अगदी लहानपणी १ ते ५ वर्षांपर्यंत मुलाचा हात सहजगत्या अधिक जोरात ओढला गेला तर मुले रडू लागतात व संपूर्ण बाहू हलविणे बंद करतात. अशा वेळी काय करावे हे आई-वडिलांना कळत नाही याला खेचलेला कोपराचा सांधा असे म्हणतात.
लहान वयात पाचसाडेपाच वर्षांपर्यंत रेडियस या हाडाचे अस्थिकरण झालेले नसते. त्यामुळे वर्तुळाकार हेडऑर्बिक्युलर लिगामॅण्टमधून सहजपणे बाहेर येऊ शकते. त्यामुळे जोरात हात खेचल्याने मुले रडू लागतात. अशा वेळी कोपराच्या क्ष-किरण चिकित्सेत अस्थिभंग झालेला दिसत नाही. मात्र थोड्याशा हालचालीने हे सरकलेले रेडियसचे हेड पुन्हा आत बसविले जाते व मुले लगेचच रडायची थांबतात. अशा वेळी पुनः पुन्हा हात न खेचण्याचा सल्ला दिला जातो. तरुण वयात टेनिस, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा कोपर बाहेरील बाजूस दुखू लागतो.
मध्यमवयीन स्त्रियांना भांडी घासून, कपडे पिळून किंवा पोळ्या लाटून लाटून हा प्रकार होतो. याला टेनिस एल्बो म्हणतात. असेच दुखणे कोपराच्या आतल्या बाजूस गोल्फ खेळणाऱ्यांना होते त्याला गोल्फ एल्बो असे म्हणतात. यावर औषधे घेणे किंवा कधी कधी दुखणाऱ्या जागेवर कॉर्टिसॉनचे इंजेक्शन देणे असे उपाय आहेत. अभ्यास करताना विद्यार्थी टेबलावर कोपर टेकून तासन्तास वाचन अथवा लेखन करतात. यामुळे कोपराच्या टेकवल्या जाणाऱ्या भागावर म्हणजे ऑलिक्रेनॉन या हाडाला सूज येते. यास स्टुडण्टस् एल्बो म्हणतात. कधी कधी फार दुखत असल्यास किंवा त्यात पू झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. थोड्या प्रमाणात त्रास असल्यास कोपर टेकवून अभ्यास करणे बंद केल्यास हा प्रकार बरा होतो. कोपराच्या आतील बाजूस असलेली अल्रर चेता जर कोपराची सारखी हालचाल करून सुजली तर दुखू लागते व काही काळानी हातातील जोर कमी होतो. अशा वेळी अल्रर नर्वला योग्य जागा निर्माण करण्यासाठी कधी कधी शस्त्रक्रियाही करावी लागते.
महारोगासारख्या रोगाने जर अल्रर त्वचा जाड झाली तरीही रोगविरोधी औषधाबरोबरच या चेतेमध्ये झालेला पू बाहेर काढावा लागतो. थोडक्यात कोपराजवळच्या दुखण्यात अल्रर चेता या महत्त्वाच्या चेतेची वरच्यावर तपासाणी करावी.
.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply