आमच्या लहानपणी नव्हतं बोवा हे फॅड ! सगळे वर्गमित्र शाळा/महाविद्यालयातील शिक्षण संपल्यावर गावातच नोकरी करायचे, रोज भेटायचे. मुलीबाळी लग्न होऊन परगावी (सासरी) गेल्या तरी सणासुदिक माहेरी (म्हंजे परत गावीच ) येत, भेट व्हायची, हालहवाल कळायची. आता सगळे विखुरतात म्हणून स्नेहमेळावे !
पहिला वहिला मेळावा- उत्साह शिगेला, उत्सुकता त्याहून शिगेला ! निमंत्रणे, संयोजन-समिती, कार्यक्रम-पत्रिका, स्मरणिका, फोटो/पूर्वी व्हिडीओ कॅसेट किंवा सीडी ! भेटल्यावर नोंदणी, परस्पर परिचयाचा किलबिलाट. ” भुले हुए नामोंसे, कोई तो बुलाए ” टाईप जुनी टोपणनावे यानिमित्त प्रवाहाच्या पृष्ठभागावर तरंगणे ,वर्गात/प्रयोगशाळेत/ग्रंथालयात आठवणींच्या फेऱ्या. एक किंवा दोन दिवस जुन्या काळाची कॅसेट रिवाईंड केल्यागत धमाल. वयातील वर्षे वजा आणि केवळ धमाल. निघताना पुन्हा भेटीच्या आणाभाका, नवे व्हाट्स अप ग्रुप्स.
(दोन-तीन वर्षांनी ) दुसरा मेळावा- काही नवे (मागील वेळेस येऊ न शकलेले) चेहेरे, काहींना यावेळी न जमणे व तन्नीमित्तेन हळहळ. विचारपूस/चौकशा. वयानुसार क्वचित आरोग्यगप्पा, एखाद्या निखळलेल्या मित्र/मैत्रिणींची आठवण, संयोजकांचे आभार/हिशेब-टीशेब ! यावेळी जमल्यास शिक्षक-शिक्षिका यांना निमंत्रण. त्यांनी येऊन त्यांच्या आठवणी सांगणे, (माजी) विद्यार्थ्यांचा त्यांच्याभोवती घोळका. पुढचा मेळावा वेगळ्या गांवी घ्यायचा कां, तो सहकुटुंब असावा कां यांवर खलबते ! शक्यतो कुटुंबीय नको, कारण ते कंटाळतील, आणि मोकळेपणी धमाल करता येणार नाही यावर एकमत ! मुख्य म्हणजे पेताडगिरीवर बंधने ! स्नेहमेळाव्याचे एक आकर्षण म्हणजे बालमित्रांसमवेत भरपूर “पिणे “, जे लहानपणी “राहून “गेलेले असते. त्याची सोय करणाऱ्या मित्राची खास बडदास्त वगैरे ! शिक्षक आले तर त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार ! क्वचित नॉन-टीचिंग स्टाफ बोलावला असेल तर त्यांचाही यथोचित मानसन्मान ! त्या बॅचमधील काही “ख्यातकीर्त ” विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार. म्हणजे स्मृतिचिन्ह देऊन वगैरे. मग त्यांची कर्तृत्व शिखरे वाली भाषणे ! इतरांना ते (मनातल्या मनात) खटकणे. आपण सगळे सारखेच की, मग याचाच का सत्कार वगैरे .
(दोन-तीन वर्षांनी) तिसरा स्नेहमेळावा – आता ” नव्याने ” ची जागा ” वन्ही ” शब्द इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतो. स्थानिक मंडळींना आधीच उत्साह नसतो.(ते रोजच एकमेकांना भेटत असतात आणि त्यांना अधून-मधून शिक्षक-शिक्षिका “दिसत ” असतात.) लष्कराच्या भाकऱ्या भाजून संयोजकांमधील काही सदस्य कंटाळलेले असतात. थोडक्यात “तेच/तेच “. बाकी सारं वरील मेळाव्याचे वर्णन !
(दोन-तीन वर्षांनी) चौथा मेळावा- आता “वन्ही ” ची जागा “चेतवा” शब्द इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतो.संयोजक बदला, मेळाव्याची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) बदला, एखादी ट्रिप काढू या आणि नव्या प्रकारची धमाल करू या, दोन ऐवजी एकच दिवस मेळावा पुरे अशा सूचना यायला लागल्या की ओहोटीची सुरुवात समजावी.
स्नेहमेळावा म्हणजे नॉस्टॅल्जिया – गेलेले दिवस/एकत्र घालविलेले क्षण जे कधीच परतून येणार नाहीत, त्यांच्या गल्लीबोळात हिंडून येणे, दैनंदिनीत तेवढाच बदल- टॉनिक सारखा किंवा जीवनसत्वासारखा ! दरवेळच्या “वजाबाकीची ” गुपचूप नोंद घेणे आणि शक्य आहे तोपर्यंत भेटत राहणे – बाकी काही नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply