नवीन लेखन...

सोल्यूशन डॉट कॉम (कथा)

अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत डॉ. विजय पांढरीपांडे यांनी  लिहिलेली  तृतीय क्रमांक प्राप्त कथा

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये डॉ. विजय पांढरीपांडे  यांनी लिहिलेली ही कथा. 


मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.

मी मुंबईला गेल्या गेल्याच त्याला फोन केला. बऱ्याचदा फोन एंगेज होता. चार-पाचदा ट्राय केल्यानंतर एकदाचा लागला.

“आधीच हात जोडून सॉरी म्हणतो. रोजच माझा फोन सतत वाजत असतो. तीच माझी लाईफलाईन आहे असं समज. बोल, किती दिवसांनी माझी आठवण झाली?”

मी त्याला मुंबईला आल्याचं सांगितलं. तोही एक्साईट झाला. म्हणाला, नक्की भेटू. शेड्युल बघतो म्हणाला. पाच-दहा मिनिटात त्यानेच फोन केला. ज्या दिवशी मी फ्री होतो त्या दिवशी ‘हाफ डे’ तोही मोकळा होता. त्याच्या बोलण्यावरून त्याला क्षणाचीही उसंत नव्हती हे जाणवत होतं. त्यानेच माझ्या हॉटेलचा पत्ता घेतला. तो स्वत:च मला पिकअप करणार होता.

“सालो बाद मिल रहे है – गप शप, खाना पिना हो जाय,” तो बम्बईया हिंदीत बोलला. “बाकी सब ब्रेक के बाद…”असं म्हणून मोठ्याने खळाळत त्याने फोन ठेवला.

त्याच्या स्वरात जुन्या पुराण्या दोस्तीचा, आठवणींचा ओलावा कायम असल्याचं जाणवलं.

विठू म्हणजे एक अजब रसायन होतं. आमच्या मित्रांच्या वर्तुळातील आमच्या लहानपणच्या ग्रुपमध्ये तो एकटाच असा होता ज्याचे अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं. परीक्षेतील यशाशी सख्य नव्हतं. आम्ही पुस्तकातले किडे होतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. एका अर्थी तो आमच्या अभ्यासू ग्रुपमध्ये मिस मॅच होता. तरी तो सगळ्यांना हवाहवासा वाटायचा. त्याच्याशिवाय कोणाचेही पान हलायचं नाही. कोणताही कार्यक्रम ठरायचा नाही. कारण त्याला सगळं काही ठाऊक होतं. त्याच्याजवळ प्रत्येक समस्येचं उत्तर असे. कुठल्याही प्रश्नाचं, समस्येचं दडपण घेणं त्याच्या स्वभावात नव्हतं. आपली अर्धीअधिक शक्ती दडपणात, ताणतणावात खर्च होते असं त्याचं मत होतं. तीच शक्ती आपण विचारपूर्वक वापरली तर आपण कुठल्याही समस्येवर सहज तोडगा काढू शकतो हे त्याचं साधं सोपं तत्त्वज्ञान.

विठू या नावातही गंमत होती त्याचं कागदोपत्री, शाळेत नोंदवलेलं, आईवडिलांनी ठेवलेलं नाव होतं ‘वसंत.’ वसंत कुलकर्णी. पण त्याला सगळे विठूच म्हणायचे. हे त्याच्या लाडक्या आजीनं ठेवलेलं नाव. ती विठ्ठलाची भक्त. तिला या नातवात पांडुरंग दिसायचा, पंढरपूरचा विठ्ठल दिसायचा. तिच्या पाठोपाठ सगळेच ‘विठू’ म्हणायला लागले. शाळेच्या पटावर सोज्ज्वळ नाव असलेला हा वसंत कुलकर्णी आमच्यासाठी विठूच!

आमच्यापैकी कुणी सायन्सकडे गेलं, कुणी मेडिकलला तर कुणी इंजिनीयरिंगला. विठू पहिल्याच प्रयत्नात मॅट्रिक झाला खरा, पण परसेंटेज न मिळाल्यानं सरळ आय.टी.आय. केलं. या डिप्लोमा कोर्सला मात्र तो रमला. आमच्यापैकी कोणाकडे काही यंत्र बिघडलं तर विठू ते पटकन दुरुस्त करायचा. त्याला वेळ लागायचा कधी कधी. पण काम निश्चित होणार असा विश्वास असायचा. “विठू के पास मर्ज की दवा है, असं आम्ही म्हणायचो. अडीअडचणीला आमच्या घरची मंडळी आमच्यापेक्षा विठूवर जास्त अवलंबून असायची. प्रत्येकाच्या घरात त्याचा संचार थेट माजघरात, स्वयंपाकघरात असायचा. घरातल्या मुलींना, बायकांना देखील विठूच हवा असायचा. त्या हक्काने त्याला कामं सांगायच्या. तो न कंटाळता, कपाळावर आठी न येऊ देता सगळ्यांची कामं करायचा. मन लावून, वेळ खर्चुन करायचा.

ग्रॅज्युएशननंतर आमचा ग्रुप फुटला. पांगापांग झाली. ‘गेले ते दिन गेले’ असं हळवेपणानं म्हणत आमच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या विश्वात, संसारात रमला. विठूदेखील.

केवळ आयटीआय डिप्लोमाच्या भरवंशावर तो एका मोठ्या पब्लिक अंडरटेकींग कंपनीत जॉईन झाला. पण दहा-पंधरा वर्षांत स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यानं स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानं कसला तरी साईड बिझिनेस सुरू केल्याचं कळलं. अधूनमधून त्याच्याशी बोलणं व्हायचं. त्यावरून त्याच्या प्रगतीची. श्रीमंतीची, त्याच्या चढत्या आलेखाची कल्पना यायची. त्यानं मुलाला मेडिकलला घातलं, मुलगी इंजिनीयरिंगला गेली. त्यानं आलिशान फ्लॅट घेतला, कार घेतली. आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत त्यानं आमच्यापैकी अनेकांना मागं टाकलं.

आमच्यापैकी एकदोन जणांनी त्याची भेट घेतली. त्याचं ऐश्वर्य पाहिलं. समाधान व्यक्त केलं. मी मात्र त्याला बऱ्याच वर्षांनी भेटणार होतो म्हणून जास्त उत्सुक होतो. जे आम्हाला शिकून सवरून पदव्या घेऊन साधलं नाही ते त्यानं आपल्या कुठल्या कौशल्यानं साजरं केलं हे मला बघायचं होतं.

ठरल्या वेळी विठू मला हॉटेलमध्ये घ्यायला आला. मी तर ओळखूच शकलो नाही त्याला. पोट छानपैकी सुटलेलं. डोक्यावर अर्धचंद्र. उरलेसुरले केस पांढरे झालेले पण आल्या आल्या रिसेप्शनच्या कॉरिडॉरमध्ये त्यानं मला ज्या आत्मीयतेनं, मिठीत घेतलं त्यावरून जाणवलं.

विठूच्या स्पर्शात तोच लळा, जिव्हाळा, ओलावा आहे. जो शालेय मैत्रीच्या दिवसात जाणवायचा. श्रीमंती त्याला चांगलीच मानवलेली दिसत होती.

“बोल कुठे जायचं? मी तुझ्यासाठी एकदम मोकळा आहे आज. नो वर्कस् नो फोन्स.” विठू आपल्या आलिशान गाडीचं दार उघडीत आत्मीयतेनं म्हणाला.

“तूच ठरव बाबा, मला मुंबईची काही माहिती नाही. या शहरात आलं की मला गोंधळल्यासारखं होतं. गर्दी अंगावर धावून येते असे वाटते.’

“पण ही गर्दीच मुंबईची जान आहे दोस्ता. ही गर्दीसुद्धा बहुरंगी आहे. इंद्रधनुष्यासारखी. ही गर्दी म्हणजे कॉकटेल आहे. नशा चढवणारी. मुंबई प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेते. आपण माझ्या फ्लॅटवर जाऊ. इथून फार लांब नाही. घरीच नेलं असतं पण फार लांब आहे. जाण्या-येण्यातच वेळ जाईल. या फ्लॅटवर निवांत गप्पा मारता येतील. सगळी सोय आहे. मी माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्ज या फ्लॅटवरच घेतो. क्लाएंटशी इथेच बोलतो.’

जा विठूची शोफरड्रिव्हन आलिशान कारचा गारवा त्याच्या मधाळ बोलण्याइतकाच सुखद होता.

अर्ध्या तासातच आम्ही विठूच्या फ्लॅटवर पोहोचलो.

विठू म्हणाला त्याप्रमाणे त्याचा फ्लॅट सर्व सुखसोयींनीयुक्त असाच होता. तो आल्या आल्या मोजक्या दोनतीन नोकरांची लगबग सुरू झाली.

“तुला एक सांगतो. कुठलाही धंदा यशस्वी होण्यासाठी मला बुद्धीपेक्षा, पदवीपेक्षा डेडिकेशन, डिव्होशन जास्त महत्त्वाचं वाटतं. मला अशी प्रामाणिक टीम मिळालीय. पैसा म्हणजे भाडेवाढ महत्त्वाची नसते.

तुम्ही शून्यातूनसुद्धा विश्व निर्माण करू शकता.”

विठू आलिशान कोचमध्ये रेलून बोलत होता. त्याने दोघातिघांना हव्या त्या सूचना दिल्या. माझ्या चटकन लक्षात आलं, ‘त’वरून ताकभात समजणारी फौज विठूला लाभली आहे.

“जरा रिलॅक्स कधी नव्हे ते मलाही शांतता लाभलीय तुझ्यामुळे. अर्ध्या दिवसाची का होईना विश्रांती. अदरवाईज आजकाल मी फार व्यस्त असतो. अक्षरश: जेवायचीसुद्धी फुरसत नसते.”

“करतोस काय बाबा असं? एवढा व्यस्त असतोस म्हणजे व्यवसाय काय तुझा?” मी थेट मुद्यालाच हात घातला.

तोपर्यंत थंड खस घातलेलं लिंबाचं सरबत पुढे आलं.

“मी ड्रिंक्स घेत नाही. नॉनव्हेज खात नाही. आधीच सांगून ठेवतो म्हणजे ते सगळं मी केलं नाही असं नव्हे. मी दहा गावचं पाणी प्यायलोय. माणसं समजायला त्यांच्यात मिसळायला हे सारं गरजेचंही वाटतं कधीकधी. पण कुठं थांबायचं आणि किती धावायचं हे देखील कळलं पाहिजे माणसाला.’ मी विठूच्या या वाक्याला दाद दिली.

“विठू, मी खूप ऐकलं तुझ्या यशाबद्दल इकडून तिकडून. आपल्यापैकी कुणी इंजिनीयर झाला. प्राध्यापक झाला. कुणी एमडी होऊन आलिशान दवाखाना काढला. कुणी वकील झाला हायकोर्टात. पण विद्यापिठाची पायरी न चढता तू जे यश कमावलंस त्याला तोड नाही. कसं जमलं तुला हे सगळं – मला जाणून घ्यायचं आहे असं समज, मला विठू समजून घ्यायचा आहे.

“सोपं आहे मित्रा! समजून घ्यायला फारसं कठीण नाही. आयुष्यातली गुंतागुंत आपणच वाढवीत असतो. तुम्ही खोलात जाऊन विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की समस्येचं उत्तर तुमच्याजवळच असतं. ते म्हणतात ना, ‘तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा विसरलाशी ।’ तसंच काहीसं. म्हणजे शोध आपला आपणच घ्यायचा असतो. अर्थात हा शोध घ्यायला कधीकधी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. ती मदत मी करतो. कारण प्रत्येकजण घाईगर्दीत असतो. त्याला धीर नसतो. पेशन्स नसतो. तातडीने सोल्यूशन हवं असतं ” ते काम मी करतो.”

“मी कंपनीत दहा-बारा वर्ष काम केलं. मन लावून केलं. सगळं व्यवस्थित चाललं होतं पण आर्थिक “मंदीमुळे सर्व जग हादरलं. संगणक आले. ॲटोमेशन आलं. माणसं नकोशी झाली. यंत्र हवीशी झाली. कंपनीनं गोल्डन शेकहॅण्ड या नावाखाली योजना जाहीर केली. वेळेआधीच स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना भरपूर लाभ देण्याची, एक रकमी ग्रॅज्युईटी देण्याची. मी ही कंटाळलो होतो. मला बदल हवा होता. मी घसघशीत रक्कम घेऊन कंपनी सोडली.”

“त्यात तुला रिस्क नाही वाटली? कितीही झालं तरी आपल्याला दरमहा येणाऱ्या रकमेची सवय झालेली असते.” मी मध्येच शंका विचारली.

“मुळीच नाही वाटली. कारण मी रिकामटेकडा बसणार नाही याची मला खात्री होती. माझा माझ्यावरच पूर्ण विश्वास होता. जगण्यासाठी बुद्धिमत्ता हवी असते हा गैरसमज आहे. धाडस, चिकाटी, वेगळं काही करण्याची जिद्द आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास या बाबी जास्त महत्त्वाच्या. मी अवतीभवतीचं जग डोळे, कान उघडे ठेवून अनुभवत होतो. अभ्यासी होतो. मला जाणवलं आता माणसांच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत. अनेकांना समस्या येतात. पण काय करावं नेमकं ते सुचत नाही. मी हा मुलभूत प्रॉब्लेम सोडवायचं ठरवलं.”

“म्हणजे नेमकं काय?” मी न समजून विचारलं.

“सांगतो, राजकारण असो, कलेचं क्षेत्र असो, व्यापारातल्या अडचणी असोत किंवा कौटुंबिक समस्या असोत – प्रत्येक क्षेत्रात जिवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येकाला या स्पर्धेत टिकून राहायचं आहे. सर्व्हायव्हल इज बिग प्रॉब्लेम. उदाहरणार्थ टी.व्ही. सिरीयल घ्या. कोणती सिरियल कशी टिकवायची, कशी लांबवायची, कुठे कशी वळणं घ्यायची हे प्रेक्षकांचा मूड तपासून ठरवावं लागतं. तुला आश्चर्य वाटेल, पण बहुतेक सिरियलचा खरा लेखक, दिग्दर्शक मी असतो! म्हणजे पडद्यावर नाव वेगळं दिसणार. पण ती मंडळी सल्ला माझा घेतात. कोणतं पात्र टाकायचं, कोणतं घ्यायचं, कथेला कसं वळण द्यायचं, धक्कातंत्र कसं वापरायचं हे मी सुचवतो. मी साहित्यिक नाही, मी नाटक-सिनेमाचा अभ्यासक नाही, मला यातलं तंत्र कळत नाही. पण मंत्र कळतो. लोकांना काय हवंय ते मी जाणून घेऊ शकतो. ही यंत्रणा माझी मी राबवितो. एखाद्या सिरियलवर मधूनच लोक आक्षेप घेतात. सिनेमांच्या नावावरून वाद होतात. एखादा संवादावर आक्षेप घेतले जातात. यामागे काही तत्त्व बित्त्व नसतं. उलट राजकारण असतं. ब्लॅकमेलिंगदेखील असतं. तुम्हाला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. दोन्ही गोटात शिरून नेमकी दुखरी नस शोधून काढावी लागते. आजकाल सिनेनटांवर लैंगिक छळाचे आरोप होतात. हे सगळं बेतलेलं, योजनाबद्ध असं नाटक असतं. याचे वेगवेगळे कंगोरे असतात. तुम्हाला जे दिसतं, बाहेर येतं तो पाण्यावरचा बुडबुडा समजा. आत बराच गोंधळ असतो. अशा प्रकरणी मी योग्य तो मार्ग सुचवतो. तडजोड घडवून आणतो.

“म्हणजे तू काय कंपनी स्थापन केलीस की काय?” मी मध्येच विचारलं.

“तसंच समज. या कंपनीचं खाजगीतलं नाव आहे ‘सोल्यूशन डॉट कॉम. आमचं सगळं काम पडद्यामागे चालतं. लोकांना आता माझी माहिती झालीय. पण ती कानोकानी खबर गेल्याने – मी कुणाकडे जात नाही. मी माझी जाहिरात करीत नाही. तशी मला गरजही भासत नाही. लोकंच माझ्याकडे येतात. माझे क्लाएंट हेच माझे अॅम्बेसिडर असतात.

“तुला सांगून आश्चर्य वाटेल, काही स्कॅण्डल्स हे प्रसिद्धीसाठी असतात. प्रत्येकाला मीडियात स्वत:ची चर्चा हवी असते. सातत्याने प्रतिमा समोर यायला हवी असते. नाटक गाजवायचं असतं. सिरियल लांबवायची असते. प्रदर्शनापूर्वीची चित्रपटाची हवा निर्माण करायची असते. यासाठी मी वेगवेगळ्या कऌप्त्या सुचवितो. आम्ही त्याला ‘गिमिक्स’ म्हणतो. म्हणजे सिरियलमधलं एखादं पात्र गायब करायचं – मग काही एपिसोडनंतर पुन्हा ते आणायचं – कुणाला मध्येच मारायचं – कुणा पात्राची रिप्लेसमेंट करावी लागते, नटाच्या वैयक्तिक अडचणी निर्माण होतात त्या अनुषंगाने कथानकात ट्विस्ट आणायला लागतो.

“हे सगळं तू सुचवितोस?” मी आश्चर्यानं आणि अविश्वासानं विचारलं.

“ऑफकोर्स! आय मीन तुम्ही सगळ्यांनी विठूला अंडरएस्टीमेट केलं! आपण व्यक्तींची योग्यता विद्यापीठाच्या पदवीनं ठरवतो. गुणांच्या श्रेणीनं, परसेंटेशननं ठरवितो. पण माणसाची कार्यक्षमता यावर अवलंबून नसतेचमुळी! तुम्हाला समोर आलेल्या समस्येचं आकलन करता आलं पाहिजे. म्हणजे समस्या समजावून घेता आली पाहिजे. नंतर त्या समस्येचं विश्लेषण करता आलं पाहिजे. वेगवेगळे पर्याय शोधता आले पाहिजेत. त्या पर्यायांचे संभाव्य परिणाम काय होतील, होऊ शकतात याचे आकलन करता यायला हवं अन् त्या अनुषंगाने, सर्वांगानं योग्य विचार करून समस्येचं उत्तर शोधायला हवं. मला सांग कुठल्या विद्यापीठात शिकवतात हे सगळं? आयुष्याचा सामना करताना, स्पर्धेत टिकून राहताना याचीच खरी गरज असते. हे सगळं मला समजलं. कारण मी माणसं फक्त चेहऱ्यावरून पारखली नाहीत, मी खोलात शिरतो, बोलतो, ऐकून घेतो. माणसांना विश्वासात घेतो. त्यांच्यातलाच एक होऊन जगतो त्यामुळे मला हे सर्व जमतं. यातही रिस्क असते अन् रिस्क कुठे नसते? डॉक्टर पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना स्पष्ट सांगतात, ‘आम्ही आपल्या परीने प्रयत्न करूच. बाकी परमेश्वरावर भरवसा ठेवा. अर्थात प्रत्येकाचा सक्सेस रेट हा यावर अवलंबून असतो.’

विठूनं कपाळावरील आडव्या रेघांवर बोटं फिरवली. मी सुन्न होऊन शांत चित्तानं ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात चांगलंच तथ्य होतं. मला शिक्षणातला, परीक्षेतला, मूल्यमापनातला फोलपणा जाणवला.

सिस्टीम चुकीची आहे हे सगळ्यांना पटतं पण ती सुधारायची कशी याबद्दल मतभेद असतात. बदलाला सामोरं जाण्याची तयारी नसते. त्यापेक्षा ‘जैसे थे’च बरं अशी तडजोड सोयीची वाटते.

“मी तुला फक्त कलेच्या क्षेत्रातील उदाहरणे दिली पण माझं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. मी कुठल्याही समस्या सोडवू शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारचं चॅलेंज स्वीकारतो. यातून मला खूप शिकायला मिळालं. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा माझे क्लाएंट आहेत. त्यांना विद्यार्थ्यांचा त्रास असतो. संघटनांच्या अरेरावीचा त्रास असतो. बेजबाबदार प्रशासनाचा प्रॉब्लेम असतो. प्राध्यापक मंडळीच एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या उरावर बसतात. त्यात जातपात, लिंगभेद अशा बऱ्याच पोट समस्या असतात. आम्ही तेही आव्हान स्वीकारतो. समस्येच्या मुळाशी जातो. संस्थेच्या आतल्या गोटात शिरतो. खरी-खोटी दोन्ही प्रकारची माहिती काढतो.’

“पण हे सगळं तू कोणाच्या भरवशावर करतोस? आय मीन तुझा स्टाफ, तुझे सहचारी… हा पसारा कसा काय सांभाळतोस?”

“तीच तर गंमत आहे. माझ्याकडे मासिक पगाराने बांधलेले एम्प्लॉईज नाहीत. मी कुणाला बांधील नाही. कुणी मला बांधील नाही. मी कामाच्या स्वरूपाप्रमाणे मानधन देतो. प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या आवडीचं काम करायलासुद्धा स्वतंत्र असतो पण माझी असाइनमेंट ही त्या त्या वेळेपुरती कालमर्यादित असते. काम पूर्ण करा अन् पैसे घ्या. सगळं परस्परांच्या विश्वासावर चालतं. चांगुलपणावर माझा विश्वास आहे. कोण काय काम करू शकेल हे मला समजतं आता. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यापीठाची, कुलगुरूची समस्या असेल तर आम्ही तिथल्या विद्यार्थ्यांची, संघटनांची, प्राध्यापकांची, कर्मचाऱ्यांचीसुद्धा मदत घेतो. नवरा-बायकोतला कौटुंबिक प्रॉब्लेम असेल तर बायकोची मैत्रिण, नवऱ्याचे मित्र, त्यांचे ऑफिसमधले सहकारी, नातेवाईक यांचीही मदत घेतो. यापैकी हा आर्थिक असतो असंही नाही. काहीजण सामाजिक मित्रत्वाच्या भावनेतून, कुणाचं भलं व्हावं म्हणूनही मदत करत असतात. निस्वार्थीपणे सहकार्य करीत असतात. पण मी आर्थिक देवघेवीबद्दल पारदर्शी असतो. सगळं आधीच स्पष्ट ठरवून आम्ही पुढे पाऊल टाकतो. आतापर्यंत तरी माझी फारशी फसवणूक झालेली नाही. सगळ्याच समस्या समाधानानं सुटतात असंही नाही. पण सत्तर-ऐंशी टक्के केसेसमध्ये मी यशस्वी होतो. माझे अंदाज खरे ठरतात. बाण वर्मी लागतो. अनेकवेळा. अंदाज चुकतातही. तेव्हा मी कसलाही आर्थिक लाभ घेत नाही, काहीही स्वीकारत नाही.”

“म्हणजे तुझ्या नोकरीपेक्षाही हा व्यवसाय फायद्याचा वाटतो?’ मी उत्सुकतेनं विचारलं.

“फायदा-तोटा आपण कसा तोलतो यावर हे अवलंबून असतं. माझे बहुतांशी व्यवहार हे कॅशमध्ये नसतात. ते मटेरियल गेनच्या स्वरूपात असतात. म्हणजे माझे क्लाएंट काम झालं तर मला चक्क कार देतात गिफ्ट म्हणून. पंचतारांकित हॉटेलचं बिल भरतात, आमच्या कुटुंबाच्या हॉलिडेचा खर्च करतात. आणि असं बरंच काही. याशिवाय काही व्यवहार आर्थिक होतात नाही असं नाही. कारण मला माझ्या मदतनिसांना मानधन द्यावं लागतंच. शिवाय इतरही खर्च असतोच. माझ्याकडे फायनॅन्शियल अॅडव्हायझर आहेत. तो केसचा आर्थिक ताळेबंद तयार करतो. शिवाय ही जी सिनेमातल्या चॅनेलमधली मंडळी असतात त्यांना काम झाल्याशी मतलब असतो त्यांच्याकडे प्रायोजक असल्यामुळे पैशाचा प्रश्न नसतो. मला पैशासाठी घासाघीस करावीच लागत नाही. ते म्हणतात ना ‘मुँह मागे दाम -‘ ते सहज मिळतं. याशिवाय राजकारण्यांचा तर किस्सा वेगळाच असतो.’

“म्हणजे तू राजकारण्यांची देखील कामं करतोस?”

विठूच्या कामाचा अवाढव्य विस्तार बघून मी चक्रावलोच.

“अरे, ही माझी खरी कमाई तिथूनच होते. इथेही तोल-मोल हा प्रकार नसतो. त्यांना विशिष्ट कार्य मर्यादेत, ठराविक माहिती हवी असते. विश्लेषण हवं असतं. त्यामुळे निवडणुकांच्या आसपास मी अत्यंत व्यस्त असतो. श्वास घ्यायलाही पुरेसा वेळ नसतो. राजकारणी मंडळींच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगावी लागते. या कानाचं त्या कानाला पत्ता लागू न देता काम करावं लागतं. दोन्ही गटात माणसं पेरावी लागतात. दोन्ही गटांचा विश्वास संपादन करून, आतल्या गोटात शिरून कामे करावी लागतात. म्हणजे युती करायची की नाही, त्याचे संभाव्य फायदे-तोटे, कुठून कुठे उभं करायचं, कुणाला पक्षात खेचायचं याचं मार्गदर्शन करावं लागतं.’

“हे सगळं मार्गदर्शन तू करतोस? म्हणजे तुला राजकारणात रस आहे?” मी उत्सुकतेनं विचारलं.

‘सल्ला द्यायला या गोष्टींची, म्हणजे राजकारण समजून घेण्याची गरज नसते. तुझ्या भाषेत सांगायचं. तर तो माझ्यासाठी एक ॲकॅडेमिक प्रॉब्लेम असतो. राजकारणी मंडळी ही बायस्ड् असतात. त्यांच्या डोळ्यावर झापडं लावलेली असतात. घोड्याला कसं फक्त समोरचं दिसतं. ते एकाच अंगानं विचार करतात. मी सल्ला देताना किंवा त्यांच्या समस्येची गुंतवणूक सोडविताना सर्वांगानं विचार करतो अगदी मागचा-पुढचा. खूप पुढचा विचार म्हणजे लॉाँगटर्म गेन्सचा विचार. उदाहरणच द्यायचं झालं तर अनेकांनी नातवाला राजकारणात पुढं करणं – ज्या नातवाला वाचलेले चार शब्द नीट बोलता येत नाहीत त्याला थेट लोकसभेत पाठविण्याचा निर्णय होतो – यावरून निर्माण झालेले कौटुंबिक कलहाच्या ताणतणावाचे नाटक. नाटक शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण आजकाल अधिकाधिक गोष्टी या माध्यमांनी रंगरंगोटी केल्यामुळे भडक स्वरूपात आपल्यापुढे येतात. गंमत म्हणजे अडखळत बोलणारे हे नवशिके युवा नेते एखाद्या दौऱ्यावर रस्त्यात अपघात झालेल्यांना मदत करताना आपण व्हायरल झालेले पाहतो. हे सगळं जमवून आणावं लागतं. यातील बऱ्याच नाटकांची स्क्रीप्ट माझी आहे.’

“काय म्हणतोस विठ्या?” माझा विश्वासच बसेना.

“तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस. कोणी कुठे कधी काय बोलायचं, कुणी हवा तापवायची हे देखील अॅनॅलेसिस करून मीच सुचवितो. तुमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं की, ही मंडळी अशी गरळ ओकल्यासारखी का बरळतात? चांगली सभ्य माणसं वेडंवाकडं किंबहुना अश्लाघ्य म्हणता येईल असं का बोलतात? पण हा आक्रस्ताळेपणा ही आजच्या राजकारणाची गरज झालीय. हे फक्त आपल्या देशाशी मर्यादित नाही राहिलं आता. हा ग्लोबल फिनोमिना झालाय. ट्रम्पनं देखील अमेरिकेत हेच केलं. याला अतिरेक म्हणा कि आणखी काही. म्हणजे अतिरेकीपणा ही अतिरेक्यांपुरती, दहशतवाद्यां-पुरती मर्यादित राहिलेली नाहीय. तो कॉमन फिनोमिना झालाय. आश्चर्य म्हणजे, आता त्याची आपल्याला सवय झाली आहे. तेच ते औषध आपण सारखे घ्यायला लागलो की, एकवेळ अशी येते की ते काहीही परिणाम करीत नाही. जी मंडळी झोपेच्या गोळ्या घेतात त्यांना विचारा. एकवेळ अशी येते की एकाऐवजी दोन गोळ्या घेतल्या तरी निद्रानाशावर परिणाम होत नाही. म्हणजे ते विष आपण पचवायला लागतो. हे सगळं गळी उतरवायला थोडं कठीण आहे पण राजकारणी मंडळींचे एकेक किस्से मी तुला सांगितले तर तू चाट पडशील. त्यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. त्यामुळे त्यांच्या केसेस घेताना मी सावधानगिरीच बाळगतो, सगळा व्यवहार अॅडव्हान्समध्ये करतो. अत्यंत बेभरवशाची मंडळी. तुमचा वार तुमच्यावरच पलटवतील – म्हणजे राफेल म्हणा, सर्जिकल स्ट्राईक म्हणा, राममंदिर म्हणा, शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा, आरक्षणाचा मुद्दा म्हणा – हे कुठे किती कसं ताणायचं हे सल्लेदेखील मीच देतो. एखादी मोठी व्यक्ती एखादा मोठा पक्ष सोडते. दुसऱ्या मोठ्या पक्षात जाईल असे वाटते पण वेगळाच पक्ष निर्माण करते. एकाच कुटुंबातला मुलगा एका पक्षात, बाप दुसऱ्या पक्षात तोही अधांतरी टांगलेला. ही जी राजकारणातली गुंतागुंत असते ना, ती वरवर दिसते तेवढी साधी सरळ नसते. प्रत्येकाची गणितं वेगळी. गणितं सोडविण्याची सूत्रे वेगळी. अन् त्या गणिताची उत्तरंदेखील वेगळी राजकारणात प्रश्नाला एकमेव उत्तर नसतं. आणखीन एक गंमत सांगतो. राजकारण्यांना, पक्षाला समस्या सोडविण्यात रस नसतो. कारण समस्या सुटली की त्यांना कोण विचारणार? त्यांचं महत्त्व संपलं. म्हणून त्यांना समस्या चिघळत ठेवण्यातच स्वारस्य असतं. तुला काय वाटतं, की शेतकऱ्यांची समस्या म्हणा, आर्थिक प्रश्न म्हणा, यावर तोडगा नाही? आज चार तज्ज्ञ मंडळी एकत्र बसवली तर सहज तोडगा निघेल. पण सरकारला तज्ज्ञ मंडळींचे सल्ले नकोच असतात. त्यांना समस्यांवर शहाणी, अभ्यासू, प्रामाणिक माणसं नकोच असतात. तू बघ सगळीकडे. मीडियॉकर म्हणजे सर्वसाधारण मंडळींचा भरणा दिसतो. पदव्या आहेत, पण अक्कल नाही, विषयाचं ज्ञान नाही, विचारांचं तारतम्य नाही अशी मंडळी अधिकाऱ्याच्या पदावर सहज दिसतात, बहुसंख्येनं दिसतात-–”

“हे सगळं भयंकर आहे.” मी सुन्न झालो ऐकून.

“भयंकर नाही मित्रा! महाभयंकर आहे.”

“मग तुझा नेमका रोल काय?”

“मी तबल्यावर हात ठेवतो आणि डग्ग्यावरही हात ठेवतो तेव्हाच ताल धरता येतो. एनी वे, हे रामायण संपणार नाही. कारण ते फक्त रामायण नाही तर रामायण आणि महाभारताचं कॉकटेल आहे. इथे कधी आपला अर्जुन होतो तर कधी कृष्ण व्हावं लागतं. ही फक्त झलक आहे. दोस्ता, तू विचारलंस म्हणून सांगितलं. एरवी मी माझा गवगवा करीत नाही. माझी प्रसिद्धी, माझी जाहिरात माझे क्लाएंटस् करतात. आणखीन बरेच किस्से आहेत. सिनेकलावंताचे, क्रिकेटपटूंचे, डॉक्टरांचे, प्राध्यापकांच्या लफड्यांचे, भ्रष्टाचाराचे – तुला सांगतो, कुठलेही क्षेत्र स्वच्छ नाही. आपण म्हणतो कोर्टात न्याय मिळतो पण तिथेही अन्याय होतोच. सरकार कुणाचेही असो – सावळा गोंधळ असतोच. काळेबेरं असतंच. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला मरण नाही. मी प्रत्येकाला हवा असतो.”

“हॅट्स ऑफ टू यू विठू… वुई आर प्राऊड ऑफ यू. आम्ही फक्त शिकलो. डिग्र्या घेतल्या. तू पदव्या न घेताही इतरांना शहाणपण शिकवतोस तेही गाजावाजा “न करता.”

‘अरे बाबा, मी गाजावाजा केला तर माझाच बाजा वाजेल… मागून मिळणे आणि न मागता सर्वकाही मिळणे यात मोठा फरक असतो. मी खरंच लकी आहे. मला न मागताच सगळं काही मिळालं. शहाणी बायको, जिनं तक्रार न करता मला निभावून घेतलं. लग्नानंतर ती शिकली. पीएच.डी. झाली. माझ्यापुढे गेली. मुलं-मुली कर्तबगार निघाली. आणखीन काय हवं असतं माणसाला… तूच सांग?”

“पोटासाठी जेवण!’ माझ्याऐवजी विठूच्या

सहकाऱ्यानं उत्तर दिलं. आम्ही विषय बदलीत जेवणात रमलो.

— डॉ. विजय पांढरीपांडे
मो. ७६५९०८४५५५

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..