कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. कर्णकर्कश ध्वनीमुळे बहिरेपणा येऊ शकतो त्याचबरोबर हृदयरोगीच काय सर्वच रुग्णांनाही त्याचा त्रास होतो.
झोपेवरही त्याचा खूपच वाईट परिणाम होतो. साउंड लेव्हल मीटरमध्ये ध्वनीचा दाब मोजला जात असतो, त्याचा उपयोग हा ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी केला जातो. आता नवीन मानकाप्रमाणे यात ए, सी, झेड फ्रिक्वेन्सी वेटिंगला महत्त्व दिले आहे. एक्सपोनेन्शियली अॅव्हरेजिंग साउंड लेव्हल मीटर मध्ये मायक्रोफोनचा एसी सिग्नल हा डीसीमध्ये रूपांतरित केला जातो व त्यासाठी रूट मीन स्क्वेअर म्हणजे आरएमएस सर्किट वापरले जाते.. आरएमएस सर्किटचे आउटपुट हे व्होल्टेजच्या स्वरूपात असते ते लॉगरिथमिक सर्किटमधून गेल्यानंतर डेसिबलचा आकडा मिळतो.
फ्रिक्वेन्सी वेटिंग व टाइम वेटिंगच्या माध्यमातून हा आकडा दिला जातो. साउंड लेव्हल मीटर हे एएनएसआय (अमेरिकेन मानके) व आयइसी (आंतरराष्ट्रीय अशा दोन मानके) प्रकारची असतात. एखादा आवाज मोठा किंवा कमी हे आवाजाच्या स्रोताकडून किती ऊर्जा प्रक्षेपित होते यावर ठरते कारण या ऊर्जेमुळेच हवेतील दाबात बदल होत जातात. ध्वनिलहरी स्रोतापासून निघाल्यानंतर हवेतून प्रवास करीत येतात त्यांचा दाब साउंड लेव्हल मीटरने मोजतात.
आवाजाचा हा दाब डेसिबलमध्ये मोजला जातो. लॉगरिथमिक मापनात जेव्हा आवाज १० डेसिबलने वाढतो, तेव्हा प्रत्यक्षात ती वाढ दहा पट असते वीस डेसिबलचा आवाज हा १० डेसिबलच्या आवाजापेक्षा दहा पट मोठा असतो तर ३० डेसिबलचा आवाज १० डेसिबलच्या १०० पट मोठा असतो. डेसिबल मोजमाप हे ८५ ते २०० डेसिबल दरम्यान असते. ८५ डेसिबलच्या पुढे आवाज गेल्यास श्रवणशक्ती कमी होत जाते. १२० डेसिबलला तर वेदना जाणवतात. पानांची सळसळ १० डेसिबलची असते.
आपले साधे संभाषण ४० डेसिबलचे, भांडण ५० डेसिबलचे, वाहतुकीचा आवाज ७० डेसिबलचा असतो. साउंड लेव्हल मीटरला वरच्या भागात एक काडीसारखा भाग असतो त्यावर मायक्रोफोन लावलेला असतो तेथे टिपला जातो. मोबाईलसारखीच एक चौकोनी डबी असते त्यात इलेक्ट्रॉनिक सर्किट असते; त्यामुळे मायक्रोफोनने टिपलेल्या आवाजाची मोजणी केली जाते. आवाजाचा आकडा दाखवण्यापूर्वी त्याचे फिल्टरिंग केले जाते, त्यामुळे हे मापन अधिक अचूक राहते. हे साधन हातात धरूनही वापरता येते. आता तर पोलिसांकडेही साउंड लेव्हल मीटर असतो.
Leave a Reply