रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.
स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. ‘मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका ‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.
वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं ‘सिंहावलोकन ‘ झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : ग्लोबल मराठी
Leave a Reply