नवीन लेखन...

सुहास्य..

‘सुहास्य’ हा खरा अलंकार, जो कोणत्याही मुखकमलावर शोभूनच दिसतो…

‘हास्य’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वामधला एक अविभाज्य भाग आहे. ‘स्मितहास्य’ ही एक अशी वक्र रेषा आहे जी आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते. हास्य आणि विनोद यांच्या इतकी कमालीची संसर्गजन्य गोष्ट या जगात दुसरी कोणतीही नाही. अनोळखी व्यक्तीकडे पाहून आपण सहसा हसत नाही; पण समजा आपण असा प्रयत्न केला तर त्याच्या बदल्यात आपल्याला (अगदी काहीच अपवाद वगळता) नक्कीच हास्य मिळतं. उदाहरणार्थ एखाद्या क्लास मध्ये किंवा मिटिंग मध्ये जेव्हा भीषण निःशब्द शांतता पसरलेली असते, उपस्थित सर्वांचे लक्ष फक्त वक्त्याच्या शब्दांकडे असते आणि मध्येच कुणी खुद्कन हसले तर.. इतरांना ही आपले हसू अनावर होते आणि मग सगळेच खो-खो हसू लागतात… याचा प्रत्यय सर्वांनाच आयुष्यात किमान एकदा तरी आलेला असतोच.

’हसणे’ ही एक उपजत, अफ़लातुन कला आहे. ती कुणी कुणाला शिकवत नसते, आणि शिकवता ही येत नसते. नैसर्गिक स्मितहास्यातून व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आपल्या हास्यशैलीवरून अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो. चेहऱ्यावरील हावभावांमधून मनं जोडता येतात, अशावेळी तुमचं हास्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एखाद्या सहज दिलेल्या स्मितहास्यामुळे समोरच्याच्या मनात आपल्याविषयी खूप छान मतही होऊ शकतं. त्याउलट चेहऱ्यावर हास्याची लकेर नसणं हे एखाद्याविषयी अत्यंत नकारात्मक मत तयार करू शकतं. कपाळावर आठ्या असणारी, कायम तणावात असलेली व्यक्ती कितीही सुंदर असली तरी कुरूपच दिसते. याउलट एखादी सर्वसाधारण व्यक्ती आपल्या मोहक हास्याने इतरांचे मन जिंकून घेते.

काही लोकं हसताना कायम चारचौघात कसं बरं हसायचं, असं समजून हसणे टाळतात; किंवा मनमोकळं हसण्याऐवजी किंचितस हसून वेळ मारून नेतात. याउलट, अगदी खळखळून हसणारी व्यक्ती खुपच सुंदर दिसते..तिच्या मनातले आतले सौंदर्य त्यावेळी बाहेर त्या चेह-यावर बरसते.. मग तो चेहरा विद्रुप असो, कि थकलेला, सुरकुत्यांनी भरलेला एखाद्या ७५ वर्षाच्या म्हाता-याचा असो, की धुणी भांडी करणा-या मुलीचा असो.. खुप सुंदर दिसते ती व्यक्ती…! मात्र, हसण्यात समन्वय ठेवावा लागतो. ऊठसूट हसणे अनेकदा गैरसमज निर्माण करणारे असते. तुम्हाला प्रसंगानुरूप तुमच्या हास्यशैलीत बदल करावा लागतो. हसण्याचे स्मितहास्यापासून खदाखदा हसण्याचे अनेक प्रकार आहेत व त्यांचा वापर हा नेहमीच समन्वयाने करावा लागतो. तुमचं हास्य ही तुमची ओळख असते. खोट्या हास्यातला बेगडीपणा फोल ठरतो. त्याउलट नैसर्गिक स्मितहास्यातून तुमच्यातल्या आत्मविश्वासाचा प्रत्यय येत असतो.

जीवन जगण्यात आनंद आहे, हा विश्वास देणारा मानवी आविष्कार म्हणजे हास्य ! रोजचं रुटीन आयुष्य जगता जगता जगणं बेचव, निरस होऊ लागतं. पण जर तुमच्यात विनोदबुद्धी असेल तर मात्र त्याच निरस आयुष्याला तुम्ही प्रसन्न, खेळकर करू शकता. आपल्या माणसाला तणावाच्या विचारांच्या आवर्तनातून बाहेर काढायचं असेल तर विनोदासारखा उत्तम मित्र नाही. रुग्णालयात, दवाखान्यात आजारपणाने गांजलेल्यांशीही हसून बोलले तर दुखणे जरावेळासाठी का होईना पळ काढते. हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही!

आशावादी माणूस दुःख,कटू गोष्टी विसरण्यासाठी हसतो, तर निराशावादी माणूस हसायचंच विसरतो. ज्याचं हास्य कुठल्याही प्रसंगात टिकून रहातं तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो आणि म्हणूनच स्थिर आयुष्य जगू शकतो. हसण्याने ताणतणावावर मात करता येते, हास्य नैसर्गिक वेदनाशामकतेचे काम करते, शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, सुंदर चेहर्यासाठी हसणे हा एक उत्तम व्यायाम आहे, सकारात्मक विचारांचाही विकास होतो आणि तुम्ही आयुष्यात कधीही निराश होत नाही.

 

निखळ, निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे..
‘सुहास्य’ म्हणजे एक अलंकार, दागिनाच असतो आणि..
‘सुहास्याची लुब्ध करणारी लालिमा’ ही प्रमोदिनी, अमोदिनी तर असतेच,
पण ती श्रृंगाराला एका ‘श्लील’ आणि ‘उच्च’ पातळीवर नेते.. प्रसन्नता बहाल करते,
आम्हा मर्त्य माणसांना, ती ‘प्रेयस’ आणि ‘श्रेयस’ दोघांतला सुवर्णमध्य साधायची सहजता शिकवते.. जगण्यावरचा विश्वास वाढवते ……..

— श्याम ठाकरे 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..