नवीन लेखन...

बर्फातला माणूस…

योट्झीचा मृतदेह जिथे सापडला ती छोटी घळ टिसेनजोक या भागात, सुमारे बत्तीसशे मीटर उंचीवर आहे. या छोट्याशा घळीची लांबी सुमारे सात मीटर आणि रुंदी तीन मीटर इतकी आहे. उपड्या, पोटावर पडलेल्या स्थितीतला हा मृतदेह इतक्या काळानंतरही बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत होता. या योट्झीनं फरचं जाकिट परिधान केलं होतं, तसंच त्यानं पायात पेंढा भरलेले बूट घातले होते व त्याच्या डोक्यावर फरची टोपी होती. जाकिटाचा, बर्फाच्या सान्निध्यातला पुढचा भाग व्यवस्थित राहिला होता, पण त्याची पाठ उघडी होती. त्याची टोपी तुकड्यांच्या स्वरूपात बाजूला पडली होती. त्याच्या डोक्यावरची त्वचा नष्ट झाली होती व कवटी उघडी पडली होती. कवटीवर काही चिरा पडल्या होत्या. या मृतदेहाच्या जवळच तुकड्यांच्या स्वरूपातील त्याच्या काही वस्तू सापडल्या. या वस्तूंत बर्च वृक्षाच्या सालापासून बनवलेली टोपली, तसंच बाण, बाणाचा भाता, कुऱ्हाड, इत्यादींचा समावेश होता. यांतील काही वस्तू या घळीतील मातकट बर्फावर आढळल्या, तर काही जवळपासच्या खडकांवर आढळल्या. बाणाचा भाता हा या मृतदेहापासून सुमारे सात मीटर अंतरावर, घळीबाहेर पडला होता.

योट्झीचा मृतदेह इतका दीर्घ काळ कसा टिकून राहिला असावा, याबद्दल एक कहाणी सांगितली जाते. सन १९९३ साली प्रसिद्ध झालेली ही कहाणी, त्याच्या शोधानंतर लागलीच काढल्या गेलेल्या निष्कर्षांवर आधारलेली आहे. त्याच्याकडच्या मोडक्या वस्तू पाहता, योट्झीला मारामारीला तोंड द्यावं लागल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती. या मारामारीत योट्झीला मृत्यू आला असावा. (योट्झीच्या खांद्यात बाण घुसल्याचंही कालांतरानं लक्षात आलं.) ही घटना उन्हाळ्याच्या अखेरीस वा हिवाळ्याच्या सुरुवातीस घडली असावी. कारण योट्झीच्या मृतदेहाजवळ जंगली प्लमच्या पिकलेल्या फळाचे अवशेष सापडले. ही फळं उन्हाळ्याच्या अखेरीस पिकतात. तसंच त्याच्या कपड्यांवर चिकटलेले काही धान्याचे दाणे हे, त्यावेळी उन्हाळ्याचा शेवट वा हिवाळ्याची सुरुवात होत असल्याचं दर्शवत होते. त्यावर्षीची हवा अतिथंड असावी. त्यामुळे योट्झी ज्या ठिकाणी मृत्यू पावला, त्या ठिकाणी बर्फ नसलं तरी, त्याचा मृतदेह या उंचावरच्या अतिथंड हवेमुळे शुष्क होऊन व्यवस्थित टिकून राहिला. त्यावर्षीच्या हिवाळ्यात तीव्र थंडी पडून, अल्पकाळातच हा सर्व भाग बाजूच्या हिमनदीच्या बर्फानं व्यापला असावा. हे बर्फ टिकून राहिलं असावं व या बर्फानंच या देहाला तब्बल पाच सहस्रकं जतन करून ठेवलं असावं. त्यानंतर १९९१ सालाच्या सुमारास आलेल्या कडक उन्हाळ्यानं, इतका काळ अस्तित्वात असलेलं हे बर्फ वितळलं आणि योट्झीच्या मृतदेहाचा काही भाग बर्फाबाहेर डोकावू लागला.

– योट्झीचा शोध लागला ती जागा (लाल रंगात)

(छायाचित्र सौजन्य : Kogo/Wikimedia)


बर्फातला माणूसः योट्झी – जनुकीय आराखड्यावरून पुनर्निर्मिती
(छायाचित्र सौजन्य : Kennis and Kennis/South Tyrol Museum of Archaeology)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..