साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही. इथली हवामानाची एक फार सुंदर मजा आहे. समजा, सतत २ ते ३ दिवस कडक(इथल्या मानाने!!) उन पडले की साधारणपणे, चौथ्या दिवशी हमखास पाऊस हा पडतोच. पाऊस जरा जरी शिंपडला तरी सगळे हवामान लगेच बदलून जाते. पण, इथे मुंबईसारखा सतत ३,४ दिवस पाऊस कोसळत आहे, असे घडत नाही. अगदी, एखादे दिवशी दणकून पाऊस पडला, तरी त्याचा जोर फार तर दिवसभर किंवा थोडा जास्त!!
त्यामुळे, एकूणच धूळ आणि धुळीचा त्रास, जवळपास नसतोच. एकतर, इथे धुळीचे प्रमाण तसे कमीच असते. अगदी, साधे रस्ते जरी बघितले तरी, रस्त्याच्या बाजूने, सिमेंटने बांधलेले पदपाथ असतात, त्यामुळे, धुळीचा संसर्ग होण्याची शक्यताच मावळते. Highways तर केवळ अप्रतिम!! अर्थात, हीं सगळी development गोऱ्या लोकांनी केलेली. मुळात, इथले हवामान, युरोप सदृश असल्याने, युरोपमधून गोरे लोक इथे काही शतकांपूर्वी स्थाईक व्हायला आले. सोन्याच्या खाणींचा शोध हा नंतरचा!! त्यांनीच हा देश अक्षरश: घडवलेला आहे. शहरे वसवलेली आहेत. विशेषत: जर्मनी, ब्रिटीश आणि डच लोक इथे फार भेटतात. आता, तसा त्यांचा मूळ देशाशी फारसा संपर्क राहिलेला नाही, पण अजूनही त्यांनी स्वत:ची भाषा मात्र टिकवून ठेवलेली आहे.
इथली म्हणून, आफ्रिकान्स नावाची राष्ट्रीय भाषा आहे पण तिच्यावर, डच भाषेचा जबरदस्त प्रभाव आहे. साधारणपणे, तुम्हाला जर इंग्रजी चांगल्यापैकी बोलता येत असेल तर, या देशात तुमचे काही अडू नये. आफ्रिकान्स भाषा देखील सर्वत्र बोलली जात नाही. भारतीय वंशाचे लोक, आजही इंग्रजी भाषाच बोलणे पसंत करतात. आफ्रिकान्स भाषा हीं साधारणपणे, गोरे आणि काळे लोक, यांच्यात प्रसिद्ध आहे. त्यातून, डर्बन आणि आजूबाजूच्या परिसरात ZULU भाषेचा प्रभाव आहे. ती मात्र शिकणे फार अवघड आहे. मला थोडे फार, आफ्रिकान्स शब्द आता बोलता येतात.
समजा इथे स्थायिक व्हायचे असेल तर मात्र या भाषा शिकणे, जास्त सोयीस्कर पडते. इथे अजूनही, “स्थायिक होणे” हीं गोष्ट जमण्यासारखी आहे. मी, स्वत: इथला “Permanant Resident” आहे आणि माझ्याकडे, इथले तसे परमिट आहे. त्यामुळे, या देशात, आता मी मनात येईल तितके दिवस राहू शकतो, कधीही भारतात परतू शकतो आणि परत या देशात येऊ शकतो. मला व्हिसाची गरज नाही. त्याचे असे झाले, मी जेंव्हा इथे १९९९ साली पाच वर्षे पूर्ण केली, तेंव्हा मला Home Affairs कडून पत्र आले की, जर का या देशात राहायचे असेल तर, ID (Identity Document) साठी apply कर, अन्यथा देश सोडावा लागेल. मग, काय लगेच निर्णय घेतला आणि इथली Permanant Residency मिळवली. इथले ID म्हणजे, अमेरिकेच्या भाषेतील Green Card!!
आता मात्र, मला या देशाची चांगलीच सवय लागलेली आहे. इथे जर का तुम्ही, तुमच्या आयुष्याचा सूर जरा खालच्या पट्टीत ठेऊन राहिलात, तर मात्र फारसा त्रास होत नाही. या देशात, भारताच्या मानाने राहण्याच्या सुविधा खरोखरच अप्रतिम आहेत. इथे, कार घेणे जरी अत्यावश्यक असले तरी सहज जमू शकते. अगदी, ज्या गाड्या भारतात, Luxury म्हणून गणल्या जातात, त्या गाड्या इथला सर्व सामान्य माणूस सहज वापरतो. इथे Volks Wagon, BMW किंवा Mercedes सारख्या भारतात महाग म्हणून गणल्या जाणाऱ्या गाड्या, इथला मध्यमवर्गीय माणूस वापरत असतो!! घरे देखील अति प्रशस्त असतात. एकूणच, इथे भारताप्रमाणे गगनचुंबी इमारती, ऑफिसेसच्या वगळता फारच तुरळक आढळतात. बहुतेकजण इथल्या भाषेत, House मध्ये राहत असतात.
आपल्या सारखी Flat व्यवस्था इथे फार थोड्याप्रमाणात आढळते. बहुतेकजण, आपले स्वतंत्र घर घेऊनच राहत असतो. अर्थात, प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, घर असते, तो भाग वेगळा. पण, साधारणपणे, मध्यमवर्गीय माणूस, २ ते ३ बेडरूम अशा घरात राहत असतो. मुळात, भारताच्या मानाने लोकसंख्या फारच कमी आणि त्यामानाने प्रचंड जागा उपलब्ध असल्याने, घराच्या किमती, भारताच्या मानाने फारच नगण्य असतात. त्यातून, इथे लोन सिस्टीम फारच सोपी आणि सहज आहे. त्यामुळे, तुम्हाला एकदा का नोकरीचे हमीपत्र मिळाले की, लगेच बहुतेकजण, गाडी आणि घर, याची सोय आधी करतात आणि आयुष्यात स्थिरावायला सुरवात करतात.
सध्या तर इथे, Real Estate Business फारच घसरला असल्याने, घराच्या किमती अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत. पेट्रोलदेखील भारताच्या मानाने स्वस्त असल्याने, कुठेही जायचे झाल्यास, गाडीने जाणे सहज परवडते. त्यातून रस्ते अप्रतीम्म असल्याने, गाड्यांची झीज देखील फार होत नाही आणि गाड्या १०० ते १२० या स्पीडने धावू शकतात. मी तर कितीतरी वेळा, जोहानसबर्ग ते डर्बन हे ६०० कि.मी अंतर फक्त ६ तासात संपविलेले आहे.
इथे, इंडियन स्टोर्स प्रत्येक शहरात आहेत आणि तिथे, तुम्ही म्हणाल ते भारतीय जिन्नस हवे तेवढे उपलब्ध असतात. आता, अतिशयोक्ती करायची नाही, असे ठरविले तरी देखील, मी जो बासमती तांदूळ घेतो, तो मी भारतात बघितलेला देखील नाही. तसेच, खाण्याचे इतके पदार्थ मार्केटमध्ये मिळत असतात कि, कुठला घेऊ नि कुठला टाळू, असा संभ्रम मला आजही पडतो!! विशेषत: ब्रेड, बटर आणि चीज यांचे अगणित प्रकार मिळतात. तोच प्रकार दुध आणि तत्सम जिन्नस. तसेच, इथली अप्रतिम हॉटेल्स आणि पब्स!!
माझा इथला एक ग्रुप, आम्ही, अगदी महिन्यातून एकदा तरी एकत्र जमतो आणि ती संध्याकाळ एखाद्या हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये घालवतो. मग ते हॉटेल रस्त्याच्या कडेला देखील असते किंवा एखाद्या मॉलमध्ये!! इथल्या पबला गुत्ता म्हणणे अशासारखा दुसरा अपमान नसावा!! अतिशय शांत आणि अत्यंत व्यवस्थित जागा असते. नुसता बियरचा एक ग्लास घेऊन जरी बसलो तरी वेळ कसा निघून जातो, ते लक्षात देखील येत नाही. गप्पा मारायला अतिशय योग्य जागा!! इथे KEG या नावाने, पबची एक चेन आहे आणि त्याचा दर्जा खरोखरच अनुभवण्यासारखं असतो. साधारणपणे, चित्रपटात(इंग्लिश!!) ज्याप्रमाणे Irish पब दाखवला जातो, त्याच धर्तीवर हे पब्स असतात. मी, सेंच्युरीयन इथे राहत असताना, माझ्या कॉम्प्लेक्स समोरच KEG चा एक पब होता(तो पब अजूनही आहे!!) आणि, मी कितीतरी संध्याकाळ त्या पबमध्ये अविस्मरणीय अशा घालवल्या आहेत.
साउथ आफ्रिकेत आयुष्य कसे जगावे, हे चांगल्याप्रकारे शिकता येते, अर्थात, जर का युरोपियन किंवा अमेरिकन पद्धतीने आयुष्य काढायचे असेल तर. पण, जर का चाळसंस्कृती प्रमाणेच आयुष्य काढायचे असेल तर, साउथ आफ्रिका हीं जागा नव्हे!! इथे भौतिक सुखाच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत, फक्त मानसिक शांती मात्र फार तुरळकरित्या लाभते. सतत, पैसा आणि पैसा, याच्याच मागे लागावे लागते. सतत, घड्याळाप्रमाणे आयुष्य बांधावे लागते, एकदा का त्या गतीशी जुळवून घेतले, कि मग काही फारसा त्रास होत नाही, अन्यथा तुमची फरफट होणारच!! गतीच्या आयुष्याचा अधिक अनुभव हा जोहानसबर्ग इथे जास्त जाणवतो. डर्बन, केप टाऊन आणि इतर शहरे इतकी वेगवान नाहीत पण, जोहानसबर्ग मात्र खूपच वेगवान आहे.
-अनिल गोविलकर