नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

भाग-४

 आपल्यापुढील कार्य –

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां?

भाषाशास्‍त्राचा सिद्धान्‍त सांगतो की जेव्‍हा एकाच क्षेत्रात दोन भाषांची स्‍पर्धा आहे तेव्‍हां दोन्‍हींमधे कायम स्‍वरुपाचं संपूर्ण संतुलन अशक्‍य आहे. कुठल्‍याही एका विशिष्‍ट काळी एक भाषा दुसरीला मागे सारून पुढे जातं असते. अर्थात, परिस्थिती बदलल्‍यास ह्या भूमिका उलटूं शकतात, आणि आधी मागे राहिलेली भाषा पुढे जाऊं लागते.

आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू.

इंग्रजी व लॅटिन शब्‍दांसाठी भारतीय भाषांमध्‍ये प्रतिशब्‍द तयार केले गेले पाहिजेत. विज्ञान, कायदा, वैद्यक, मानसशास्‍त्र, समाजशास्‍त्र, अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांत असे प्रतिशब्‍द तयार केले गेले पाहिजेत. त्‍यासाठी प्रांतीय सरकारें सुद्धा प्रयत्‍नशील आहेत. हे प्रयत्‍न वाढवायला हवे.

प्रतिशब्‍द तयार करतांना अशी काळजी घ्‍यायला हवी की विविध भाषांमध्‍ये एकच प्रतिशब्‍द शक्‍यतो वापरता यावा. त्‍यामुळे भिन्नभाषिकांचे वैचारिक आदानप्रदान सोपे होईल.

भारतात विविध भाषा आहेत, आणि हें वैविध्‍य या मार्गातही एक अडचण आहे, असं वरवर पाहतां, आपल्‍याला वाटतं. पण ते खरं नाही.

बहुतेक भारतीय भाषा संस्‍कृतोद्भव आहेत. त्‍यांची वर्णमाला सारखी आहे. त्‍यांचं व्‍याकरण पुष्‍कळ अंशी सारखं आहे. त्‍यांच्‍यांत समान शब्‍दसुद्धा आहेत. ही समानता आपण पुष्‍कळदा लक्षात घेत नाहीं.

हा मुद्दा स्‍पष्‍ट करायला, मी आपल्‍याला एक संगणकक्षेत्रातील उदाहरण देतो. संगणक आदेशावली (computer software)मधे बहुतांशी इंग्रजी भाषा व रोमन लिपी वापरतात हें आपणांला माहीत आहेच. ही रोमन अक्षरे संगणकाला कळावीत म्‍हणून ASCII कोड वापरलं जातं. भारतीय लिप्‍यांचा संगणकात कसा वापर करायचा हा फार मोठा प्रश्न भारतीय संगणकवैज्ञानिकांपुढे होता. भारतात अनेक भाषांच्‍या वेगवेगळ्या लिप्‍या संगणकाच्‍या कोडमध्‍ये बसवायच्‍या कशा, हा त्‍यांना यक्षप्रश्न होता. पण त्‍यांच्‍या लक्षांत आलं की सर्व भारतीय भाषांची वर्णमाला सारखीच आहे – ती ध्‍वनीजन्‍य आहे. फक्‍त लिपी वेगवेगळी आहे. त्‍यावरून त्‍यांनी, भारतीय भाषेतील अक्षरें संगणकाला समजावीत यासाठी ISCII कोड तयार केलें. सर्व भारतीय भाषांसाठी एकच ISCII कोड वापरले जाते. फक्‍त वेगवेगळ्या लिप्‍यांची प्रिंटर यंत्रावर छपाई करण्‍यासाठी वेगवेगळ्या ग्राफिक्‍सचा उपयोग केला जातो.

अशाच तर्‍हेने आपण भारतीय भाषांमध्‍ये समान प्रतिशब्‍द तयार करुं शकूं. हे प्रतिशब्‍द खालीलपैकी कुठल्‍याही तर्‍हेचे असू शकतात.

१) संस्‍कृतोद्भव शब्‍द
२) अरबी – फारसी – तुर्की भाषेतून आलेले, पण भारतीय भाषेत रुळलेले शब्‍द.
३) भाषाभगिनीकडून घेतलेले.
४) इंग्रजीवर आधारित.

मात्र प्रतिशब्‍द दुर्बोध नकोत याची काळजी घ्‍यायला हवी. रिपोर्टर साठी वार्ताहर हा सुंदर प्रतिशब्‍द सावरकरांनी सुचवला व तो रुढही झाला. ‘उपस्‍कर’ या प्रतिशब्‍दाने आम्‍हाला काय समजतें? त्‍याऐवजी ‘अवजार’ हा सोपा शब्‍द काय वाईट आहे? (तो मूळचा अरबी असला तरी.) आणि प्रत्‍येक इंग्रजी शब्‍दाला प्रतिशब्‍द हवाच असंही नाहीं. टेलिफोनवर बोलतांना ‘हलो’ हा शब्‍द इतका रुढ झाला आहे, की त्‍याला प्रतिशब्‍द तयार करणं एक घोडचूकच ठरेल. तसेच स्‍टेशन, सिग्‍नल, ओयासिस वगैरे शब्‍द. हे शब्‍द तसेच ठेवले तर कांहींच बिघडत नाहीं.

सुरुवातीला प्रतिशब्‍दांचा वापर करणें अवघड वाटेल, पण हळूहळूं त्‍याची सवय होईल. आपण नाहीं का पै – पैसे – आणे याऐवजी नव्‍या पैशांचा हिशेब शिकलो? आता तर मुलांना पै – आणे तर कळतच नाहींत, कारण ते कालबाह्य झाले आहेत. ब्रिटिश राजवटीतली रस्‍त्‍यांची नांवें जाऊन नवी नावें आली. सुरुवातीला लोक जुनीच नावें वापरत राहिलें. आतां नवीन नांवें रुढ झाली. तसेच , प्रतिशब्‍दही पुढल्‍या पिढीत रुळतील.

पुढली गोष्‍ट ही – भारतीय भाषांमध्‍ये आपसात अधिक वैचारिक देवाणघेवाण व्‍हायला हवी. त्‍यासाठी अनेक भाषांतरं व्‍हायला हवीत. अनेक नवनवीन विषयांवर – विशेषतः आधुनिक विषयांवर बोललं-लिहिलं जायला हवं. अन्‍य भारतीय भाषा शिकण्‍यासाठी जाणीवपूर्वक उत्तेजन दिलं जायला हवं. स्‍वस्‍त दरात पुस्‍तकं उपलब्‍ध व्‍हायला हवीत. हिंदी पॉकेटबुक्‍स मधें बच्‍चन यांची ‘मधुशाला’, महादेवी वर्मांच्‍या कविता, शेरो-शायरी, गझल असं विविध साहित्‍य स्‍वस्‍तात उपलब्‍ध आहे. तस मराठीत नाहीं. आज अनेक इंग्रजी वृत्तपत्र व मासिकांच्‍या हिंदी व गुजराती आवृत्त्या निघतात, तसं अन्‍य भाषांमध्‍येही व्‍हायला हवं. आंतरराष्‍ट्रीय वृत्तपत्र व मासिकांच्‍या अरबी, फारसी आवृत्या निघतात. आपण अशी परिस्थिती निर्माण करायला हवी की अशा वृत्तपत्र व मासिकांच्‍या भारतीय भाषेत आवृत्या निघतील.

हे काम सोपं नाहीं. हें काम एकट्याचं नाहीं. त्‍यात शासनाची सक्रिय मदत तर हवीत. त्‍याशिवाय या चळवळीला आर्थिक पाठबळ लाभणार नाहीं.

पण संस्‍कृती ही कांहीं शासनाची मिरासदारी नाहीं. भाषा सर्वांची आहे, तशीच संस्‍कृतीही सर्वांची आहे. भाषा जतन करणं, ती समृद्ध करणं ही शासनाची किंवा साहित्यिकांचीच जबाबदारी नाहीं. ही जबाबदारी समाजातल्‍या प्रत्‍येक थराची आहे, प्रत्‍येक सुजाण व्‍यक्‍तीची आहे. डॉक्‍टर, इंजीनियर, वकील, शास्‍त्रज्ञ, मॅनेजर, उद्योजक, शिक्षक सर्वांनीच यावर विचार केले पाहिजे व आपापल्‍या परीनं सक्रिय कृती केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्‍हणजे, आम्‍हाला ज्‍या कसल्‍यातरी न्‍यूनगंडानं पछाडलेलं आहे, तो दूर करायला हवा.
**

(पुढे चालू)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..