काल “स्नेहवन ” चा लोकार्पण सोहोळा पाहिला.असंख्य “आशेचे किरण ” तेथे लगबगीने आमच्या स्वागतामध्ये मग्न होते – रजिस्ट्रेशन,चहा -पाणी ,बैठक व्यवस्था, जेवणाच्या काउंटरवर वाढण्यास मदत , माइकवरून उद्घोषणा, स्वागत गीत ,योगासनांची प्रात्यक्षिके , देणग्या स्वीकारून पावत्या तयार करणे सगळीकडे त्यांचा प्रकाश वावरत होता. आत्मविश्वास अविश्वसनीय होता. गरीब /अनाथ अशा शब्दांच्या उच्य्यारण्यावर तिथे घोषित बंदी होती.
डॉ. अशोक कुकडे , दिनेश गुणे , मयेकर मॅडम असे अतिरथी -महारथी तेथे कौतुकाने जमले होते. स्वामी विवेकानंद ज्ञानालय, संगणक केंद्र ,गोशाळा सारं अवघ्या चार महिन्यात उभारलेलं ! कुळकर्णी दाम्पत्याने दिलेल्या दोन एकर जमिनीवर देखणं गोकुळ उभे राहिले आहे. संकल्पचित्रात अजून बरेच संकल्प चितारून ठेवलेले आहेत आणि त्यांची पूर्ती होणार हा विश्वास तिथल्या जमलेल्या सुहृदजनांमध्ये भेटत होता. शोधत-शोधत तिथे पोहोचायला (आणि परतायला ) मला दोन तास लागले. पण सुमारे दोनशे ” फूल ना फूलांची पाकळीवाले ” तिथे वेळेत पोहोचले होते. हा “देणाऱ्या हातांचा ” सोहोळा कृतज्ञ नजरेने (सिनियर ) देशमाने दाम्पत्य व्यासपीठावरून पाहात होते.
आणि या सगळ्या सोहोळ्याचा “विश्वकर्मा “- श्री अशोक देशमाने एका कोपऱ्यात अस्वस्थपणे उभे होते. “कवी ते कार्यकर्ता ” ही वाटचाल केलेला हा माणूस कोठेही नव्हता पण सगळ्यांच्या नजरेत स्थिरावला होता. त्यांची पत्नी (सौ अर्चना) शोधूनही मंडपात सापडत नव्हती. रोज सासूबाईंबरोबर ८० लोकांचा सकाळ -संध्याकाळ स्वयंपाक करीत पतीच्या स्वप्नांच्या पूर्तीत मग्न ! नवरात्रात अशी कार्यमग्न स्त्री -रूपे पाहायला मिळणे अवघड !
काल एका स्वप्नाची पूर्ती होती, पण सर्वदूर आशेची किरणे (Ray of Hopes ) पसरावयाची असतील तर खूप सूर्य लागतील.
१८ ता.ला मी त्यांना घरी बोलावून त्यांच्या कार्याचा व्याप समजून घेण्याचा प्रयत्न केला पण काल तो पाहिला. ” आनंदवन ” असेच काट्याकुट्यांवर फोफावले कारण तिथे काळाच्या छाताडावर पाय रोवून बाबा आणि साधनाताई आमटे उभे ठाकले. काल “स्नेहवन ” नव्या आमटे दाम्पत्याचे मनोहारी रूप दाखवून गेले.
त्यांना त्यांच्या या कार्यात हातभार लावणे म्हणजे स्वतःला किंचित उंचीवर नेण्यासारखे आहे.
फार पूर्वी चिरंजीवांवर “देण्याचा” संस्कार व्हावा या हेतूने मी आणि माझ्या पत्नीने त्याच्या व्रतबंधाच्यावेळी त्याच्या हस्ते काही सामाजिक कार्य केले होते. काल मी स्वतःवर संस्कार करून आलो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply