माझं मुंबईतील सर्वधर्मीय पुरातन देवस्थानांवर लिखाण सुरू आहे..पुरातन म्हणजे, मुंबईतील ज्या देवस्थानांना किमान २०० व कमाल कितीही वर्षांचा लिखीत वा ऐकीव इतिहास आहे, अशा देवस्थानांवर.
आपल्या देशातील देवस्थानं, मग ती कुठल्याही धर्माची वा पंथांची असोत, त्यां भोवती सुरस चमत्कार, आख्यायिका, दंतकथा यांचं दाट आवरण असतं. प्रश्न श्रद्धेशी निगडीत असल्याने, हे आवरण फार कुशलतेने हळुवारपणे बाजुला सारून त्या त्या दंतकथेमागील किंवा चमत्कारीचामागे दडलेलं सत्य शोधून काढणं हा अत्यंत आनंदाचा भाग असतो. मी तो सध्या पुरेपूर उपभोगतोय..
एखादं प्राचीन देवस्थान कसं उदयाला आलं, त्याला ते विवक्षित नांव कसं प्राप्त झालं, पुढे त्याच्याभोवती दंतकथा कशा गुंफल्या गेल्या, मग त्या नांवाने एखादं गांव किंवा एखादा भाग कसा प्रसिद्ध होऊ लागला आणि काळाच्या ओघात त्या विवक्षित गांवाच्या नांवाचा अपभ्रंश होऊन, मूळ नांवाशी काहीच संबंध नसलेलं काहीतरी वेगळंच नांव कसं अस्तित्वात आलं, हे आजपासून त्या काळापर्यंत अनेक पुरावे शोधत उलटं जात, शोधणं हा माझ्यासाठी अत्युच्च आनंदाचा भाग असतो. काही व्यावहारीक लोकांना ही खुळी दुनियादारी वाटते आणि तशी ती आहे ही. स्वत:चा वेळ, पदरमोड, प्रसंगी उसनवार, मेहेनत करुन, पुन्हा त्यातून काही धनप्राप्ती होण्याची फारशी शक्यता नसताना केलेली कामं, खुळचोट या रकान्यातच येतात. पण काय करणार, मला असं खुळ असल्याशिवाय जगताच येत नाही. हा माझ्यातला डिफाॅल्ट फाॅल्ट आहे..!!
माणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय.
माझं लेखन तुम्हाला दर्जेदार किंवा एका उंचीचं वाटलं, तर तो दर्जा किंवा उंची माझ्यापूर्वी हे जिकरीचं काम केलेल्यांची आहे, हे ध्यानात ठेवावं. अनेक महानुभावांनी यापूर्वी या क्षेत्रात प्रचंड काम करुन ठेवलंय. मी त्यांच्याच खांद्यावर बसून मला त्यातून काही वेगळं गवसतंय का हे शोधण्याच्या प्रयत्नात असल्याने माझी उंची वाढल्यासारखी वाटू शकते. तसं होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटतं.
हे तुम्हाला फेसबुकवर किंवा व्हाट्सअॅपवर वाचायला मिळणार नाही, तर पुस्तकरुपाने आपल्यासमोर आणण्याचा संकल्प मी सोडलाय. छपाई आणि छपाईपूर्व संस्कार व त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता, हे पुस्तक सुरुवातीला ई-बुक स्वरुपात असेल. आपल्याला डाऊनलोड करुन वाचता येईल.. या सर्व उपक्रमासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली साथ आवश्यक आहे.
धन्यवाद..!!
— @ नितीन साळुंखे
9321811091
२७.०६.२०१८
Leave a Reply