अथांग समुद्रात जहाजाचा लाल भडक रंग आणि त्याच्या चिमणीतून बाहेर पडणारा काळा धूर शाळेतल्या पुस्तकातील चित्राप्रमाणेच वाटला. एकाच विमान प्रवासात कितीतरी वेगवेगळया आकाराच्या बेटांचा स्काय व्ह्यू बघायला मिळाल्याने तास दीड तास कसा गेला ते कळलेच नाही.

फिकट पोपटी रंगावर निळ्या रंगांची मोरपीसाची प्रिंट असलेल्या साड्या नेसलेल्या सावळ्या आणि गहु वर्णाच्या श्रीलंकन एअर होस्टेस ड्रिंक्स सर्व्ह केल्यावर पुन्हा एकदा लंच सर्व्ह करायला आल्या. लंच मध्ये जवळपास भारतीय पद्धतीचे आणि चवीचे जेवण होते. लंच झाल्यावर लगेचच स्टीवर्ड सिलोन टी सिलोन टी करत चहा घेऊन फिरू लागला.

इंडोनेशियातील बेटे मागे पडून आता खाली फक्त निळा समुद्र दिसत होता. लंच झाल्याने सुस्ती येऊन कधी झोप लागली कळलं नाही. अडीच तीन तासाने जाग आली तर विमानाने श्रीलंकेच्या हद्दीत प्रवेश केला होता. हिरव्यागार श्रीलंकन भूभागावरून विमान चालले होते. डोंगरांवर मोठमोठी झाडे आणि डोंगरांच्या कुशीतुन वाहणाऱ्या अरुंद पात्राच्या नद्या पुढे पुढे सरकताना रुंदावत होत्या. मध्येच पाण्याचे जलाशय, काटकोनात जाणारे रस्ते, लहान मोठी गांव आणि शहरे दिसत होती. संध्याकाळ होता होता कोलंबो शहर जवळ आले आणि विमानाचे डिसेंडिंग सुरु झाले.

विमानाने संपूर्ण कोलंबो शहरा भोवती एक गिरकी मारली. शहराचा समुद्र किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांमुळे समुद्राभोवती एखादी भिंत बांधली आहे की काय असा भास झाला. कोलंबो शहर आकाशातून बघताना फार उंच बिल्डिंग दिसल्या नाहीत किंवा गजबलेपणासुद्धा जाणवला नाही. कोलंबो विमानतळावर उतरल्यावर भारतातच आल्या सारखे वाटत होते. पुढे मुंबईची फ्लाईट पकडून काही तासातच घरी पोचणार होतो. कोलंबो विमानतळ लहान असल्याने अर्ध्या तासातच सगळ्या विमानतळावर एक चक्कर मारून झाली. पुढील तीन तास निमूटपणे वाट बघून झाल्यावर मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटची बोर्डिंग अनाउन्समेंट झाली आणि रात्रीचे अंधारात उजळणारी लंका दिसेल या अपेक्षेने विमानात जाऊन बसलो.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech ), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..