आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला.
होय. मीच ईश्वर आहे. आणि तुम्ही देखील ईश्वरच आहात. फरक फक्त ईतकाच आहे की मी हे ओळखलंय, आणि तुम्ही अजुन ओळखलेलं नाहीय!” अशी स्पष्टोक्ती करणाऱ्या सत्यसाईबाबा वयाच्या चौदाव्या वर्षीच स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार असल्याचं सांगायला लागले. एवढंच नाही तर ते स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचं पूर्व शरीर असल्याचं सांगायचे.
पुट्टपर्ती येथे ईश्वराम्मा आणि पेद्दवेंकम्मा राजू रत्नाकरम या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले सत्यनारायण राजू. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला. वरवर पाहता अतिशय थोतांड वाटत असल्या, तरी जगभरातील २०० देशात वसलेल्या कोट्यावधी साईभक्तांची या कथेवर मनापासून श्रद्धा आहे. त्यांच्या मते सत्यसाईबाबांना जगातल्या अनेक भाषा अवगत आहेत. त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त आहे. त्यांच्या ठायी दिव्यतेज आहे, आणि त्यामुळेच अनेक चमत्कार ते लिलया करतात. पुढे सत्यनारायण राजू हा सत्य साईबाबा झाला.
आपल्या चमत्कारांमुळे प्रसिद्ध असलेल्या सत्य साईबाबांचा भक्त परिवार देशातच नाही तर परदेशातही पसरलाय. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी या जन्मगावी त्यांचं मोठं आश्रम आहे. इथला दवाखाना मोफत औषधोपचारामुळे सर्वसामान्यांमधे खूप प्रसिद्ध आहे. मोठमोठे राजकारणी, श्रीमंत भक्त यांना ते हवेतून सोनंनाणं यासारख्या गोष्टी प्रकट करून द्यायचे. त्यांचे हे हवाई चमत्कार वादात अडकले.
भारतातील प्रथम दर्जाचे राजकारणी, मंत्री, न्यायाधीश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, मॉरिशस ह्या देशांचे पंतप्रधान, ग्रीक देशाचे माजी पंतप्रधान, स्पॅनिश राजघराणे, वकील, डॉक्टर्स आणि सामान्य जनता हे सर्व त्यांचे अनुयायी आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमूख, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे भक्त होते.
मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सत्यसाईंना वर्षा बंगल्यावर बोलावल्यावरून खूप टीका झाली होती. जगभरातील १६६ देशांत सत्यसाईबाबांचे सेवाकार्य पसरले आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा सामान्यांना देण्यासाठी सत्यसाई विद्यापिठ आणि ट्रस्ट कार्यरत आहेत. विद्यापिठाच्या पुट्टपर्ती, अनंतपूर आणि बंगळूर येथील कॅम्पसने नॅक मुल्यांकनात ‘ए प्लस प्लस’ हे नामांकन मिळवले आहे (आपल्याकडे बि किंवा बि प्लस मिळवणारी महाविद्यालये बोटावर मोजण्याईतकी आहेत). भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारे श्री सत्यसाई मिरपूरी कॉलेज ऑफ म्युझिक हेच विद्यापिठ चालवते.
१९७७ साली बंगलोर येथे श्री सत्यसाई जनरल हॉस्पीटलची स्थापना करण्यात आली. आजवर या रूग्णालयातून २० लाख रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. १९९१ साली पुट्टपर्तीमध्ये, २००१ साली बंगलोरमध्ये आणि दोन मल्टीसुपरस्पेशालीटी हॉस्पीटल्स उभी झाली. आजवर अडिच लाखाच्या वर अतीशय कठीण शस्त्रक्रीया या माध्यमातून करण्यात आल्यात. ट्रस्टच्या कुठल्याही रूग्णालयात रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना एक पैसाही खर्च येत नाही, रहाणे खाण्याच्या खर्चापासून ते शस्त्रक्रियेच्या खर्चापर्यंत सर्व पैसा ट्रस्टच्या माध्यमातून येतो. याव्यतीरिक्त अनेक साधारण दवाखाने, मोबाईल व्हॅन्स, आणि डोळ्यांचे दवाखाने ट्रस्ट सेवाकार्य म्हणुन चालवते.
खार पाणपट्ट्यातील दुष्क़ाळग्रस्त जनतेला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या योजना म्हणजे सत्यसाईबाबांच्या सेवाकार्यातील मैलाचा दगड मानाव्या लागतील. अनंतपूर जिल्ह्यातील ७३० दुष्काळग्रस्त गावांना दत्तक घेऊन त्यातील बारा लक्ष लोकांना लोकांना १९९६ पासुन अविरत पिण्याचे पाणी पुरवल्या जाते आहे. २००४ पासून सत्यसाई गंगा कॅनल च्या माध्यमातून अवघ्या चेन्नई शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. याव्यतिरिक्त मेडक जिल्ह्यातील १८० गावातील साडेचार लाख लोक, आणि महबुबनगर जिल्ह्यातील १४० गावातील साडेतीन लाख लोक सत्यसाई सेवा ट्रस्टच्या माध्यमातूनच पिण्याचे पाणी अविरत प्राप्त करत आहेत.
२००८ मध्ये ओरीसातील पुरग्रस्त लोकांना मदत म्हणुन संस्थेने तेथे कार्य सुरू केले आणि एक वर्षभरात सोळा गावांचे स्वप्नवत पुनर्वसन केले. याशिवाय जगभर पसरलेल्या सत्यसाई बाल विकास प्रकल्पाच्या शाळा भारतीय संस्कृतीचा प्रचारप्रसार करत आहेत.
सत्य साईबाबा यांचे २४ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply