जेंव्हा जेंव्हा स्त्री तिच्या सन्मानापुढे झुकली नाही, तेंव्हा एक ‘दुर्योधन’ जन्म घेतोच. हा नियतीचा डाव आहे. मग काय स्त्री भर सभेत बदनाम केली जाते. अब्रुची लखतरे तोडणारी गिधाडे पिंगा घालू लागतात. स्त्रीला संपत्ती समजणाऱ्या धर्मवीर युधिष्ठिरान एक स्त्रीच लावली जुगारात. बेगडी अभिमानाच्या गर्तेत अडकलेल्या दुर्योधनाला स्त्री म्हणजे दासी वाटली. बघता बघता ‘दुशासना’चा हात पोहोचलाच स्त्रीच्या पदरापर्यंत..! लाजिरवाणी गोष्ट म्हणजे अशावेळी नावाजलेले शूरवीर धुरुंधर मूग गिळून गप्प बसतात. काही ‘धृतराष्ट्र’ पुत्र मोहात आंधळे होतात. डोळ्याने, मनाने आणि बुध्दीनेही..! एक स्त्री तरी धावून येईल स्त्रीच्या मदतीला, या अपेक्षेपोटी द्रौपदी निरागस नजरेनं ‘गांधारी’ कडे पाहत होती. पण तिच्या ही डोळ्यावर पट्टी बांधली होती. ‘पितामह’ यांनी मनात आणलं तर जागेवर न्याय करू शकले असते. पण त्यांचं योग्य वेळी शांत बसणं महाभारत पेटवून गेलं. शहाण्या माणसांनी अस गप्प बसणं किती महागात पडतं हे पूर्ण भारतवर्षाने पाहिलं. टाळ्यांच्या आणि आपल्या षंढ पुरुषत्वाच्या जोरावर दुर्योधनाला प्रोत्साहन देणारे असंख्य कौरव असतातच सभेत. प्रत्येक दुर्योधनाचा एक दोस्त पण असतो. शूरवीर, उत्तम धनुर्धारी पण याच वेळी त्याची सुद्धा बुद्धी कशी काय गुलाम झाली माहीत नाही. षडयंत्री लोकांना सुद्धा कवच कुंडलं दान देणारा हा दानशूर अंगराज, एका स्त्रीला ‘दयेची’ दान द्यायला का चुकला असेल..? द्रौपदी खूप नशीबवान होती आजच्या स्त्री पेक्षा. कारण सगळी षडयंत्र फिरवून स्त्रीची अब्रु वाचवणारा सुदर्शनधारी एक कृष्ण अजून होता. षडयंत्राला षडयंत्रानेच योग्य उत्तर द्यायचा. पण आज अगणित जारासंधाने भरलेल्या या युगात कृष्ण शोधायचा कुठे…? आजच्या कलियुगात प्रत्येक जणं ज्याचं पुरेपूर अनुकरण करू पाहतो, तो शकुनी ही आरूढ होता भल्या मोठ्या सिंहासनावर. आणि ‘जाणता’ होता की आपण टाकलेला प्रत्येक ‘फास’ आवळला जातोय आपल्याच कौरवांच्या मानेवर. पण दुटप्पी अहंकाराच्या पुढे मान तुकवनं त्याला कदापिही मंजूर नव्हतं. एकचं ‘माणूस’ तिथे हजर होता ‘विकीर्ण’..! होता कौरवांचा भाऊ पण त्याला ज्ञात होतं, स्त्रीची अब्रु लुटून कोणी महान संत होऊ शकतं नाही. ती तर यांचीच ‘कुलवधू’ होती. आपल्या आवाज उठवण्याला खूप मोठी किंमत असते, हे दाखवून दिलं त्यानं. अन्यायाविरुद्ध बोलणं त्याची चूक झाली, बिचारा समजला गेला पांडवांच्या गटातला. अगदी आजच्या सामान्य ‘रयते’सारखा. आयुष्यात नक्कीच शकुणी होण्यापेक्षा विकीर्ण व्हावं माणसानं…! ‘महाभारता’पासून आजच्या ‘भारता’पर्यंत सगळ्यांच्या तोंडी एकचं प्रश्न आहे. इतके शूरवीर असताना स्त्रीची अब्रु लुटण्याची हिंम्मत होतेच कशी…?
©आज
Leave a Reply