मराठीत मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या बालरंगभूमीवरून आल्या आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. स्पृहा जोशी ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये कामे करत आहे. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण केले. स्पृहा जोशी हिला मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार २००३ साली मिळाली होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.
प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने पैसा पैसा, लॉस्ट अॅाण्ड फाउड, बायस्कोप ‘मोरया’, ‘मायबाप’, आणि ‘पेईंग घोस्ट’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी स्पृहाची इच्छा आहे. एक अभिनेत्री आणि कवयित्री असण्यासोबतच स्पृहा जोशीला आता एक नवी ओळख मिळत आहे. स्पृहा आता एक गीतकारही झाली आहे. स्पृहाने काही सिनेमांसाठी गीतलेखन सुद्धा केलं आहे. त्यामुळे ती एक गीतकार म्हणूनही लोकप्रिय होत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply