स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते.
पोलादाला स्टेनलेस बनवण्याकरिता त्यात कमीत कमी १२ टक्के इतका क्रोमिअम हा धातू मिसळावा लागतो. पोलादातल्या क्रोमिअमची हवेशी प्रक्रिया होऊन क्रोमिअम ऑक्साइड तयार होते. या क्रोमिअम ऑक्साइडचा एक अतिपातळ थर पोलादाच्या पूर्ण पृष्ठभागावर पसरतो. हा थर कठीण असतो आणि पोलादाच्या पृष्ठभागाला घट्ट चिकटून बसलेला असतो. या थरामुळे आतल्या लोखंडाचा हवेशी संपर्कच येत नाही आणि ते गंजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. क्रोमिअम ऑक्साइडचा थर धातूप्रमाणेच चकाकणारा असल्यामुळे स्टेनलेस स्टील छान चकाकते.
स्टेनलेस स्टील गंजत नाही असे म्हटले तरी घराघरातून सांगितले जाते की स्टीलच्या वाटीला भोके पडतात. न गंजणाऱ्या धातूचे असे का व्हावे? याचे कारण म्हणजे क्रोमिअम ऑक्साइडचा थर जरी कठीण असला तरी रोजच्या वापरामध्ये भांड्यांच्या पृष्ठभागाला चरे पडतात. यात हा थर फाटतो. परंतु जोपर्यंत आतल्या भागाचा ऑक्सिजनशी संपर्क असतो तोपर्यंत नवा थर लगेच तयार होत राहतो. लोणचे किंवा मीठ बरेच दिवस वाटीत राहिले की वाटीच्या तळाशी ऑक्सिजनचा अभाव उत्पन्न होतो. शिवाय मिठातल्या क्लोरिनमुळेही गंजण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढलेला असतो. अशा अवस्थेत ऑक्सिजन न मिळाल्याने क्रोमिअम ऑक्साइडचा नवीन थर तयार होऊ शकत नाही आणि वाटीची गंजण्याची प्रक्रिया सुरू होते.
स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमिअमशिवाय निकेलसुद्धा मिसळला जातो. कमीत कमी ८ टक्के निकेल असलेले स्टेनलेस स्टील नायट्रिक ऍसिडसारखी रसायने आणि अतिशीत तापमानाचे वायू साठविण्यासाठी वापरली जातात.
Leave a Reply