काळा घोड्यानंतर मुळ जागेवरून हलवलेल्या ‘क्विन व्हिक्टोरीया’च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही..
‘काळा घोडा’ चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या दिशेने समोरच ‘सीटीओ’ची म्हणजे आपल्या ‘तार ऑफीस’ची इमारत आहे (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या इमारतीत सुरू झालं. कालांतराने १९१०-११ सालात ते सीएसटी शेजारच्या सध्याच्या भव्य इमारतीत नेण्यात आलं). ‘तारायंत्र’ बंद झालं असलं तरी इमारतीचं ‘सीटीओ’ नांव अद्याप कायम आहे. या इमारतीच्या मागे स्वराज्यात बांधलेली ‘एमटीएनएल’ची इमारत व या इमारतीच्या मागे असलेली ‘टाटा टेलीकम्युनिकेशन्स’ची भव्य इमारत व त्यावरचा उंचं टॉवर आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे..‘टाटा टेली.’ म्हणजेच पूर्वाश्रमीचं ‘व्हिएसएनएल’चं ऑफीस..
तर, हे टाटा टेलिकम्युनिकेशन्सच ऑफीस ज्या जागी आहे, बरोबर त्याच जागी इंग्लंडची तत्त्कालीन महाराणी ‘हर हायनेस व्हिक्टोरीया’ हीचा शुभ्र संगमरवरात घडवलेला सिंहासनाधिष्ठीत आणि उंच संगमरवरी मखरात बसवलेला पुतळा होता..मखराची उंची ४०-४२ फुट होती तर सिंहांसनासहीत पुतळ्याची उंची १५-१६ फुट येवढी होती. सबंध मुबईत त्याकाळी येवढा सुंदर पुतळा दुसरा नव्हता असा उल्लेख श्री. शिंगणे यांच्या पुस्तकात सापडतो (सोबत पुतळ्याचा त्याच जागचा जुना फोटो पाठवतआहे.)..
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांचे पुतळे दृष्टीआड करण्याची जी टूम निघाली, त्यात इतर पुतळ्यांप्रमाणे हा पुतळादेखील मुळ जागेवरून हलवून त्याची रवानगी भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियममधे करण्यात आली..
मी नुकताच हा पुतळा पाहून आलो..भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या ‘इस्ट लॉन’वर झाडांच्याखाली अगदी उघड्यावर ब्रिटीशांचे सात-आठ पुतळे हारीने मांडून ठेवलेयत, त्यात मध्यभागी हा पुतळा आहे.. गेली अनेक वर्ष उन-वारा-पाऊस व पक्ष्यांच्या शिटा झेलून महाराणीच्या चेहेऱ्याची साफ विटंबना झालेली आहे..तीचं नाक साफ झडलं असून हातातला राजदंड तुटला आहे.. (खाली दिलेली टिप वाचा)
पुरेश्या काळजी अभावी मुळच्या पांढऱ्याशुभ्र असलेल्या या देखण्या शिल्पावर काळपट पुटं चढलीत. असं असुनही पुतळ्याचं मुळ सौंदर्य जराही उणं झालेलं नाही.. सिंहासनावरील कलाकुसर आणि राजचिन्हं, आता उठून उभी राहील असा भास निर्माण करणारी तीची बसण्याची ढब, हात लावून सरळ कराव्या असं वाटायला लावणाऱ्या, तीनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या, केवळ लाजबाब..! सोबत पुतळ्याचे काल-परवाच काढलेले फोटो पाठवतोय. पण नुसते फोटो बघण्यापेक्षा थोडीशी सवड काढून राणीच्या बागेत जावून ही अप्रतीम कलाकृती रूबरू बघून याच असं मी सांगेन..
या पुतळ्याचा इतिहास पाहता महाराणी व्हिक्टोरीयाच्या हा पुतळा कदाचित ‘जन्मल्या’पासूनच एका जागेवर न राहाण्याचं नशीब घेऊन आला होता की काय कुणास ठाऊक..!
सन १८५८ मध्ये राणीने हिन्दुस्थानचा कारभार इस्ट इंडीया कंपनीकडून आपल्या हातात घेतला, या घटनेच्या स्मरणार्थ राणी व तीचा नवरा प्रिन्स अल्बर्ट यांच्या नांवाने भायखळा येथे एक बाग व म्युझियम ‘व्हिक्टोरीया गार्डन अॅण्ड अल्बर्ट म्युझियम’ स्थापन करण्याचे तत्कालीन मुंबईकरांनी ठरवलं (याचंच पुढे राणीचा बाग व स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात ‘जिजामाता उद्यान‘ असंनामकरण झालं.)..या कार्याचे पुढारी होते आपले जगन्नाथ नाना शंकरशेट, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि काही बडे ब्रिटीश अधिकारी..
मुळात या बागेत राणीचाच पुतळा बसवायचा होता, परंतु तसे केल्यास तिच्या नवऱ्याला काय वाटेल या ‘हिंदुस्थानी’ विचाराने ‘प्रिन्स अल्बर्ट’चा पुतळाही तिथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. राणीच्या सन्मानार्थ हा पुतळा बडोद्याचे महाराज श्रीमंत खंडेराव गायकवाड यांनी रोख ८० हजार रूपये खर्चून प्रख्यात इंग्लिश शिल्पकार एन. नोबेल यांच्याकडून घडवून घेतला होता..परंतू पुतळ्याचं रुपडं पाहताच गायकवाड सरकार राणीच्या बागेत पुतळा स्थापन करायला तयार होईनात व त्या ऐवजी मुंबई शहरातील कोटाच्या (फोर्ट) बाहेर प्राईम जागी हा पुतळा बसवावा असा हट्ट ते धरून बसले..अखेर खंडेराव गायकवाडांच्या हट्टापाई शेवटी ‘राणी’ची प्रतिष्ठापना वर उल्लेख केलेल्या जागी करण्यात आली व सन १९४७ नंतर पुन्हा ‘राणी’ला भायखळ्याच्या तीच्या सुरूवातीस मुक्रर केलेल्या जागी आणून ‘टाकलं’ गेलं. राणीचा हा सुंदर पुतळा अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत बेवारश्यासारखा अजून तिथेच बसून आहे.. तर अल्बर्ट महाराजांचा काहीच पत्ता लागत नाहीय..
जाता जाता –
पुतळ्याची सुरुवातीची जागा राणीची बाग काय किंवा नंतरची ‘टाटा टेलिकम्युनिकेशन्स’ची जागा काय, राणीच्या सिंहांसनाधिष्ठीत मुळ पुतळ्यात मखराची कल्पना नव्हती..संगमरवरी मखर नंतर मुद्दाम बनवलं गेलं होतं..स्वतंत्र भारतात या पुतळ्याची रवानगी भायखळ्याच्या राणी बागेत केली गेली तरी त्या पुतळ्याइतकंच, किंबहूना कांकणभर सरसच असलेल्या त्या मखराचं काय झालं असावं हा प्रश्न मला पडला होता..माझ्या परीनं मी शोध घेत होतो..माझ्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांत या पुतळ्याचा व त्याच्या सध्याच्या पत्त्याचा उल्लेख सापडायचा, परंतू मखराचा उल्लेखही नसायचा..
परंतू शोधला की देवही सापडतो या उक्तीप्रमाणे अगदी परवाच, नेटवर सर्च करताना, मला मखराचा ठावठिकाणा अचानक सापडला..विख्यात रेमंड कंपनीचे मालक श्री.सिंघानीया यांच्या मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर
असलेल्या बंगल्याच्या आवारात उघड्यावर परंतू सुरक्षित असल्याचा उल्लेख http://thefourthseat.blogspot.in/2014/01/the-mystery-of-missing-marble-canopy-of.html?m=1 या वेबसाईटवर मिळाला..आपण या वेबसाईटला जरूर भेट देऊन माहिती घ्या..अर्थात हा पत्तोल्लेख २०१४ सालचा आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे मला अद्याप प्रत्यक्ष बघाचीय..या आठवड्यात जमवेन बहुतेक..कोण येतंय सोबत?
(टिप): या पुतळ्याचं नाक तुटलं असून तीच्या चेहेऱ्याची विटंबना झाल्याचं वर लिहीलं आहे. ..
या ‘नकटे’पणाची खरी हकिकत अशी आहे की, या पुतळ्याचं नाक चापेकरांनी (क्रांतिकारक चापेकर बंधूंपैकी) फोडून या पुतळ्याला चपलांचा हार घातला. चेहेऱ्याला डांबरही फासलं होतं..ही घटना त्यावेळी फार खळबळ उडवणारी होती. इंग्रजांना याचे खरे आरोपी शोधुन काढताच आले नव्हते. पुढे रँड खुन खटल्यात या कृत्याची कबुली स्वत:हुन चापेकरांनी दिली होती. तेव्हा कुठे व्हिक्टोरीया राणीच्या पुतळ्याच्या या प्रकरणावर प्रकाश पडला होता. सदर बहुमोल माहिती माझे देवगड निवासी इतिहासप्रेमी मित्र श्री. रणजीत हिर्लेकर यांनी मला कळवली..सदर घटनेचा उल्लेख ‘चापेकरांचे आत्मचरित्र’ या पुस्तकात असल्याचंही त्यांनी सांगितलं..!
श्री. हिर्लेकरांचे आभार..!!
-गणेश साळुंखे
9321811091
(12.04.2016)
Leave a Reply