नवीन लेखन...

साउथ आफ्रिका – भाग २

साधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला. शहरात तशी औद्योगिक वसाहत अशी फार मोठी नाही(आज देखील तेच प्रमाण आहे- फारसे नवे प्रचंड उद्योग-धंदे फारसे या शहरात नाहीत!!) अर्थात, खाद्य तेलाच्या प्रचंड रीफायनरिज इथे खूप आहेत आणि मी सुद्धा त्यातील एका कंपनीत होतो. इथे, सगळ्या प्रकारच्या वस्त्या आहेत, भारतीय, काळे, गोरे तसेच कलर्ड!! अर्थात, प्रत्येक समाज हा बहुतांशी स्वत:च्या वेगळ्या वस्तीत राहतो. हा वंशभेदाचा अनिवार्य परिणाम. पूर्वी, व्हाईट लोकांनी, प्रत्येक समाजाला एक ठराविक एरिया वाटून दिला होता आणि त्याप्रमाणे, तो समाज तिथे स्थिरावला. व्हाईट लोकांची वस्ती अर्थात, अधिक देखणी, सुरक्षित, हवेशीर आणि प्रशस्त!! असा प्रकार, अजूनही, साउथ आफ्रिकेतील प्रत्येक शहरात दिसून येतो. एकूणच हवा हीं थंड असल्याने, गोल्फ क्लब, पब्स, देखणी हॉटेल्स, या गोष्टीनी हे शहर वेढलेले आहे. आता, भारतीय वंशाचे लोक या शहरात आणि डर्बन येथे प्रचंड प्रमाणात राहतात आणि त्यामुळे, माझा या लोकांशी अधिक संबंध आला आणि हा समाज मला अधिक जवळून अनुभवता आला. मागे मी जे म्हणालो की, इथला भारतीय वंशाचा समाज हा अजूनही बराचसा मानसिकदृष्ट्या दुभंगलेला आहे, याचे तंतोतंत प्रत्यंतर मला हर घडी आणि हर क्षणी घेता आले.

मी ज्या कंपनीत होतो, त्या कंपनीत, हिंदू( इथे एक विचित्र प्रथा आहे. इथला हिंदू समाज दोन गोष्टीत विभागाला गेला आहे.१- हिंदू आणि २- तमिळ!!) पुरुष/ मुली होत्या तसेच, मुसलमान, व्हाईट, कलर्ड असे एकूण वेगवेगळ्या समाजातील एक संमेलनच होते. आणि त्यावेळची माझी झालेली मते, आजही तितकीच ठाम आहेत. विशेषत: तरुणांबद्दलची मते!! इथाल्स भारतीय समाज हा एक बाजूने पाश्चात्य संस्कृतीने आकर्षित झालेला आहे तर दुसऱ्या बाजूने प्रचंड प्रमाणात बुवाबाजीत अडकलेला आहे. सत्य साईबाबा हे इथले परम आदराचे स्थान!! एकूणच भारतातील स्वामी, गुरु याबद्दल इथे आजही प्रचंड आकर्षण आहे. इथे, हिंदूंचे सण वेगळे आणि तमिळ लोकांचे सण वेगळे, देवळे वेगळी, रिती रिवाज देखील वेगळे. पण, एकूण मानसिक घडण बघितली तर काही फारसा फरक आढळत नाही. तसेच व्हाईट लोकांचे अंधानुकरण(वाईट अर्थाने!!) आणि भारतातील बुरसटलेल्या चालींचे उदात्तीकरण, असा थोडक्यात सारांश सांगता येईल. एक उदाहरण देतो. GOOD Friday हा मुळातला ख्रिश्चन लोकांचा उत्सव आहे पण इथे भारतीय समाज अत्यंत भाविकतेने हा सण साजरा करतात. त्या दिवशी, काही लोकांच्या “अंगात” येते, दिवसभर असे अंगात आलेले लोक, एका धुंद अवस्थेत वावरत असतात. संध्याकाळी, मग हे लोक, जिभेत तारेचा आकडा अडकवतात, पाठीवर तार खोचून त्यात मग फळे, फुले गुंफतात, अगदी डोळ्याच्या पापण्यात देखील तार खुपसून त्यात फळे अडकवतात आणि अशा पुरुष/स्त्रिया यांची संध्याकाळी मिरवणूक निघते ती जवळपास, संपूर्ण भारतीय लोकांच्या वस्तीभर!! वाटेत, काही भाविक(काही नव्हे- बरेच भाविक!!) या माणसांच्या पाया पडतात!! इथल्या भाविक लोकांच्या मते, असे अंगात आलेले लोक, हीं देवाचीच मानवी रूपे आहेत!! त्यांच्या पाया पडल्यावर, मग हीं देवाची रूपे, त्या भाविकांच्या कपाळावर, उदी/भस्म लावतात आणि त्याने कृपाप्रसादाने, भाविक लोक गहिवरून जातात. नंतर, मिरवणूक संपली की, हिंदू मंदिरात खरा पुढचा समारंभ असतो.

मिरवणूक देवळात येईपर्यंत देवळाच्या प्रसादात, कोळसे/ लाकडे पेटवलेली असतात. ती पुरेशी पेटली(अगदी ज्वलंत निखारे!!) की मग हीं देवाची रूपे आणि इतर काही भाविक लोक त्यावरून अनवाणी पायाने हळूहळू किंवा भराभर(ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे!!) चालतात. मला, पाहिल्यावर एक वयस्कर गृहस्थाने,’ आम्ही(म्हणजे भारतीय लोक!!) किती आस्थेवाइकपणे भारतीय परंपरांचे पालन करीत आहोत” असे ऐकवले!! त्यावेळी, मी न राहवून त्याला विरोध दर्शविला पण माझे बोलणे त्याला अजिबात आवडले नसल्याचे, मला जाणवले. नंतर, हा विषय मी माझ्या ऑफिस मधील भारतीय लोकांशी काढला, तेंव्हा तरं त्यांनी मला वेड्यातच काढले!! इथले भारतीय लोक कमालीचे भारतीय परंपरांचे अंधानुकरण करण्यात पुढे आहेत, त्यात काही वैचारिक भाग नाही की साधे तत्व देखील आढळत नाही. त्यांची या सर्व कर्म कान्डावर कमालीची श्रद्धा आहे. आज भारतात देखील कितपत, अशा मागासलेल्या परंपरांचे जतन केले जाते, मला शंका आहे, इथे मी शहरी भागाबद्दल बोलत आहे. जगन्नाथाचा रथ प्रसंगी, भारतातील गावात असे प्रकार चालतात, याची कल्पना आहे पण तो समाजच गतानुगतिकतेच्या गाळात रुतलेला आहे. इथला भारतीय समाज, स्वत:ला उच्च शिक्षित(म्हणजे काय!! हा एक वेगळा प्रश्नच आहे!! पण, त्याचे उल्लेख पुढे होईलच!!) समजतो, आधुनिक जगाच्या बरोबरीने वावरतो, असे मानतात आणि अशा ठिकाणी, अशा अंध श्रद्धा कमालीच्या भाविकतेने पाळल्या जातात!!

भारतातील स्वामीबद्दल तरं, काही बोलायचीच सोय नाही!! त्याच्या चरणी, आपली अक्कल किती गहाण टाकायची, याची जणू स्पर्धाच लागलेली असते!! इथे आपल्यासारखी उपासाची पद्धत आहे, म्हणजे आपण जसे, उपासाचे खास वेगळे पदार्थ करतो, तसा काही प्रकार नसून, या महिन्यात( साधारणपणे दिवाळीपूर्वी महिनाभर हा महिना येतो) या दिवसात फक्त नॉन-वेज पदार्थ करायचे नाहीत की खायचे नाहीत. ड्रिंक्स मात्र चालतात!! ड्रिंक्स पिण्यात मात्र हे भारतीय, कमालीचे तरबेज आहेत. अगदी, स्पर्धाच लागल्यासारखी, ड्रिंक्स ढोसत असतात आणि त्याचा अभिमान बाळगत असतात!! मग, काकुळतपणे आडवे होणे, नशेत बरळत राहणे इत्यादी अश्लाघ्य प्रकार होतच राहतात.  हे एक प्रातिनिधिक दृश्य म्हणून मानायला हरकत नाही.

— अनिल गोविलकर 

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..