विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म १८ मार्चला झाला.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघाचे विधानसभेत अनेकवर्षे प्रतिनिधीत्व केले. हा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून ते विधान परिषदेवर आहेत. फलटणचे नगराध्यक्ष ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आता विधान परिषदेचे सभापती असा त्यांचा देदिप्यमान प्रवास राहिला आहे.
राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांनी पराभव कधी पाहिला नाही. 1995 पासून आतापर्यंत कायम “लाल दिवा’ असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर होय.
पुण्यातील गरवारे कॉलेज व फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून एमएसस्सी केले. त्यानंतर त्यांनी एलएलएम ही कायद्यातली पदवी मिळविली.१९९१ मध्ये ते फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. १९९५ मध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. राज्यातील अपक्ष २२ आमदारांना एकत्र करून रामराजेंनी शिवसेनेचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्याच कालावधीत फलटणमध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी व रामराजेंनी फलटणमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामध्ये रामराजेंना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष केले.
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. २००४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले. २०१३ मध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत.
रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठी मजल मारली. राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीपदापर्यंत पोहचून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने वाटचाल करण्याची भूमिका घेतली. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. रामराजेंच्या या वाटचालीत त्यांच्या पत्नी वैदेहीराजे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply