सह्याद्री पर्वताच्या रांगामधुन वाहणाऱ्या कोयना नदीवर कोयनानगर, सातारा येथे “कोयना धरण” सन १९६४ मध्ये बांधण्यात आले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे हा असुन या प्रकल्पाची स्थापित जलविद्युत क्षमता १९२० मेगावॅट एवढी आहे. देशातील पुर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कोयना प्रकल्पाची क्षमता सर्वात जास्त आहे.
आता कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या ८९१ वर्ग किलोमीटर क्षेत्रावरील जलाशयावर तरंगते सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या सौर पॅनेलच्या माध्यमातुन ६०० मेगा वॅट एवढी उर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असुन या प्रकल्पामधुन निर्माण होणारी वीज राज्याच्या वीजजाळ्यामध्ये (grid) जोडण्यात येणार आहे. कोयना जलाशयातील पाण्याचा वापर झाल्यानंतर पाणीपातळीत घट झाल्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी कमी होत जाणार आहे आणि अशा वेळी तरंगत्या सौर पॅनेल बाबतचे कोणती कार्यवाही करावी याबाबत चर्चा सुरु आहे.
या कामासाठीचा आवश्यक असणारा प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आले असुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये जलसंपदा विभाग व महाउर्जा विभाग हे राज्य शासनाचे विभाग तर केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेला राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळ (NHPC) यांचा सहभाग असणार आहे. NHPC च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी रु. ६,००० कोटी (रु. १० कोटी प्रती मेगावॅटनुसार) एवढा खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा बांधकामाचा खर्च जरी जास्त असला तरी या प्रकल्पाचा व्यवस्थापनाचा व देखभालीचा खर्च कमी असणार आहे व यामुळे कोणतेही प्रदुषण होणार नाही.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय़ उर्जा (New and Renewable Energy) मंत्रालयाने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांपासुन वीज निर्मितीचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन अशा उर्जा स्त्रोतांद्वारे देशात सन २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट एवढा वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यामध्ये १०० गिगावॅट सौर उर्जा निर्मिताचा समावेश आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दि. २० जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्याचे नवीन व नवीकरणीय़ उर्जा स्त्रोत (अपारंपारिक उर्जा स्त्रोत) यापासुन वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण जाहीर केले आहे. तसेच दि. ९ सप्टेंबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये उपरोक्त प्रकल्पांची उभारणी करण्यासाठीची कार्यपध्दती जाहीर केली आहे. या अनुषंगाने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांपासुन वीज निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ: १) http://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/Koynas-floating-solar-panels-to-generate-600-MW-power/articleshow/53427126.cms
२) http://www.mnre.gov.in/
३) http://www.mahaurja.com/PDF/Policy%202015_1.pdf
४) http://www.mahaurja.com/PDF/Methodology%202015_1.pdf
Leave a Reply