स्नान या नामामागे लागणारी ही तीन विशेषणं.
आता आंघोळ म्हणजे काय ? जी आपण रोज सकाळी आपले प्रातर्वीधी आटोपल्यानंतर करतो ती. कुणी कडकडीत पाण्याने, कुणी थंड पाण्याने तर कुणी कोमट पाण्याने, अर्थात आपापल्या सवयीनुसार प्रत्येकजण अंघोळ करून शुचिर्भुत होत असतं. शुचिता म्हणजे स्वच्छता किंवा पावित्र्य. शुचिर्भुत होणं याचाच अर्थ स्वच्छ आंघोळ करून आपलं शरीर पवित्र करणं. आंघोळीनंतरच आपण देवपूजा किंवा कोणत्याही मंगल कार्याची सुरवात करत असतो. आपल्या घरातील देवघर हे शुद्धतेचं, पावित्र्याचं, मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मग त्या जागी जाताना आपण पूर्णपणे शुचिर्भुत होऊनच जाणं योग्य असतं. एखादं दिवशी काही कारणामुळे आंघोळीला उशीर झाला तर आपल्याला उदासवाणं, कंटाळवाणं वाटत रहातं. आंघोळीनंतर मात्र आपलं शरीर आपल्याला ताजंतवानं वाटू लागतं. अनेकजण सकाळ सायंकाळ दोन्ही वेळी आंघोळ करतात. दिवसभर नोकरी,व्यवसाय, कामाच्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी जात येत असतो, विविध ठिकाणी फिरत असतो, अनेक लोकांना भेटत असतो, बोलत असतो. आपण ज्यांच्या सांनिध्यात दिवसभर येतो त्यामधल्या कुणाला असणाऱ्या शारीरिक व्याधी तसंच हवेतील विषाणू , धूळ, धूर या सगळ्यांमुळे आपलं शरीर मलीन होत असतं. सायंकाळी स्वगृही आल्यावर दिवसभराचा थकवा अंघोळ केल्यानंतर नाहीसा होतो, आणि आपण पुन्हा एकदा शुचिर्भुत होतो.
आता हे झालं अंघोळीबाबत. आंघोळ आणि अभ्यंगस्नान यामध्ये फरक काय ? मला आठवतंय दिवाळीची पहिली अंघोळ कधी आहे? म्हणजे नरकचतुर्दशी किती तारखेला आहे याबद्दल आम्ही एकमेकात बोलत असलो की आमच्या ऑफिसमधले पारसी कर्मचारी न समजून विचारायचे,
“ए पेल्ही आंघोल सूं छे ? टुम लोग हम्मेशा नहाता नही हैं क्या?”
आणि आम्ही मनसोक्त हसायचो. मग त्यांना या पहिल्या आंघोळीचा म्हणजेच अभ्यंगस्नानाचा अर्थ सांगावा लांगायचा.
अभ्यंगस्नान म्हणजे काय? तर वर्षातल्या काही ठराविक दिवशी, (उदा. गुढीपाडवा, दिवाळी, भाऊबीज) प्रात:काली उठून सुवासिक तेल, उटण्याने सर्वांगाला, केसांना मर्दन करून त्यानंतर ऊन ऊन पाण्याने केलेली आंघोळ किंवा स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेलं स्नान म्हणजे अभ्यंगस्नान अशीही अभ्यंगस्नानाची व्याख्या होऊ शकते. अभ्यंगस्नानापूर्वी केलेल्या तेल मर्दनामुळे शरीरातील पेशी, स्नायू जागृत होतात, तसंच त्वचा आवश्यक तितकीच ओशट रहाते. साबणात असणाऱ्या केमिकल्समुळे अनेकदा अंघोळीनंतर त्वचेला कोरडेपणा येतो तो स्नानापूर्वी लावलेल्या तेलामुळे येत नाही.
फार फार पूर्वी दिवाळीच्या काळात हवेत छान गारवा असायचा. तेल उटणं लावल्यावर कुडकुडत मोरीत जाऊन उन उन पाणी अंगावर घेतलं की थंडी कुठल्याकुठे पळून जायची. संपूर्ण घरभर सुवासिक तेल, उटण्याचा दरवळ दाटायचा. दिवसेंदिवस या दिवसांना पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याचा रिवाज जरा बाजुलाच पडत चाललाय. असो,
तर या वर सांगितलेल्या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष स्नानाशी संबंधित असणाऱ्या.
आता आणखी एक शब्द आपण अनेकदा वापरतो ‘सचैल स्नान’. सचैल स्नान याचा शब्दशः अर्थ आहे वस्त्रासह केलेलं स्नान. म्हणजे काय? तर एखाद्या सूर स्वरांच्या मैफिलीमध्ये एखाद्या गायकाचा असा काही सूर लागतो की त्या स्वरांनी तो उपस्थित रसिकांना सचैल न्हाऊ घालतो. जसं आपण स्नान करताना डोक्यावरून ओतलेलं पाणी पायापर्यंत निथळत आणि आपल्याला शुद्ध, ताजंतवानं करत जातं तसे ते सूर स्वर आपल्याला सचैल स्नान घालतात. त्या सुरांच्या स्नानाने आपण भरून, भारून आणि बहरून जातो. तसंच एखादा वक्ता, व्याख्याता त्यांचा विषय इतक्या ओघवत्या वाणीने आणि शब्दांनी आपल्यासमोर मांडतो की जणू काही शब्दांचं सचैल स्नानच तो आपल्याला घालतो, किंवा एखादा वादक कलाकार आपल्या अप्रतिम वादनातून सुरांचा असा काही पाणलोट उभा करतो की त्यामध्ये आपण चिंब चिंब होत सचैल स्नान करूनच बाहेर पडतो. म्हणजे इथे प्रत्यक्षात स्नान होत नसलं तरी जाणीव मात्र अगदी तीच असते, संपूर्ण शरीराला मिळणाऱ्या किंवा होणाऱ्या सचैल स्नानानंदाची.
तर अशी ही तीन प्रकारच्या स्नानांची कहाणी सुफळ संपूर्ण.
प्रासादिक म्हणे,
–प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply