नवीन लेखन...

कथा बोटीच्या ड्रायडॉकिंगची

बोटीचे सारे ‘जीवन’ पाण्यातच असते, आणि ते पाण्यालाच वाहिलेले असते. परंतु, समुद्रात बोटीला कधी अपघात झाला, कधी गंजलेला पत्रा बदलायचा असेल, कधी रंगकामासाठी किंवा बोटीच्या तळाला चिकटलेले जीवाणू काढून तळ, बोटीच्या बाजू स्वच्छ करावयाच्या असतील तर ती बोट ‘ड्रायडॉकिंग’ला पाठवावी लागते. याच प्रचंड जबाबदारीच्या प्रक्रियेची ही कथा…

लेखक : कॅप्टन सुनील सुळे
Source : मराठी विज्ञान परिषदेची ‘पत्रिका’ 


मासा पाण्याबाहेर काढला तर तो फार थोडा वेळ तग धरू शकतो आणि त्यानंतर सारं संपतं; तशीच जर बोट पाण्याबाहेर काढली तर तिचं काय होईल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित हा विचार शिवलाही नसेल. समुद्रकिनाऱ्याजवळ तुम्ही कधीतरी छोट्या मच्छीमारी होड्या वाळूत येऊन बसलेल्या पाहिल्या असतील. पण हजारो प्रवासी घेऊन जाणारी प्रवासी जहाजं, तसंच चार-पाच लाख टन माल वाहून नेणाऱ्या अजस्त्र बोटी – त्या कधी जमिनीवर पाय ठेवतात का? कधीकधी एखादीचं पाऊल वाकडं पडतं आणि ती खडकावर जाऊन बसते ती बाब निराळी; पण चार-आठ दिवस आराम करण्यासाठी एखादी बोट स्वेच्छेनं जमिनीवर जाऊन विसावते का?

हो, अगदी नियमितपणे. प्रत्येक बोटीला पाच वर्षांतून दोनदा ड्राय-डॉकमध्ये म्हणजेच सुक्या गोदीत जाऊन, सतत पाण्याखाली असणाऱ्या भागाची डागडुजी करून घ्यावी लागते. ही एकूण प्रक्रिया फार जोखमीची असते आणि यात एखादी चूक झाली तर प्रचंड अपघात होऊ शकतो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर तेलात तरंगणारी पुरी आपण जशी झाऱ्यावर उचलून घेतो, तसा हा प्रकार असतो. फक्त हे सगळं काही कोटी पट मोठं असतं. आपल्याला नेहमी बोटीचा पाण्यावरचा भाग दिसतो, पण पाण्याखाली बोट बरीच बुडालेली असते. लहान बोटी पाण्याखाली पाच-सात मीटर, मध्यम आकाराच्या बोटी दहा ते पंधरा मीटर तर मोठ्या बोटी बावीस-तेवीस मीटर बुडालेल्या असतात; म्हणजे एखाद्या सात-आठ मजली इमारतीएवढा भाग पाण्याखालीच असतो. या पाण्याखालच्या भागाच्या मोजमापाला ‘ड्राफ्ट’ असा शब्द वापरतात. असं हे वीस-बावीस मीटर्स ड्राफ्ट असलेलं महाकाय धूड पाण्याबाहेर काढण्याच्या कामासाठी खूप मोठी यंत्रणा आणि खूप बारीकसारीक तपशिलापर्यंत तयारीची गरज असते.

बोट पाण्याबाहेर कशी काढतात?

ड्रायडॉक्स दोन प्रकारच्या असतात. पहिला प्रकार म्हणजे ‘ग्रेव्हिंग डॉक’. नावाप्रमाणेच ही डॉक एखाद्या थडग्यासारखी किंवा जमिनीत खणलेल्या खड्यासारखी असते. हा खड्डा समुद्राला जोडलेला असतो आणि एका प्रचंड दरवाज्यानं ही डॉक ‘वॉटर-टाइट’ करता येते. पाण्यावर तरंगणारी बोट या डॉकमध्ये आली की हा दरवाजा बंद केला जातो. त्यामुळे ती डॉक एखाद्या स्विमिंग पुलासारखी होते. त्यानंतर या डॉकमधलं सुमारे पन्नास-साठ हजार घन मीटर पाणी प्रचंड पंपाच्या मदतीनं बाहेर काढायला सुरुवात होते. पाण्याची पातळी खाली उतरायला लागली की बोटही हळूहळू खाली उतरायला लागते. एका क्षणी बोटीच्या तळाचा सगळ्यात मागचा भाग, पायाची टाच असते तसा, खाली टेकतो. डॉकच्या तळाशी, मध्यरेषेवर सुमारे दीड मीटर उंचीचे शंभरच्या आसपास लाकडी ठोकळे ओळीने लावून ठेवलेले असतात. बोटीचा जो कणा असतो, ज्याला ‘कील’ म्हणतात तो, या ठोकळ्यांवर विसावणार असतो.

एकदा बोटीची टाच सर्वांत शेवटच्या ठोकळ्यावर टेकली की ‘क्रिटिकल पीरियड’ अर्थात आणीबाणीचा काळ सुरू होतो. विशेषतः, या काळात बोटीचा तोल सांभाळला गेला नाही, तर बोट कलंडून ठोकळ्यांवरून घसरू शकते आणि मोठा अपघात संभवतो. हा तोल सांभाळण्याचं काम बोटीच्या टाक्यांमध्ये काही हजार टन पाणी काळजीपूर्वक विभागून केलं जातं. डॉकमधलं पाणी जसजसं खाली जातं, तसतसं आधी पायाची टाच आणि हळूहळू पायाचा तळवा जमिनीला टेकावा तसा बोटीचा तळ त्या ठोकळ्यांवर विसावतो. एकदा बोटीचा संपूर्ण तळ ठोकळ्यांवर टेकला, की क्रिटिकल पीरियड संपतो. त्यानंतर उरलेलं पाणी काढून टाकलं जातं. यानंतर ठोकळ्यांवर बसलेल्या या बोटीचा तोल जाऊ नये म्हणून पूर्वी लाकडाच्या प्रचंड ओंडक्यांचा आधार दिला जात असे. हल्ली ठोकळ्यांच्या एकाऐवजी तीन रांगा वापरून हे साध्य करतात.

ड्रायडॉकचा दुसरा आणि आधुनिक प्रकार म्हणजे ‘फ्लोटिंग’, अर्थात तरंगती ड्रायडॉक. ही डॉक म्हणजे जणू काही एक बोटच असते, पण पुढून आणि मागून उघडी, म्हणजे ‘यू’ आकाराची. तिला फक्त तळ आणि दोन बाजू असतात, हे सर्व काही पोकळ असतं आणि या पोकळ भागात पाण्याच्या टाक्या असतात. या टाक्यांमध्ये पाणी घेऊन ती डॉक आधी पाण्यात बुडवतात आणि बोट आणून बरोबर डॉकच्या वर उभी करतात. बोट योग्य जागेवर असल्याची खात्री झाली की डॉकमधलं पाणी काढायला सुरुवात होते आणि त्यामुळं हलकी झालेली डॉक हळूहळू वर यायला लागते आणि थोड्या वेळात डॉकमधला सर्वांत मागचा ठोकळा बोटीच्या टाचेला येऊन टेकतो. डॉक अशीच वर येत राहते आणि शेवटी झाऱ्यावर पुरी उचलावी तशी बोटीला पाण्याबाहेर काढते.

बोट एकदा पाण्याबाहेर काढली की तिची अवस्था भूल दिलेल्या पेशंटसारखी होते. बोटीचा तोल राखण्यासाठी आतापर्यंत टाक्यांमध्ये भरून ठेवलेले हजारो टन पाणी बोटीच्या तळामधले प्लग्ज उघडून आता काढून टाकले जाते. आतापर्यंत समुद्राच्या पाण्याने थंड केले जाणारे जनरेटर्स बंद करून किनाऱ्याकडून मिळणारा वीजपुरवठा वापरावा लागतो. एरवी आग विझवण्याची जरूर पडली तर सभोवती असलेल्या समुद्राच्या पाण्याचा उपयोग करता येतो; पण आता नाही, म्हणून ते पाणीही पाइपने पुरवले जाते. प्रक्रिया केलेले सांडपाणी एरवी समुद्रात सोडता येते, पण ड्रायडॉकमध्ये असताना नाही, म्हणून बोटीच्या कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावरची स्वच्छतागृहे वापरावी लागतात. थोडक्यात काय, बोट तात्पुरती ‘लाइफ सपोर्ट’वर असल्यासारखी होते.

ड्रायडॉकमध्ये होणारी कामे

जी कामं बोट पाण्यावर तरंगत असताना करणं शक्य नसतं, ती ड्रायडॉकमध्ये करण्यासाठी राखून ठेवलेली असतात. एक महत्त्वाचं काम म्हणजे तळाची रंगरंगोटी. बोट जाड पोलादी पत्र्याची बनविलेली असते. ती सतत खाऱ्या पाण्यात वास्तव्य करून असते, त्यामुळं गंजण्याची भीती कायमच असते. त्याशिवाय दुसरी एक समस्या म्हणजे खूप काळ पाण्यात राहून बोटीच्या पृष्ठभागावर ‘जीवसृष्टी’ निर्माण झालेली असते, म्हणजेच शेवाळासारख्या वनस्पती आणि शंखाच्या जातीतल्या प्राण्यांचा थर बनतो. यामुळे बोटीचा वेग कमी होतो आणि इंधनाचा खर्च वाढतो. हे सगळं प्रचंड दाबाच्या पाण्याचा फवारा मारून धुऊन काढलं जातं. त्यानंतर, जर काही गंज चढला असेल किंवा जुना रंग निघायला सुरुवात झाली असेल, तर तो काढण्याचं काम सुरू होतं. पूर्वी या कामासाठी हवेच्या दाबानं वाळूचा फवारा मारीत; परंतु वाळूमुळं सिलिकॉसिस हा फुप्फुसांचा विकार होतो हे लक्षात आल्यानं आता ग्रिट वापरतात. ग्रिट म्हणजे लोखंडाचे वाळूसारखे जाडेभरडे कण. हे मशिनगनसारख्या यंत्रातून उडवतात आणि गंज व जुन्या रंगाच्या चिंध्या-चिंध्या होऊन बोटीचा पृष्ठभाग स्वच्छ होतो. ही झाली साफसफाई.

यानंतर लगेचच रंगकामाला सुरुवात करावी लागते, नाहीतर स्वच्छ केलेला पृष्ठभाग काही तासांमध्ये गंजायला लागतो. बोटीच्या पत्र्यावर विविध प्रकारच्या अनेक रंगांचे थर लावावे लागतात. सर्वप्रथम प्रायमर हा गंजप्रतिबंधक रंग असतो. त्याचे दोन किंवा तीन हात द्यावे लागतात. हे काम एअरलेस स्प्रे किंवा बिन हवेचा स्प्रे वापरून करतात. याचं नॉझल सुमारे एक ते दीड मीटर रुंद असतं, त्यामुळं एकटा कारागीर काही तासांमध्ये बोटीची एक बाजू रंगवू शकतो. प्रत्येक रंगाचा हात दिल्यावर त्याच्या थराची जाडी (वेट फिल्म थिकनेस) मोजली जाते. जाडी कमी- जास्त झाली, किंवा वाळायला दिलेला वेळ कमी-जास्त झाला तर लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, म्हणून हे काम तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होतं.

प्रायमरनंतर फिनिशिंग पेंटचे हात द्यावे लागतात. बोटीच्या वेगवेगळ्या भागांवर लावण्यासाठी रंगांचे वेगवेगळे प्रकार असतात. जो भाग कायम पाण्याखाली राहणार त्यासाठी एक, जो भाग कायम पाण्याबाहेर राहणार (टॉपसाइड) त्यासाठी दुसरा आणि जो कधी आत – कधी बाहेर असतो (बूट टॉपिंग) त्यासाठी आणखी वेगळा, असे प्रकार असतात. हे सगळे रंग लावून झाले की काम संपलं असं मात्र नाही. सर्वांत शेवटी जो भाग पाण्याच्या संपर्कात येतो, त्या संपूर्ण भागावर एक ‘अँटिफाउलिंग’ नावाचा रंग लावतात. हा सामान्यतः विषारी रंग असतो. हा लावण्यामागचा हेतू हा, की बोटीच्या पृष्ठभागावर पुन्हा ‘जीवसृष्टी’ जमू नये. ही ‘जीवसृष्टीची’ समस्या बोटीइतकीच जुनी आहे. खूप पूर्वी या कामासाठी चुना वापरत, पण चुना सहजपणे धुतला जातो. त्यामुळं सुमारे दोनशे वर्षांपूर्वी अर्सेनिक हे विष वापरायला सुरुवात झाली; पण त्यामुळं पर्यावरणाला धोका संभवतो हे समजल्यावर त्याऐवजी पाऱ्याची संयुगं असलेले रंग वापरायला सुरुवात झाली, नंतर पाऱ्याचे घातक परिणाम लक्षात आल्यावर कथिलाचा वापर व्हायला लागला.

नुकतेच कथिलाचे दुष्परिणाम समजल्यावर 2008 साली त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली. आता या कामी एक तर तांब्याचा अंश असलेली विषे किंवा बिनविषारी रंग वापरले जातात. बिनविषारी रंग वापरला तर बोटीचा पत्रा इतका गुळगुळीत केलेला असतो की, त्याला कोणताही जीव चिकटून बसू शकत नाही. काही जातीच्या रंगांचे थर निघून जातात आणि त्याबरोबर ते जीवही वाहून जातात.

रंगकामाशिवाय इतर कामं म्हणजे बोटीचा पंखा (प्रॉपेलर) आणि सुकाणू (रडर) या यंत्रसामग्रीची देखभाल. पंखा आणि रंडर काढून त्यांच्या बेअरिंगची देखभाल आणि जरूर तर दुरुस्ती केली जाते. पंख्याला पॉलिश केलं जातं. त्यांमध्ये किती झीज झाली आहे त्याचं मोजमाप करून जरूर तिथं दुरुस्त्या कराव्या लागतात, नाहीतर गळती सुरू होऊन समुद्राचं पाणी आत किंवा वंगणाचं तेल बाहेर जाण्याचा धोका संभवतो. याच वेळी बोटीचा 5 ते 25 टन वजनाचा नांगर (अँकर) आणि त्याची प्रचंड साखळीसुद्धा नीटपणे तपासून पाहतात आणि जरूर त्या दुरुस्त्या करतात.

याखेरीज पाण्याखालच्या भागाची काही दुरुस्ती असेल, तर ती केली जाते. उदा. पत्रा कापून नवा लावणं (स्टील रिन्यूअल). या कामात कधी कधी शेकडो टन पोलादी पत्रा बदलला जातो. याशिवाय, इंजिनरूममधली हजारो अश्वशक्तीची यंत्रसामग्रीही त्या वेळी ‘थंड’ असल्यामुळं तिच्याही दुरुस्ती आणि देखभालीची कामं करता येतात. या काळात बोटीवर शेकडो कर्मचारी आणि तंत्रज्ञ काम करीत असतात.

ही झाली नियमितपणे केल्या जाणाऱ्या (रूटीन) ड्रायडॉकची कथा; पण कधीकधी बोटीला अपघात झाला तर तिला तातडीनं (इमर्जन्सी) ड्रायडॉकमध्ये जावं लागतं. अशा वेळी सगळी गणितं फार वेगळी असू शकतात. कधी पाण्याच्या किंवा तेलाच्या टाक्या फुटल्या असतील, तर पाणबुडे पाण्याखाली जाऊन तात्पुरत्या दुरुस्त्या करतात आणि बोट पक्क्या दुरुस्त्यांसाठी ड्रायडॉकमध्ये आणली जाते. अशा वेळी ती तिरकी झालेली असू शकते. कधी पंख्याची किंवा सुकाणूची मोडतोड झाली असेल, तर बोटीला स्वबळावर हलता येत नसल्यानं टग बोटीच्या मदतीनं खेचून तिला ड्रायडॉकमध्ये आणण्यात येतं. ही कामं फार अवघड आणि धोक्याची असल्यामुळं या विषयातल्या तज्ज्ञ नेव्हल आर्किटेक्टच्या देखरेखीखालीच करावी लागतात.

अशा तऱ्हेनं बोट कधी चार-पाच दिवस, तर कधी महिना-दीडमहिना ड्रायडॉकमध्ये राहून पुन्हा एकदा पाण्यावर तरंगायला तयार झाली, की तिच्या ‘पाठवणी’ची तयारीही खूपच काळजीपूर्वक करावी लागते. बोट ड्रायडॉकमध्ये शिरताना ज्या क्रमानं कामं होतात त्याच्या उलट्या क्रमानं, जाण्याच्या वेळची कामं सुरू होतात. प्रथम ड्रायडॉकमध्ये पाणी भरायला सुरुवात होते. बोट तरंगायला लागण्यापूर्वी पाणी भरण्याची प्रक्रिया थांबवून कुठे काही गळती तर नाही ना, याची खात्री केली जाते. सर्व काही ठीकठाक असेल तर पाण्याची पातळी बोट तरंगेपर्यंत वाढवीत नेतात. किनाऱ्याकडून मिळणारा वीज आणि पाणीपुरवठा बंद करून बोट आता परत एकदा स्वावलंबी होते.

यानंतर फ्लोटिंग ड्रायडॉकच्या बाबतीत, ड्रायडॉकच्या टाक्यांमध्ये पाणी भरून ती पाण्यात बुडविली जाते आणि बोट अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढली जाते. मग ती पुन्हा एकदा जगभर सफरी करायला निघते.

ड्रायडॉकिंगसाठी प्रचंड खर्च येतो आणि त्या काळात बोटीची कमाई बंद असते. त्यामुळे ती ड्रायडॉकमध्ये कमीतकमी वेळ कशी असेल, यावर तंत्रज्ञ सतत विचार करीत असतात. काही कामं उदा., ‘जीवसृष्टी’ घासून काढून टाकणं, पंख्याला पॉलिश करणं ही कामं पाणबुडे करू शकतात, त्यासाठी ड्रायडॉकिंगची गरज पडत नाही. लहानमोठी वेल्डिंगची कामंसुद्धा पाण्यात करता येतात. राहता राहिलं रंगकाम. हे मात्र आज तरी पाण्यात राहून करता येत नाही; त्यामुळं निदान एवढ्या एका कामासाठी तरी बोटीला ड्रायडॉकच्या वाऱ्या कराव्या लागतातच. आता सागरी रंगांच्या क्षेत्रातले तज्ज्ञ अशा रंगांच्या शोधात आहेत, की जे निदान पाच आणि शक्य झालं तर त्याहूनही जास्त वर्षं बोटीला ड्रायडॉकमध्ये जायची गरज पडू देणार नाहीत.

–कॅप्टन सुनील सुळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..