१९६० नंतरच्या काळात, आपल्या मोजक्या पण प्रभावी लेखनाने ज्या मराठी कथालेखकांनी कथालेखनाकडे लक्ष वेधून घेतले त्यात श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांची प्रामुख्याने गणना होते.
अर्धसत्य या सिनेमाचे मूळ कथालेखक श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे झाला.
पानवलकर यांनी मुंबईच्या-कस्टम खात्यात २५ वर्षे अधिकारी म्हणून काम केले. तिथल्या रगेल, बहुरंगी जीवनाचे समर्थ चित्रण त्यांच्या ‘कांचन’ कथा संग्रहामध्ये दिसते. ‘कांचन’ हा त्यांच्या कथा संग्रहातील बहुसंख्य कथा कस्टमच्या वातावरणाशी निगडित आहेत. विमानतळ, बोटी, रेशीमउद्योग अशा त्यांच्या कार्यक्षेत्रातला त्यांचा अनुभव इथे शब्दांकित होतो. सोन्याच्या शोधासाठी चाललेले छापे, भ्रष्टाचारातून निर्माण होणारी लफडी, तिथे गुंतलेल्या माणसांचे राग, लोभ, हितसंबंध, हेवेदावे, विविध मानवी भाव यांचे अपूर्व दर्शन इथे घडते. स्वत:च्या अनुभवाला अनुकुल असे रूप घेणारी, जीवनाचे भेदक दर्शन घडवणारी, कधी रांगडी-रगेल, तर कोमल अनुभवाला अलगनारपणे उचलणारी पानवलकरांची चित्रदर्शी शैली, ‘कांचन’मध्ये ठाई ठाई भेटत राहते. हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ‘अर्धसत्य’ या सिनेमाची मूळ कथा त्यांचीच होती आणि त्याबद्दल त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या ‘औदुंबर’, ‘सूर्य’ व ‘चिनाब’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. शूटिंग, एका नृत्याचा जन्म, जांभूळ, गजगा, अशी त्यांची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांचे १९ ऑगस्ट १९८५ रोजी निधन झाले.
श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांच्या अधिक माहितीसाठी ब्लॉग.
http://sdpanvalkar.blogspot.in/?m=1
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply