कथाकार आणि कादंबरीकार केशव पुरोहित यांचा जन्म १५ जून १९२३ रोजी चामोर्शीमध्ये (चंद्रपूर) येथे झाला.
विदर्भात जन्म आणि तिथेच शिक्षण घेतलेल्या केशव जगन्नाथ पुरोहितांवर वैदर्भीय ग्रामीण संस्कृतीचे संस्कार झाले. त्यांनी कर्मभूमी म्हणून मुंबईची निवड केली. केशव जगन्नाथ पुरोहित यांनी ‘शांताराम’ या टोपणनावाने लेखन केले.
१९४१ साली ‘सह्य़ाद्री’ मासिकात त्यांनी कवी अनिलांच्या ‘भग्नमूर्ती’ या खंडकाव्यावर टीकालेख लिहिला. त्याच वर्षी ‘भेदरेखा’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि वर्षभरात सोळा कथांचा ‘संत्र्यांचा बाग’ हा संग्रहही आला. परंतु १९५७ च्या ‘शिरवा’पासून त्यांच्या कथेला खरी कलाटणी मिळाली. ‘जमिनीवरची माणसं’, ‘चंद्र माझा सखा’, ‘उद्विग्न सरोवर’, ‘चेटूक’ या संग्रहातल्या कथांतून ते ध्यानात येते. पुढे ‘संध्याराग’ (१९९०) ते अलीकडच्या ‘कृष्णपक्ष’ (२००५) पर्यंतच्या त्यांच्या कथांना आत्मनिष्ठेबरोबरच सामाजिक परिमाणही लाभले. तंत्रात न अडकता त्यांची कथा देशीपणाशी, लोकव्यवहाराशी नाते सांगत राहिली. शेक्सपीअर, इब्सेन, युरायपीडिसच्या नाटकांचा अनुवाद, तसेच ‘व्रात्यस्तोम’, ‘मी असता..’ असे आत्मपर लेखनही त्यांनी केले. तब्बल चार दशके विदर्भ, गोवा, मुंबई येथे त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले.
१९८९ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. संत्र्याची बाग, मनमोर, शिरवा, छळ, जमिनीवरची माणसं, अंधारवाट, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. १९८९ साली अमरावतीमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. अंधारवाट, आठवणींचा पार, उद्विग्न सरोवर, काय गाववाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीवरची माणसं, ठेवणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरवा, संत्र्यांचा बाग, संध्याराग, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुवाद) आदी पुरोहित यांची साहित्य संपदा आहे.
केशव जगन्नाथ पुरोहित यांचे १७ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply