“विद्यया संपन्नता” हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सोलापूर विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना २२ जुलै २००४ रोजी झाली, व प्रत्यक्ष कामकाज ०१ ऑगस्ट २००४ पासून सुरू झाले. दुष्काळी व ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करुन, उच्च शिक्षणाची संधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ करीत आहे.
१ ऑगस्ट २०१४ रोजी या विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाची 2 (फ) आणि 12 (ब) ची मान्यता मिळविली. देशात उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवायचे असेल तर प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्या दृष्टीने सोलापूर विद्यापीठाचे उदाहरण पथदर्शक ठरु शकेल.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा विद्यापीठाकडे ३५.५ एकर जागा उपलब्ध होती. त्यानंतर अधिकची ४८२ एकर नवीन जागा प्राप्त झाली. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता झाली आहे, आणि याबाबत विद्यापीठाचा मास्टर प्लॅन तयार होऊन हे विद्यापीठ विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत आहे. कला, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक प्राप्त करुन, देशस्तरावरची अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तसेच संशोधनाच्या क्षेत्रातही विद्यापीठाची कामगिरी गौरवास्पद आहे.
परीक्षांचे निकाल वेळेत लावण्याच्या बाबतीत तर सोलापूर विद्यापीठाने प्रस्थापित विद्यापीठांना मागे टाकत अभिनंदनीय कामगिरी केली आहे. ‘क्लोज सर्किट कॅमेरा’ यंत्रणेचा योग्य वापर व ९० टक्के निकाल ३० दिवसांत लावण्याची कामगिरी करणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाज पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इतर विद्यापीठांच्या अधिकार पथकांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन माहिती घेतली आहे. परीक्षा विभागाने DEPDS प्रणालीद्वारे ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठविण्याचे गौरवास्पद कार्य केले आहे.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply