कथाकार, कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि अनुवादक विलास गोविंद सारंग यांचा जन्म ११ जून १९४२ रोजी कारवार येथे झाला.
मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर कमालीचे प्रभुत्व असलेल्या सारंग यांनी मराठी साहित्यात अतिशय वेगळ्या जाणिवांचा शोध घेत लेखन केले. ‘सत्यकथा’ या मासिकातून त्यांचे लेखन नियमित प्रसिद्ध होत असे. त्या काळातील सगळ्या साहित्यिकांमध्ये सारंग यांचे लेखन त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे आणि विषयाच्या मांडणीमुळे वाचकांच्या विशेष स्मरणात राहिले.
साठच्या दशकानंतरचे महत्त्वाचे प्रयोगशील साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे कवी, कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक विलास गोविंद सारंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले.सारंग यांनी १९६९मध्ये इंडियाना विद्यापीठातून डब्ल्यू एच ऑडेन या कवीच्या लेखनावर पीएच.डी. पदवी मिळवली. त्यानंतर शीवच्या एसआयईएस या महाविद्यालयात आणि नंतर मुंबई विद्यापीठात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. इराक येथील बसरा या शहरात आणि कुवेत येथेही त्यांनी अध्यापनाचे काम केले. वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच ते लिहू लागले. कथा, कविता, लघुनिबंध, संशोधनपर आणि वैचारिक लेखन अशा साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये सारंग यांची प्रतिभा बहरली. मोजकेच परंतु अतिशय परिणामकारक लिहिणारे लेखक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
१९७५ मध्ये ‘सोलेदाद’ हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘आतंक’ हा संग्रह १९९९ मध्ये प्रसिद्ध झाला. १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘एन्कीच्या राज्यात’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. भालचंद्र नेमाडे, किरण नगरकर, कमल देसाई, चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या लेखनाची समीक्षा करणारे ‘मराठी नवकादंबरी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. ‘अक्षरांचा श्रम केला’, ‘मराठी कविता ६९ ते ८४’ हेही त्यांचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. आधुनिक काळातील माणसाला भेडसावणारे एकाकीपण, असुरक्षितता, निर्थकपणाची जाणीव, मानवी संबंधातील तुटलेपणा आणि विसंवाद, मानवी स्वातंत्र्यावर होणारे आक्रमण असे मानवी अस्तित्वाबाबतचे अतिभौतिकीय प्रश्न त्यांच्या लेखनातून व्यक्त होतात.
अक्षरांचा श्रम केला, आतंक, मॅनहोलमधला माणूस, सिसिफस आणि बेलाक्वा, सोलेदाद, रुद्र, चिरंतनाचा गंध, कविता : १९६९ -१९८४, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
विलास गोविंद सारंग यांचे १४ एप्रिल २०१५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply