सर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे. करोनावरती असलेल्या अतिरेकी लक्ष्यामुळे मिडीयाने महत्त्वाच्या दोन घटनांकडे फ़ारसे लक्ष दिले नाही. चार आणि पाच एप्रिलला कश्मीरच्या लाईन ऑफ कंट्रोल वरती आणि कश्मीर खोऱ्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या एनकाउंटरमध्ये नऊ दहशतवादी मारले गेले पण त्याची किंमत सुबेदार संजिव कुमार आणी ९ जवान .
दुसरे अफगाणिस्थान मध्ये झालेली 25 शिखांची हत्या.पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे नागरिकत्व बदल कायद्याला पहिले विरोध करत होते, परंतु अफगाणिस्तान मध्ये अल्पसंख्यांकांची म्हणजे शिखांची हत्या झाल्यानंतर आता त्यांनी या कायद्याला समर्थन द्यायचे ठरवले आहे आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे की आपण अफगाणिस्तान मधल्या शिखांची शिखांचे रक्षण करावे(??).भारतात राहुन आपण त्यांचे रक्षण कसे करु शकतो?. नागरिकत्व सुधारणा कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या काहींनी केला होता. अशा सर्वना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल.
२५ शिख ठार अनेक जखमी
अफगाणिस्तानमधील शिखांच्या गुरुद्वारावर ३ आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. २५ मार्चला त्यांनी तेथील २०० भाविकांवर गोळीबार केला, बॉम्ब फेकले. त्यात २५ भाविक मारले गेले. आणि ८० लोकांना त्यांनी ओलिस धरले होते. अफगाणी सुरक्षा दलाच्या सहा तासाच्या चकमकीनंतर हे तीनही हल्लेखोर ठार झाले.
अफगाणिस्तानात गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली असली तरी त्यामागे हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबा असल्याचे भारतीय आणि पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.भारतीय दूतावासापासून तीन किलोमीटर अंतरावर हा गुरुद्वारा आहे.भारतीय दूतावास त्यांचा टार्गेट होता. पण मोठया प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त असल्यामुळे त्या तुलनेत गुरुद्वारा सॉफ्ट टार्गेट होते. म्ह्णुन दहशतवाद्यांनी गुरुद्वारावर हल्ला केला.
अफगाणिस्तानातून भारताला बाहेर काढण्याच्या उद्देश या हल्ल्यामागे होता. पाकिस्तानच्या ISI चा या हल्ल्यामध्ये सहभाग असून त्यांनी ‘ऑपरेशन ब्लॅकस्टार’ नाव दिले होते. पाकिस्तान नेहमीच हक्कानी नेटवर्कचा वापर भारतियांच्या विरुध्द करत आला आहे.
मुहसीन पीएफआयचा मेंबर
काबूल मधील शिखांच्या धर्मस्थळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांमध्ये एक केरळचा आहे. इस्लामिक स्टेटने या हल्लेखोरांचा एक व्हिडीओ आणि काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले. त्यांनी अबू खालिद अल -हिंदी अशी ज्याची ओळख करून दिली तो केरळ मधल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरपंथी इस्लामिक संस्थेचा कार्यकर्ता असल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली. त्याचे खरे नाव मोहम्मद मुहसीन असे आहे. केरळ मधील एका मंदिरावर दगडफेक करणाऱ्यां मधे पण तो होता. तो दोन वर्षांपासून गायब आहे. त्याच्यावर आरोप ठेवल्यानंतर तो दुबईला गेला व नंतर तो आयएसच्या कॅम्पमध्ये पुढील ट्रेनींगसाठी अफगाणिस्तानला गेला. नववी नापास असलेल्या मुहसीनची फॅमिली केरळ मधील कन्नूर जिल्ह्यात राहते.तो पहिल्यापासूनच कट्टरपंथी होता. शाळा सोडल्यानंतर तो इस्लामिक कट्टरपंथीयांच्या गटात सामील झाला. त्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचे अनेक गुन्हे आहेत.
भारतातुन आयसिस मध्ये गेलेल्या युवकांची माहिती नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीच्या वेबसाईट वरती मिळू शकेल. भारतातून मे २०१६ पासुन इसिस मध्ये भरती होण्यासाठी खोरासान प्रांतात आतापर्यंत शंभरच्या वर युवक गेल्याची नोंद आहे. यातील ३० केरळमधून गेले. जवळपास ७० व्यक्तींनी आधी आखाती देशात जाऊन नंतर अफगाणिस्थानात प्रवेश केला.
पीएफआय वर अनेक दहशतवादी गटांना मदत केल्याचा आरोप
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर अनेक दहशतवादी गटांना मदत केल्याचा आरोप आहे. खून, अपहरण, धार्मिक तेढ माजविणे यासारख्या देशास आणि समाजास हानिकारक असणाऱ्या गोष्टी करण्यात ती आघाडीवर आहे. या संघटनेचे पाच लाखाहून जास्त सभासद अनेक राज्यात कार्यरत आहेत. बंदी आणलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेशी तिचे संबंध आहेत. यांच्या अनेक पोटशाखा आहेत ज्या एनजीओ चालवतात. नक्षलवाद्यांशी सुद्धा यांचे संबंध आहेत. समाजसेवा आणि मानवाधिकार यांच्या बुरख्याआड त्यांची ऊग्रवादी कृत्ये चालूच असतात. दहशतवादी कृत्यांना लागणार पैसा या संघटनेला आखात, व भारतात अनेकांकडुन पैसे मिळतात.
अमेरिकेची अफगाणिस्तानमधुन माघार आणी पाकिस्तानची लबाडी अशा कात्रीत अफगाणिस्तान सध्या अडकलेला आहे.यात आता तेथिल अल्पसंख्यांकांची सुरक्षा पण धोक्यात आली आहे.
शिरकाण व्हायच्या भीतीने शिखांचे अफगाणिस्तानातुन पलायन
गुरद्वारावर झालेल्या हल्लेखोरांचा निपात करण्यासाठीदेखील अफगाण सैनिकांना परदेशी सैनिकांची मदत घ्यावी लागली . हा हल्ला शेवटचा नसणार हे स्पष्ट आहे. काबूलमधील ज्या शोर बझार भागात हा गुरद्वारा होता, तिथे तसे पूर्वी अनेक गुरद्वारा होते. पण १९८०मध्ये जिहादी बंडखोरांनी अफगाणिस्तानचा कब्जा घ्यायला सुरुवात केल्यापासून अनेक शिखांनी शिरकाण व्हायच्या भीतीने भारतात पलायन पत्करले. आता केवळ ३०० कुटुंबे उरली आहेत. ती आता तालिबानच्या किंवा आयसिसच्या भयाखाली वावरत आहेत.
सध्या संपूर्ण जगाला कोरोना विषाणूजन्य महामारीने विळखा घातलेला असून प्रत्येक ठिकाणी मदतकार्य, बचावकार्य सुरू असल्याचे दिसते. मात्र, अशा संकटाच्या काळातही जिहादी-दहशतवादी मानसिकतेच्या संस्था, संघटना धर्मांधपणापायी आपल्याहून भिन्न धर्मीयांचा जीव घेत आहेत. भारताने व भारतीयांनी गुरुद्वारावरील या हल्ल्याचा निषेध केला तसेच मृत्युमुखी पडणार्यांप्रति सहानुभूतीही व्यक्त केली. अफगाणिस्तानात हे आजच घडत नसून इथल्या अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, शीख, बौद्ध, जैन वगैरेंचा संहार अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिणामी, तिथे अल्पसंख्याक संख्या नगण्य झाल्याचे दिसते.
हिंदू-शिखांसहित कत्तलींची सुरुवात १९७० पासून
अफगाणिस्तानातील हिंदू-शिखांसहित इतरांच्या कत्तलींची सुरुवात १९७० पासून झाली. हिंदू व शिखांना संपवण्यात इथले मुजाहिदी लढवय्ये आणि तालिबानी दहशतवादी आघाडीवर होते. मुजाहिद म्हणजे रशियाच्या लाल सेनेविरुद्ध अमेरिका आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी युद्ध करणारे लढवय्ये. हे लढवय्ये जिहादसाठी लढत असून तालिबान आणि त्यांच्यात थोडाफार फरक आहे. रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसल्यापासून मुजाहिदांना अमेरिका व पाकिस्तानने पाठबळ दिले. तेव्हापासून रशियन सैन्याबरोबरच अल्पसंख्य हिंदू व शिखांनाही त्यांनी मारायला सुरुवात केली. ५० वर्षांपूर्वी काबूल व परिसरात ७ लाखांपेक्षा अधिक हिंदू व शीख राहत होते. परंतु, अफगाण युद्ध संपेपर्यंत १९९० साली त्यांची संख्या लाखावर आली आणि १९९० साली लाखभर असणार्या हिंदू व शिखांची संख्या पुढच्या ३० वर्षांत केवळ ३ हजारांवर आली.
म्हणजेच गेल्या पाच दशकांच्या कालावधीत अफगाणिस्तानातील इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या हिंदू व शिखांचे नेमके काय झाले? तर मुजाहिद आणि तालिबानी दहशतवादी या दोघांनीही इथल्या अल्पसंख्याकांवर जुलूम-जबरदस्ती केली. सामाजिक बहिष्कार आणि दडपशाही ही तर रोजची बाब झाली. इथल्या हिंदू व शिखांची घरे ओळखीच्या खुणांनी रंगवली गेली. मंदिरांची, गुरुद्वारांची तोडफोड केली, घरेदारे, दुकाने लुटली. अनेकांचे एकतर धर्मांतर केले किंवा जे त्याला तयार नव्हते, त्यांची हत्या केली. तसेच जे वाचले त्यांनी अफगाणिस्तानातून पलायन करत भारतात आश्रय घेतला.
हिंदू-शिखांना जगण्याचा अधिकार
२०१० साली तालिबानी दहशतवाद्यांनी दोन शिखांची हत्या करून त्यांचे मुंडके गुरुद्वारावर लटकावले, तर २०१८ साली अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार्या शिखांच्या बसवर हल्ला करत २० पेक्षा अधिकांचा बळी घेतला. परंतु, इथल्या हिंदू व शीख समुदायावर सातत्याने हल्ले होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ किंवा जागतिक मानवाधिकार आयोग वगैरेंनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही. जागतिक समुदायाने अफगाणिस्तानातील हिंदू व शिखांप्रति सहानुभूतीही दाखवली नाही. म्हणूनच बॉम्ब व बंदुकीच्या हल्ल्यांत ठार होणार्या या हिंदू-शिखांना जगण्याचा अधिकार नाही का, नव्हता का? हा प्रश्न निर्माण होतो.
जगातली कोणतीही संस्था, संघटना त्यांच्या साह्यासाठी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे भारतालाच या सर्वांची जबाबदारी घेणे क्रमप्राप्त होते .आता अफगाणिस्तान सरकार राजधानीसारख्या शहरात तेथील अल्पसंख्याक धर्मीय आणि अल्पसंख्याक पंथियांचे रक्षण करू शकत नाही.अशा घटनांमुळे भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची किती गरज आहे हे समोर येते.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply