सिस्टर शिप म्हणजे एकसारखे किंवा अगदी तंतोतंत साम्य असलेली जहाजे. यांची बांधणी, आकार, इंजिन, शक्ती तसेच कार्गो वाहून नेण्याची क्षमता एकसारखीच असते.
बर्फाळ प्रदेशात म्हणजे डेन्मार्क, स्वीडन,नॉर्वे, फिनलंड या भागात जेथे समुद्र सुध्दा गोठलेला असतो. अशा भागात आईस क्लास म्हणजे बर्फाला छेदून जहाजे पोर्ट पर्यंत पोहचतात. आईस क्लास जहाजांची बांधणी करत असताना त्यामध्ये विशेष काळजी घेतली जाते. जहाज बनवताना वापरले जाणारे स्टील आणि डिझाईन उच्च दर्जाचे तसेच इंजिन आणि इतर मशिनरी यांची क्षमता सुध्दा जास्त असते.
मायनस किंवा फ्रीझिंग टेम्परेचर मध्ये काम करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कधी कधी समुद्रात बर्फ एवढा टणक असतो की हे स्पेशल आईस क्लास जहाजे सुद्धा अडकून पडतात. मग त्यांना बाहेर काढण्यासाठी आईस ब्रेकर शिप बोलवावे लागतात. हे आईस ब्रेकर शिप म्हणजे खूप शक्तिशाली इंजिन असणारे लहान जहाज असते. जे बर्फाला फोडत फोडत पुढे निघतात आणि त्याच्या मागोमाग अडकलेले जहाज पुन्हा समुद्रात फुटलेला बर्फ जमा व्हायच्या आत चालू लागते.
आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.
परीक्षा दिल्यानंतर केवळ पंधरा दिवसांत जवाबदारी आल्याचे दडपण आले होते. दुसरेच जहाज असले तरी मागील जहाजापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे जहाज होते. मेन इंजिन तर इलेक्ट्रॉनिक प्रकारचे स्मार्ट इंजिन होतेच. जनरेटर पण मागील जहाजावर होते त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे होते. तसे पहिल्या पंधरा दिवसात जहाजावरील मशिनरी तसेच इतर सर्व सिस्टीम बद्दल बऱ्यापैकी माहिती झाली होती. जहाज इस्तंबूल क्रॉस करून ब्लॅक सी मधील रशियन पोर्ट वर लोड करण्यासाठी निघाले होते. टॉप्से पोर्ट मध्ये कार्गो लोड करून जहाज पुन्हा इस्तंबूल मार्गे भूमध्य समुद्रातील स्पॅनिश पोर्ट वर यायला निघाले. रात्री दीड वाजता रनिंग फुल्ल अहेड ची ब्रिजवरून सूचना इंजिन कंट्रोल रूम मध्ये दिली गेली . पण पहाटे पहाटे इंजिन फुल्ल स्पीड वरुन अचानक बंद झाले. पहाटे पहाटे केबिन मध्ये इंजिनियर कॉल अलार्म वाजला. चीफ इंजिनियर सह सगळे इंजिनियर डोळे चोळत चोळत इंजिन कंट्रोल रूम कडे पळत पळत निघाले. कंट्रोल रूम मध्ये चीफ इंजिनियर कॉम्प्युटर स्क्रीन वर सगळे अलार्म्स आणि इंजिन पॅरामीटर्स चेक करत होता. सेकंड इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल ऑफिसर बाहेर इंजिन जवळ फॉल्ट शोधत होते. मला थर्ड इंजिनियरने कूलिंग वॉटर सिस्टिम बघायला बाहेर बोलावले. इंजिन अचानक बंद झाल्यामुळे पुन्हा सुरु करण्यापूर्वी कशामुळे बंद झाले त्याचे कारण कोणालाच कळत नव्हते. कॉम्पुटर स्क्रीन वर अलार्म बघून चीफ इंजिनियरने एक अंदाज बांधला आणि इलेक्ट्रिकल ऑफिसरला आणि सगळ्या इंजिनियरना कंट्रोल रूम मध्ये बोलावले. काही दिवसांपूर्वी आमच्या सिस्टर शिपचे इंजिन सुद्धा असेच बंद पडले होते. चीफ इंजिनियर ने भराभर सगळे मेसेज वाचले आणि इंजिन कंट्रोल करणारे इलेक्ट्रॉनिक कार्ड इलेक्ट्रिकल ऑफिसरला तपासायला सांगितले. इंजिन मध्ये जवळपास बारा ते पंधरा असे कार्ड असल्याची माहिती इलेक्ट्रिकल ऑफिसर ने दिली. त्यापैकी नेमका कोणता चेक करावा कारण एक एक कार्ड चेक करायला खूप वेळ लागणार होता. चीफ इंजिनियरने चेक करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले.
जहाज किनाऱ्यापासून बरेच अंतर कापून खोल समुद्रात आले होते त्यामुळे इंजिन बंद पडल्याने कोणतीही भीती नव्हती. जर इस्तंबूल क्रॉस करत असताना जर इंजिन बंद पडले असते तर काही खरे नव्हते कारण इस्तंबूल स्ट्रेट किंवा सामुद्रधुनी लांबीला कमी आहे. जर का जहाजाचे इंजिन बंद पडले तर जहाज पाण्याच्या प्रवाहामुळे किनाऱ्याला जाऊन धडकण्याची शक्यता असते. जर का जहाज इस्तंबूलच्या किनाऱ्यावर धडकले तर जहाज आणि कंपनीचे खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याचा संभव असतो. आर्थिक दंड तसेच इतर कारवाईला सामोरे जावे लागते ते आणखीन वेगळे.
इंजिनातील बिघाड शोधायची घाई नव्हती तरीपण जहाजाने एक पोर्ट सोडल्यापासून दुसऱ्या पोर्ट मध्ये जाईपर्यंत एक एक तासाचा आणि मिनिटाचा कंपनीला हिशोब द्यावा लागतो. इंजिन बंद होऊन अर्धा तास झाला होता. इलेक्ट्रिकल ऑफिसर एक एक कार्ड चेक करत असताना जुनियर इंजिनियरने इलेक्ट्रिक ऑफिसर चे लक्ष एका ठिकाणी वेधून घेतले. एक इलेक्ट्रॉनिक कार्ड खालच्या बाजूने थोडेसे तांबूस झाल्यासारखं दिसत होते. ते कार्ड काढून नीट बघितले असता त्यातील काही भाग जळाल्यासारखा वाटायला लागला. सुदैवाने स्पेअर कार्ड असल्याने जळालेले इलेक्ट्रॉनिक कार्ड बदलले गेले आणि काही मिनिटातच जहाजाचे इंजिन सुरु करण्यात आले.
दिवसाला तीस हजार लिटर इंधन लागणारे इंजिन इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट आणि कंट्रोल होत असल्याने अशा इंजिन्सना स्मार्ट इंजिन बोलले जाते. अशा स्मार्ट इंजिन असलेल्या जहाजावर काम करण्याचा अनुभव वेगळा आणि कधीही न विसरता येण्यासारखा.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply