मानवाच्या उत्क्रांती आणि उन्नतीसाठी शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे. हे महत्व ओळखत प्राचिन काळापासून आजतागायत शिक्षणप्राधान्य आहे. शिक्षण हे जरी विद्यार्थ्यांसाठी असेल तरी त्याचा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षकामुळे जगात, मानवी जीवनात परिवर्तन घडते. अनेक विचारवंत, कलावंत, संशोधक, शास्त्रज्ञ घडविण्याचे महान कार्य शिक्षकांनी केलेले आहे. आई, वडिल आणि त्यानंतर गुरूच्या पायी नतमस्तक होण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. शिक्षक, गुरू आपल्या शिष्यांप्रती आदर्श असतो.तेच त्याचे आदर्शत्व.
एखाद्या शिक्षकाचा विद्यार्थी अचानक रस्त्यावर भेटतो. ” ओळखलं का सर ? ” असं म्हणतो.” मी आता अमुक एका ठिकाणी असे असे काम करतोय.तुम्ही मला शिकवताना अस म्हणत होता. ” असं म्हणत तो जेव्हा गुरूपुढे नतमस्तक होतो तेव्हा ते गुरू स्वतःला धन्य मानत असतात आणि तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असतो. गुरूजी होणे खूप मोठी भाग्याची,अभिमानाची आणि गौरवाची बाब असते. आपल्या शिष्यांचे मानसशास्त्र जाणतो आणि अपेक्षित वर्तनबदल त्यामध्ये घडवितो तो खरा शिक्षक. शिक्षकांच्या हातून झालेली चूक तुरूंग भरवत असते. चुकीचे शिक्षण समाजस्वास्थ्य बिघडविते. म्हणून शिक्षकांना शिष्यांप्रती दक्ष असले पाहिजे. समाजात आजही अनिष्ट चालीरिती, परंपरा, अंधश्रद्धा आहेत त्याविरूद्ध बंड पुकारण्याची ताकत उभी केली पाहिजे.ती क्षमता शिक्षकात नक्की आहे . ज्ञानदानाबरोबर समाजकार्यात शिक्षकांनी अग्रेसर राहणे आज क्रमप्राप्त ठरले आहे. शिक्षकांनी राजकारण करू नये असा जो प्रवाह आहे तो चुकीचा आहे. आजची राजकारणाची दिशा पाहता शिक्षकांनी आदर्श राजकारणी घडविण्याचे कार्य करावे कारण आपला समाज , आपली राजनिती चुकीच्या दिशेने जात असेल तर ते कोणतीही ज्ञानी व्यक्ती कशी सहन करू शकेल.
आज शिक्षकांसमोर आव्हानांचा ढीग आहे. सामाजिक मानसिकता बदलली आहे. कौटुंबिक जबाबदारी पेलताना इतर अनेक अडचणीचा सामना त्यास करावा लागत आहे. शासनाच्या योजना राबविताना अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. मोफत गणवेश, शालेय पोषण आहार, शाळा दुरूस्ती, साधनसुविधांची अनुपलब्धता, वरिष्ठांचे, प्रशासनाचे तगादे, ऑनलाईन-ऑफलाईन, आधार कार्ड नोंदणी, बँक खाते उघडणे, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, गावपुढार्याच्या खाऊगीरीचा त्रास या बाबींमुळे शिक्षक वैतागून सोडला आहे. यातून मार्ग काढलाच तर भपकेबाज शिक्षण पध्दतीला भुलणारा पालक वर्ग. पोपटपंची ज्ञानाला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा. या गर्तेत शिक्षण-शिक्षक-विद्यार्थी भेट दुर्मिळ होऊ पाहत आहे. यावर आम्ही एकदा लिहीले होते.
गुरूजी तुम्ही सकाळी जरा घाईतच होता
लवकर गटवायची असेल ना खेडवळ शाळा?
तुटलेल्या चपलेचा अंगठा जोडून घेताना पाहिले मी तुम्हाला
शहराच्या चौकात…
तिथेच मारलीत मोजून गाडीला हवा
अन्
लटकवलात ट्यूशनवाल्याच्या बॅनरला दुपारच्या भाकरीचा डब्बा
तसे एकलव्याने गुरूदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा गुरूजींनो, सरांनो, सायबांनो परत कधी जोडणार आहात ? परत कधी जोडणार आहात?
शिक्षक शाळेवर कधी येतील याचीच वाट विद्यार्थी पाहत असतो. शिक्षकांनी सांगितलेली कामे झटपट करत असतो. त्यात त्याला आनंद वाटतो. शिक्षकांनी आनंददायी पद्धतीने अध्यापन केल्यास ते मुलांच्या हृदयास भिडते.तो शिक्षक यशस्वी ठरतो. आज अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बदलत आहेत. समाज पुढे येत आहे. शिक्षक क्रांती घडवत आहेत. पण पाहिजे तितका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर साधनसामुग्रीअभावी होताना दिसत नाही. शिक्षणाकडे पाहण्याची राजकीय अनास्था बदलायला हवी.
पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. गुरूप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम होतात. सावित्रीबाई फुले आणि क्रांतीबा ज्योतीबा फुले यांनी सर्वसामान्यासाठी शिक्षणाची सुरूवात केली.त्यांचा वसा आणि वारसा आपणास जतन करावयाचा आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आणि शालाबाह्य विद्यार्थी ही खूप मोठी समस्या भारतात आहे. उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च हा शिक्षणावर होणे अपेक्षित आहे पण तसे होत नाही. भौतिक साधनांअभावी मुलांना शिक्षण देणे म्हणजे विनाशस्त्र युध्द लढणे होय. आज शिक्षकांचे मनोधर्य वाढवून त्यांना नविन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे गरजेचे आहे. पण शिक्षकाचा अर्धा वेळ ऑनलाईन करण्यात जातो. ऑनलाईनचा कुठेही खर्च मिळत नाही. वेतनातून खर्च करावा लागतो. आधुनिक दुकानदारी सुरू झालेली. प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. खाजगी क्लासेस, खाजगी शाळा पालक विद्यार्थ्यांना विविध आमिषे दाखवितात. पैसे उकळतात. शिक्षणाच्या बाजारासंदर्भाने बोलायला कुणालाच वेळ नाही. शिक्षण ही जनचळवळ बनली पाहिजे तरच इतर देशांच्या तुलनेत आपण प्रगती करू शकतो. आदर्श पुरस्कार देण्याच्या पध्दतीवर संशोधन व्हावे. कुणी आमदार, खासदार, पुढारी नेता सांगतो म्हणून तो आदर्श होऊ शकत नाही. काम बोलले पाहिजे.
गावोगावी, खेड्यापाड्यात वाडीवस्ती तांड्यावर प्रामाणिक काम करणार्या आणि विद्यार्थी हेच दैवत मानणार्या शिक्षकांना सलाम!
© विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि. बीड
मो. 9421442995
Leave a Reply