जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपति: ।
कपाली भुतेशो भजती जगदीशैकपदवीं
भवानि तत्त्पाणिग्रहण परिपाटी फलमि ||
म्हणजे चिताभस्म फासणारा, विष पिणारा आणि दिगंबर राहणारा, जटाधारी, ज्याच्या गळ्यात सर्प आहेत आणि जो पशुपति आहे अशा शंकराला ‘जगदीश’ ही पदवी कशामुळे मिळाली तर हे भवानि ! त्यानं तुझं पाणिग्रहण केले म्हणून त्याला हे महत्त्व प्राप्त झालं.
‘ यातला ‘अतिशयोक्ती’ हा काव्यालंकार गृहीत धरला, तरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीदेवतांना केवढं महत्त्व आहे हे कळतं ! पण आमच्या संस्कृतीचा विरोधाभास असा की स्त्रीला हे महत्त्व संस्कृतीच्या कुठल्याही क्षेत्रात फारसं मिळालं नाही.
अध्यात्म ‘ मोक्षप्राप्तीच्या मार्गातली धोंड म्हणून तिचा उल्लेख करतं, पुरुषाच्या ध्येयप्राप्तीमध्ये स्त्री ही अडथळा आणते कारण तिला पुरुष हवा असतो तो ऐहिकसुखात कालक्रमण करण्यासाठी, असं काही सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. पण हे कितपत खरंय? उलट त्याग, समर्पण आणि ज्याच्याबरोबर सात पावलं चालली त्याला त्याच्या सगळ्या मार्गावर आजन्म साथ देण्याची तयारी यासाठीच तर भारतीय स्त्रिया प्रसिद्ध आहेत.
सीता, सावित्री, दमयंती अशा पुराणकाळातल्या स्त्रियांकडे पाहिलं तर त्यांच्यावर कसलंही बंधन नसताना माहेरचं वैभव लाथाडून त्यांनी पतीला अरण्यात आणि विपन्नावस्थेत साथ दिली. पण ऐतिहासिक काळातही अशी कित्येक उदाहरणे आहेत. असं म्हणतात की तुलसीदास आपल्या पत्नीच्या सौंदर्यामध्ये गुंतून पडल्यामुळे त्यांच्या हातून आध्यात्मिक आणि साहित्यिक सेवा घडेना. तेव्हा त्यांच्या पत्नीनेच आज सुंदर दिसणारं माझं शरीर म्हणजे हाडामासाचा निव्वळ सांगाडा आहे.
या नाशवंत अस्थिमांसाच्या मोहात पडू नका, तुम्हाला फार मोठं कार्य करायचंय, असा उपदेश केला. आपल्या बायकामुलांचे हाल न पाहावल्यामुळे राणाप्रताप अकबराला शरण जायला निघाला तेव्हा त्याच्या पत्नीनंच ‘तुम्ही थकला असाल तर तुमची तलवार मला द्या. तुमची राख अंगाला फासेन आणि मी लढत मरेन, पण तुम्हाला शरण जाऊ देणार नाही’ असं बोलून त्याला स्फूर्ती दिली.
रामकृष्ण परमहंसानी संन्यस्त जीवन स्वीकारलं, तर एका अक्षरांनंही न बोलता कोवळ्या तारुण्यातल्या. शारदामांनी संसारसुखाचा त्याग केला. सावरकरांच्या घरातल्या स्त्रियांचा त्याग तर अगदी अलीकडचा पती बॅरीस्टर असूनही त्यांनी देशाला वाहून घेतलं तेव्हा कस्तुरबांनीही खादीची वस्त्रं आणि अळणी जेवणाचा स्वीकार केला. अशी किती उदाहरणं सांगावीत? अगदी सामान्य स्त्रीही संसारासाठी घराची अभिलाषा जरूर ठेवते. कणकण करून संसारासाठी सोन्याचांदीची जमवाजमवही करते. निकराच्या परिस्थितीतही शक्य असेल तोवर ते सांभाळते कारण तिलाच घर उभं करायचं असतं, पिल्लांची सोय करायची असते. पण पती का संसार असा प्रश्न आला तर संसारावर ती खुशाल लाथ मारते.
अशी साथ आजपर्यंत कुणा पुरुषानं स्त्रीला दिली आहे? तिची ध्येयाकडे वाटचाल, संसार सांभाळून होते तोपर्यंत ठीक आहे. पण त्यासाठी संसारसुखाकडे पाठ फिरवण्याचा प्रसंग आला तर? तर पत्नीला आपलं ध्येय सोडावं लागतं किंवा पती पत्नीला सोडतो नि दुसरी साथ शोधतो. आपल्याकडच्या बहुतेक ध्येयवेड्या किंवा पराक्रमी स्त्रिया या एकतर विधवा तरी होत्या किंवा परित्यक्ता तरी ! विवाहित स्त्रीला पुरुष सर्वस्वानं साथ देतोच असं नाही. पुरुषांच्या ध्येयमार्गावर मात्र विवाहामुळं बंधन आली नाहीत. उलट बहुतेकांना पत्नीच्या हातांची खंबीर साथच मिळाली.
थोडक्यात, संस्कृतीसाठी, देशासाठी वीर पुरुषांनी जो त्याग केला, त्यांच्या त्यागात कसलाही गाजावाजा न करता त्यांच्या पत्नींनी मूकपणे केलेला ऐहिक आशाआकांक्षांचा त्याग मिसळला होता. कधी कधी तर पति किंवा पुत्र कर्तव्यच्युत होत असेल तर त्यांना कर्तव्याची आठवण करून देण्याचंही काम स्त्रियांनी केलं आहे. प्रसंगी कपाळाच्या कुंकवाची आणि पोटच्या लेकराची पर्वा न करता संस्कृतीकरण करणाऱ्या स्त्रिया जगात होऊन गेल्या.
संस्कृतीचा वारसा जपता जपताच काळाच्या ओघात, त्यात आलेल्या अशा चुकीच्या किंवा आजच्या काळाशी विसंगत गोष्टी दुर्लक्षिण्यालाही मुलांना शिकवलं पाहिजे. काही गोष्टी त्या त्या विशिष्ट काळातला अपरिहार्य भाग म्हणून संस्कृतीमध्ये आलेल्या असल्या तरी आजच्या काळात त्यांची योग्यता संपली असेल, तर त्या फेकून द्यायला हव्यात. आणि त्या जागी काही नवीन स्वागतार्ह विचार यायलाही हवेत.
संस्कृती ही एक बाहती नदी आहे. काही न पटणारे, काही चुकीचे, काही कालौघात चुकीचे ठरलेले विचार तिच्यात येऊन मिसळणारच. पण नदीच्या पाण्याबरोबर गाळ येतो म्हणून नदीचं पाणी कुणी फेकून देत नाही. तसंच संस्कृतीच्या नदीचं हे पाणीदेखील बुद्धीच्या नि मनाच्या पूर्वग्रहविरहित अशा स्वच्छ कपड्यानं गाळून घ्यायला हवं.
स्त्रियांबद्दलचे संस्कृतीचे काही विचारही मुलांपर्यंत जसेच्या तसे न पोचवता त्यांची ऋजुता, सहनशीलता, समर्पणशीलता, प्रेम असे सद्गुण मुलांमध्येही रुजवण्याचा प्रयत्न केला तर? मुलीला मुलाप्रमाणे बागवा आणि सुनेला मुलीप्रमाणे बागवा, याबरोबरच मुलांमध्ये थोडे मुलींचे सदगुण रुजवा असे ठरवले तर संस्कृती जास्त सुंदर होईल काय?
Leave a Reply