वृत्त :- आनंदकंद
सोडून साथ सारे साथी निघून गेले
ठेवून एकट्याला, पक्षी उडून गेले
घेऊन शीर हाती सैनिक तुटून पडले
ही बातमी मिळाली, शत्रू पळून गेले
दुष्काळ कोरडा हा डोळ्यात पूर आले
जित्राब पोसलेले भूके मरून गेले.
रडणार कोण येथे मरणास रोजच्या या
डोळ्यातले तळेही आता सुकून गेले
दुनियेस जिंकणारे तोऱ्यात फार आले
जिंकायचे सदा पण ,येथे हरून गेले
तांडे भुकेजलेले बेजार फार होते
बदल्यात भाकरीच्या गाई विकून गेले
रूपात सारथ्याच्या कृष्णास पाहताना
अवसान कौरवांचे साऱ्या गळून गेले
होतो जिवंत तेव्हा दारी कुणी न आले
मरताच मी कशाला खोटे रडून गेले
© जयवंत वानखडे,कोरपना