गजानन लक्ष्मण ठोकळ उर्फ ग.ल. ठोकळ यांचा जन्म २६ मे १९०९ रोजी झाला.
गजानन लक्ष्मण ठोकळ उर्फ ग.ल. ठोकळ हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक म्हणून सुपरिचित होते. ठोकळ गोष्टी भाग १ या कथासंग्रहातील कथा मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावाचे कंगोरे उलगडत जातात. आपल्या खास शैलीने ठोकळ वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात.
एकोणीसशे सव्वीस सालाच्या सुमारास त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्या वेळी ठोकळांचे वय सोळा-सतरा वर्षाचे असून ते कॉलेजच्या पहिल्या वर्षांत शिकत होते. रविकिरण मंडळातील कवींचा प्रभाव समकालीन अनेक इतर कवींप्रमाणे ठोकळांवरही पडला होता. जुन्या कवींमध्ये बालकवी हे त्यांचे विशेष आवडते कवी होते. पण हे सारे असूनही ठोकळांच्या कवितेला तिचे स्वतःचे म्हणून एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे तिच्यात उमटलेले ग्रामीण जीवनाचे अस्सल आणि गहिरे रंग. ग.ल.ठोकळांच्या गद्यलेखनात कादंबऱ्या आणि कथा या दोन साहित्यप्रकारांचा अन्तर्भाव झालेला आहे.
साताऱ्याकडील ग्रामीण पार्श्वभूमीवरची, बेचाळीसच्या क्रांतिपर्वावर आधारलेली त्यांची ‘गावगुंड’ ही कादंबरी खूप गाजली. काही विद्यापीठांनी तर तिचा आपल्या अभ्यासक्रमातही समावेश केला. या काळात र. वा. दिघे यांच्या साहित्याने आपण झपाटले गेलो होतो असे ठोकळ सांगतात. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधले अद्भुतरम्य आणि रोमांचकारक वातावरण काही प्रमाणात ‘गावगुंड’ मध्ये अवतरले आहे.’ठिणगी’ ही ठोकळांची छोटी कादंबरी इंदूर माळव्याकडील संस्थानी वातावरणात वाचकाला फिरवून आणते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ठोकळांनी ‘टेंभा’ ही आपली आत्मचरित्रवजा कादंबरी लिहिली. चित्रपटकथा, नाट्यलेखन ही माध्यमेही ठोकळांनी हाताळून पाहिली. पण तिथे फारसे यश त्यांच्या पदरात पडले नाही. एकंदरीने बघता ‘कथाकार’ हीच त्यांची प्रतिमा जनमानसात आणि साहित्यात ठळकपणे उमटली आहे आणि तीच त्यांची खरी वाड्मयीन ओळख होती. शांता शेळके एका ठिकाणी म्हणतात ग ल ठोकळ हे ग्रामीण लेखक म्हणून हे नाव ठळकपणे नोंदलेले गेलेले असले तरी ठोकळांच्या कथाविश्वाचा पल्ला आणि आवाका त्यांच्या कितीतरी पलीकडे विस्तारलेला आहे. त्यांनी निर्माण केलेले स्त्री-पुरुषांचे चित्रविचित्र जग हा वास्तव विश्वाचा एक छेद आहे. वाचकाचे रंजन करताकरता प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचा त्यांना प्रत्यय देणारा हा एक समर्थ कथाकार.
ग. ल. ठोकळ यांचे २२ जुलै १९८४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply