जिथे वाहिले नऊ मास ओझे
जिथे चिंतिले कल्याण माझे
जिला मोद होई पाहूनी बाललिला
नमस्कार माझा तया माऊलीला
जिच्या पासून एक ‘विश्व’ तयार झाले अशी स्त्री ही अनंत काळाची माता आहे. दैत्यांचा संहार करणारी देवता तिचा आपण सन्मान करतो. माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोन्हीही सारखेच महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये अनेक गुण समान असतात मग असे असताना स्त्री ही पुरुषांइतकी समाजात किंवा कुटूंबात मुक्त आहे काय? माझ्या विचारांती मी प्रथम भारतीय स्त्री मुक्ती आभास की आव्हान या विचार प्रवाहात डोकावणार आहे.
अश्मयुगापासून हे लक्षात येईल की पुरुषाने स्त्रीला शिकारीपासून वंचित ठेवून गृहिणीचा दर्जा देऊन तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले हे मात्र तिचे तिला कळलेच नाही.
सिंधू संस्कृतीत स्त्रीला ‘मातृदेवता’ म्हणून गौरविले. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीपुढे ती वर्चस्व गाजवू शकली नाही.
प्राचीन वैदिक काळात स्त्रियांवर उपनयन संस्कार होत. शिक्षणाची संधी होती. त्यामुळेच ‘गार्गी’, ‘लोपामुद्रा’ यांचे ग्रंथ उल्लेखनिय आहेत. त्याकाळी स्त्री ‘यज्ञ’ करीत होती. नृत्य, गायन, कला क्षेत्रात अग्रेसर होती. मात्र मालमत्ता धारणेच्या अधिकारापासून वंचित होती.
मध्ययुगीन काळात सामाजिक परिवर्तन होऊन स्त्रियांवरील उपनयन संस्कार बंद झाले. गुरुगृही शिक्षणाचा अधिकार राहिला नाही. मुस्लिम आक्रमणाच्या पिंजऱ्यात ती एक लुटीची, चैनीची वस्तु बनली. यामुळेच बालविवाह, हुंडा प्रथा, केशवपन या रुढींना स्त्रीला सामोरे जावे लागले. यामुळे तिच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास खुंटला.
इंग्रज व्यापारासाठी आले त्यांनी आपले स्वातंत्र हिरावून घेतले, आपण गुलाम बनलो. पण कधी कधी वाईटातून चांगले घडते. त्याचप्रमाणे ब्रिटीशांच्या काळात पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची बीजे रोवली गेली. त्यातून महर्षी कर्वे, म. फुले, राजा राममोहन रॉय असे समाजसुधारक तयार झाले. त्यांनी स्त्रियांचे प्रश्न हाताळून विधवा विवाह, सतीची चाल अशा अनिष्ट रुढी बंद केल्या व महिलाश्रम, स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळवून दिली व स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. पंडीता रमाबाईंनी स्त्रियांना राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून दिला.
‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत प्रथम सरलादेवी चौधरी यांनी व्यासपीठावर म्हटले. म. गांधीनी स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत मानाचे स्थान दिले. परंतु ब्रिटीशांच्या मानसिक छळामुळे ती स्वतंत्र वावरु शकली नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या उन्नतीचे खूप प्रयत्न झाले ते काही अंशी सफलही झाले. भारतासारख्या विकसनशील देशात हे ही लक्षात आले की ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाशी उद्धारी’ त्यामुळेच स्त्रीला ज्ञानाची – कर्तृत्वाची सर्व क्षेत्रे खुली केली व स्त्रीने असाध्य ते साध्य करुन दाखवले.
आजची स्त्री ‘उत्तम गृहिणींपासून वीरांगना’ बनली. असे एकही क्षेत्र उरले नाही जिथे स्त्री मागे आहे ! आता कुठे स्त्रीला उच्चस्थान मिळत असले, तरी ती बहुतांशी मुक्त नाही.
आजच्या कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये आयुक्त कीरण बेदी, मीरा बोरवणकर, आंतराळवीर कल्पना चावला यांची नावे जीभेवर नाचत आहेत. भारतीय राजकारणात मानाचा मुजरा मिळालेल्या पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे नाव अजरामर राहिले आहे. त्यांनी देशासाठी महान कार्य केले. त्या एक मुक्त स्त्री म्हणून वावरत होत्या. परंतु स्त्री- मुक्तीतून कायमच्या हटविण्यासाठी त्यांची जणू हत्या झाली असावी.
स्त्रियांना राजकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला असला तरी, दलित स्त्रियांचे नेतृत्व उच्चवर्णियांकडे असते. स्त्रियांना ३३ टक्केच आरक्षण मग ही स्त्री पुरुष समानता म्हणायची का?
स्त्री ही नोकरी निमित्ताने बाहेर मोठ्या दिमाखात वावरत असली तरी, तिला मुलगी, पत्नी, माता, कर्मचारी, उद्योजिका, राजकारणी, अभिनेत्री, कलावंतीण या भूमिकेत पुरुषांचे वर्चस्व स्वीकारावेच लागते. पोलिसात नोकरी करणारी स्त्री दुसऱ्यांचे संरक्षण करते. परंतु नराधम पुरुषांपासून आपले लैंगिक संरक्षण करण्यास असमर्थ ठरते. हुंडा, एकतर्फी प्रेम, राजकीय दबाव याकारणासाठी स्त्रीची हत्या म्हणजे स्त्रीमुक्ती म्हणायची का? देवदासींना विवाहासाठी शासनातर्फे १०,०००/- रु. अनुदान देण्याची सोय केली आहे. परंतु अंधश्रद्धा व रुढीपरंपरेमुळे त्यांना मुक्त होता येत नाही.
केव्हा केव्हा चित्रपटसृष्टीतही प्रत्यक्षातही काम करणाऱ्या नायिकेवर अत्याचार घडविले जातात. विधवा, परितक्ता, घटस्फोटीता, दारिद्र्य, बेकारी यामुळे स्त्रिया भिक्षावृत्तीकडे वळतात. त्यांची संख्या भरपूर झाली आहे. शासनाने त्यांच्यासाठी ठोस पाऊल उचलून कार्यक्रम राबवून त्यांना सक्षम केले पाहिजे. हल्लीच्या काळात वेश्याव्यवसायाचे व्यापारीकरण झाले आहे. हल्ली दलालांचा एक गट निर्माण झाल्यामुळे पाहिजे तेव्हा त्या व्यवसायातून बाहेर पडू शकत नाही. परंतु स्त्रीयांना नाईलाजाने हा व्यवसाय करावा लागतो.
चीनमध्ये ‘बलात्कार’ प्रकार फार वाढला आहे. यासाठी बिजींगमध्ये स्त्रियांनी गुप्तहेर संघटना स्थापना केली आहे.
जपानमध्ये औद्योगिक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांबरोबर काम करतात. परंतु स्त्रियांना वेतन मात्र निम्मेच दिले जाते. अमेरिकेत समाजातील स्त्रियांचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न स्त्री संघटना करीत आहे. इराण, बांगलादेश या देशातील स्त्रिया समानतेचा विचार करुच शकत नाही. समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान केवळ भारतातच नाही तर सर्व जगात कमी अधिक प्रमाणात आहे.
स्त्री- पुरुष समानता, स्त्री शक्ती, स्त्री मुक्ती, स्त्रियांचे सक्षमीकरण हे शब्द केवळ भास आहेत व ते जणू प्रत्येक स्त्री पुढे एक आव्हानच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्टार प्लस वरील कुकुंम मालिकेद्वारही स्पष्ट होते की, आर्थिक अडचणीत देखील तिला सासऱ्याच्या परवानगीशिवाय मार्ग काढता येत नाही. शासनाने स्त्रियांसाठी महिला सुधार केंद्र, महिला बालकल्याण समिती, महिला सुधार गृहे, माहेर योजना, स्वयंरोजगार योजना राबविल्या आहेत. १९७५ पासून ‘महिला वर्षे पाळले जात असले तरी सर्व स्त्रियांना त्याचा लाभ अजूनही मिळत नाही.
स्त्री शक्तीचा विचार आचार्य विनोबा भावे यांनी मांडला तर आचार्य दादा धर्माधिकारी यांनी स्त्री मुक्तीचा विचार उचलून धरला. प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांनी स्त्री मुक्तीसाठी जोमाने लढा देऊनही आजची स्त्री मुक्त नाही.
आजच्या संगणक युगात आपण जागतिक दृष्टीकोनातून सखोलपणे विचार केला तर, खरोखरच स्त्रीमुक्ती हे एक आव्हान आहे. ते स्विकारण्यासाठी आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्नांची कास धरली तर स्त्री मुक्ती आभास न राहता प्रत्यक्षात उतरेल व हा दिवस जगाच्या पाठीवर खरोखरच ‘सुवर्ण दिन’ ठरेल.
— सौ. नैनिता नरेश कर्णिक
कायस्थ वैभव या अंकातून संकलित
संकलक : शेखर आगासकर
Leave a Reply