चिमणी
चिमणी (हाउस स्पॅरो) आणि पीतकंठ किंवा रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील हाउस स्पॅरो अर्थात तुमच्या आमच्या परिसरात दिसणारी चिमणी सध्या कमी होत आहे. ही चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. मात्र, शहरी भागापेक्षा आता या चिमण्यांची संख्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे खाद्य यामुळे हा चिवचिवाट कमी झाला आहे. चिमण्यांचे मुख्य अन्न म्हणजे बिया, भात, गहू, बाजरी हे आहे. मात्र, शहरात चिमणीला हे खाद्य मिळेनासे झाले. तेच गावाकडे घरातील महिला धान्य निवडतानाही चिमणीला ते घालते. त्यामुळे चिमण्यांची मुख्य गरज पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हजारोंच्या संख्येने चिमण्या दिसतात.
रान चिमणी
शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.
नर चिमणी
या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते.
मादी चिमणी
ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणत: ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.
Leave a Reply