नवीन लेखन...

स्पॉट लाईट

जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते. बंकर म्हणजे जहाजासाठी लागणारे इंधन मग त्यामध्ये जहाजाला लागणारे हेवी फ्युएल ऑईल म्हणजे क्रूड ऑइल मधून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, नाफ्ता आणि इतर हलके पेट्रोलियम पदार्थ काढून झाल्यावर इंधन म्हणून वापरता येईल असे जड आणि घट्ट ऑईल जे सुमारे १२५° सेल्सियस तापमानाला तापवले की जहाजावरील मेन इंजिन सह जनरेटर व बॉयलर मध्ये वापरता येते. हेवी फ्युएल ऑईल सह डिझेल सुध्दा घेतले जाते. हेवी फ्युएल ऑईल मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात जसे डिझेल मध्ये हाई स्पीड किंवा नॉर्मल डिझेल असते आणि पेट्रोल मध्ये अनलिडेड वगैरे तसे. या सर्व प्रकारच्या इंधनांच्या किमतीत खूप फरक असतो. जहाजाच्या इंजिनला वापरता येण्यासारखे सर्वात स्वस्त असे इंधन घेतले जाते पण यूरोप मध्ये पर्यावरण विषयक नियम कठोर असल्याने तेथे फक्त चांगल्या दर्जाचे इंधन वापरले जाते. जहाज युरोपियन पोर्ट मध्ये गेल्यावर तर फक्त डिझेलचा इंधन म्हणून वापरण्याची सक्ती असते.

सकाळी जिब्राल्टर मध्ये दोन प्रकारचे हेवी फ्युएल ऑईल एका ग्रेड चे 300 टन आणि दुसऱ्या हलक्या ग्रेडचे 600 टन आणि 100 टन डिझेल घ्यायचे होते. डिझेल व हेवी फ्युएल ऑईल च्या किमतीत साधारण 20 ते 25 रुपयांचा फरक असतो. एका मोठ्या जहाजावर समुद्रात असताना जेव्हा मेन इंजिन सुरू असते तेव्हा दिवसाला साधारण तीस ते पस्तीस टन म्हणजे 30 ते 35 हजार लिटर इंधन वापरले जाते. जहाज पोर्ट मध्ये उभे असताना आठ ते दहा हजार लिटर इंधन वापरले जाते. सकाळी अकरा वाजता बंकर ऑपरेशन सुरु होऊन संध्याकाळी सहा वाजता बंकर सप्लाय करणाऱ्या बार्ज मधून डिझेल सप्लाय पूर्ण झाल्याचे सांगितले आणखीन पंधरा मिनिटांनी हेवी फ्युएल ऑईल सुध्दा पूर्ण झाल्याचे सांगितले. पण सगळ्या टाक्यांमध्ये तपासले असता दोन टन म्हणजे दोन हजार लिटर डिझेल कमी मिळाले तसेच हेवी फ्युएल ऑईल सुध्दा दहा टन म्हणजे जवळपास दहा हजार लिटर कमी मिळाल्याचे लक्षात आले. चीफ इंजिनियर ने सप्लाय करणाऱ्या बार्ज च्या कॅप्टन ला याबद्दल विचारले असता त्याने सांगितले आमच्याकडून बरोबर सप्लाय करण्यात आला आहे तुम्ही जहाजावर पुन्हा तपासून घ्या. चीफ इंजिनियर ने आमच्या कॅप्टन ला जहाज अजून किती वेळ थांबवू शकतो ते विचारले कॅप्टन ने आणखीन सात ते आठ तासाने निघालो तरी चालेल असे सांगितले. सव्वा सहा वाजता सप्लाय बंद झाल्यानंतर अर्ध्या तासाने सप्लाय करणाऱ्या बार्ज कडून काय झाले म्हणून विचारण्यात आले चीफ इंजिनिअर ने सांगितले आम्ही तपासतो आहोत. पुन्हा अर्ध्या तासाने सव्वा सात वाजता विचारल्यावर चीफ इंजिनियर ने पुन्हा तेच उत्तर दिले. मग दहा मिनिटांनी बार्ज च्या कॅप्टन ने पुन्हा सप्लाय सुरू करत आहोत अशी माहिती दिली पण त्याबदल्यात सिगारेटची पाकिटे मागितली. चीफ इंजिनियर हसत हसत म्हणाला पाच हजार अमेरिकन डॉलर किमतीचे इंधन कमी दिले आणि सिगारेट मागतोय. चीफ इंजिनियर ने जास्त कटकट नको म्हणून दहा बारा सिगारेटची पाकिटे पाठवून दिली. कारण आमच्या जहाजाच्या मागे दुपारी एक जहाज इंधन भरण्यासाठी येऊन थांबले होते. आम्हाला सप्लाय केल्यानंतर त्या जहाजाला हीच सप्लाय बार्ज इंधन द्यायला जाणार होती. त्या जहाजाला जायची घाई असल्याने त्यांनी सप्लाय करणाऱ्या बार्ज च्या हेड ऑफिस मध्ये फोन करून तगादा लावल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पुढील अर्ध्या तासात पूर्ण इंधन मिळाले आणि पेपरवर्क पूर्ण करून जहाज पुढे निघाले.

आमच्या जहाजावर पोर्ट आणि स्टार बोर्ड म्हणजे जहाजाच्या उजवीकडे आणि डावीकडे इंधना साठी कमी जास्त आकारमानाच्या प्रत्येकी दोन दोन अशा चार मोठ्या टाक्या तसेच डिझेल साठी इंजिन रूमच्या तळाशी तीन किंवा चार टाक्या असतात. वेगवेगळ्या ग्रेड चे हेवी फ्युएल ऑईल वेगवेगळ्या टाक्यांमध्ये घेतले जाते. हजारो टन इंधन घेतल्याने जहाज कधी कधी एका बाजूला झुकायला लागते मग त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला बलास्ट वॉटर म्हणजेच जहाज सरळ ठेवण्यासाठी काही टाक्यांमध्ये समुद्राचे पाणी घेतले जाते किंवा कार्गो असलेल्या टाक्यांमध्ये ऑईल कमी जास्त प्रमाणात घेतले जाते.

फोर्थ इंजिनिअर असल्याने इंधन घेण्यासाठी सगळं पेपर वर्क आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत चीफ इंजिनिअर सोबत थांबावे लागते. सकाळी आठ वाजल्यापासून रात्रीचे नऊ वाजले. जिब्राल्टर पासून पुढे खोल उत्तर समुद्रात जहाज जाईपर्यंत साधारण साडे दहा वाजले. रात्री केबिन मध्ये जायच्या पहिले मोकळ्या हवेत मेन डेकवर रेंगाळलो स्वच्छ चंद्रप्रकाश आणि चांदण्यात समुद्राला एक प्रकारची लकाकी आल्यासारखं भासत होते. पाण्यावर पडलेला सौम्य प्रकाश लाटांसह हेलकावत असल्यासारखा दिसत होता. जहाजावर आदळणाऱ्या लाटा मंजुळ स्वरात एखादं गीतच गात आहेत असं ऐकताना वाटत होते. थंडी वाजायला लागल्याने दहा पंधरा मिनिटात केबिन मध्ये जाऊन झोपायची तयारी केली.

सकाळी जाग आल्यावर पोर्ट होल मधून बाहेरचे दृश्य पाहिले आणि केबिन बाहेर पडलो. बाहेर डेकवर आल्यावर थंडगार वारा झोंबायला लागला. युरोप मध्ये थंडीला सुरुवात झालीच होती पण रात्री पेक्षा सकाळी जास्त थंडी जाणवत होती. सूर्य हळू हळू क्षितिजावर चढायला लागला होता. नाट्यगृहात कलाकारावर स्पॉट लाईट मारला जातो तेव्हा संपूर्ण नाट्यगृहाचे लक्ष त्या स्पॉट लाईट मधल्या कलाकारावर केंद्रित झालेले असते. आज सकाळी सकाळी क्षितिजावर चढणाऱ्या सूर्याकडून समुद्राच्या रंगमंचावर एक सोडून अनेक स्पॉट लाईट ढगाळ पडद्या आडून सोडल्या सारखे दिसत होते. अथांग निळ्या समुद्राच्या रंगमंचावर स्वतः सूर्यदेव जेव्हा स्पॉट लाईट मारतो ते विहंगम व अनोखे दृश्य खरोखरच बघण्यासारखं असतं. जहाजापासून थोड्या अंतरावर एक मोठा देवमासा त्याची मोठी शेपटी पाण्याबाहेर काढून हळुवार पणे आपटत होता त्यामुळे उठणारे जलतरंग आणि त्यावर काळया पांढऱ्या‌ ढगांच्या आडून बाहेर पडणारे सोनेरी प्रकाशाचे झोत खूप सुंदर आणि मोहक दिसत होते. अथांग निळ्या समुद्राच्या रंगमंचावर देवमासा आपली कलाकारी दाखवत होता आणि वरून साक्षात सूर्यदेव त्याच्यावर स्पॉट लाईट मारत होता.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B.E. (mech)DIM

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..