नवीन लेखन...

सुखस्वप्न

शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे. अजून काही नवी गोष्ट सुचली आहे का जी आणायला हवी आहे.” मिहिर हे ऐकून खो खो हसायला लागला आणि म्हणाला, “हा हा ठीक आहे. एवढं काही चिडवायची गरज नाहीये. मी घरी आहे आणि तुला येताना त्रास नको म्हणून विचारलं तर गेलंच कुठे?” त्यावर शाल्मली म्हणाली, “ हो रे राजा! सांगितलं तेवढं आणलं ना झालं तर मग. नेहमीच कशाला फोन करायचा. आणि मी येतेच आहे ३ पर्यंत. बँकेत एक काम आहे ते करून येतेच. बिल्डिंग मधल्या बायका ५ वाजता येणार आहेत. हळदीकुंकू म्हणजे मला जरा आधीच यायला हवं. साडी नेसायला लागते ना! बरं चल मी आटोपते आणि येते. बाय…” असं म्हणून तिने फोन ठेवला. शांतनू वर्तक खरं तर शेफच व्हायचा. पण आजी आणि बाबांच्या आग्रहाखातर तो इंजिनिअर झाला. आजही त्याला ते स्पष्ट आठवत होतं जेव्हा आजीने नाक मुरडून सांगितलं होतं, “हे कसले भिकेचे डोहाळे.

आपल्या आख्ख्या खानदानात असा व्यवसाय करायचा विचार सुद्धा कुणी केला नाहीये. आणि याला म्हणे हॉटेल सुरू करायचंय.” कित्ती वाईट वाटलेलं आपल्याला तेव्हा. आईने कशीबशी समजूत काढली आपली. त्यानंतर इंजिनिअर होऊन नोकरी धरली पण मनातली इच्छा काही गेली नाही. उपम्यासाठीची तयारी काढून ठेवता ठेवता हे सगळे मागचे विचार परत एकदा त्याच्या मनात घोळायला लागले. शाल्मली या घरात लग्न करून आली पंधरा वर्षांपूर्वी आणि किती लगेच विरघळून गेली आपल्या संसारात. आम्ही एकमेकांचे कधी होऊन गेलो कळलंच नाही. कित्ती करते शालू आपल्यासाठी, आपल्या घरासाठी. आणि आपण??? आता मात्र शांतनू थोडा खिन्न झाला.

मूल होण्यासाठी पहिली काही वर्ष दोघांनी किती प्रयत्न, किती डॉक्टर केले. कुठेच काही अडसर नव्हता. पण तरीही देवाने आपल्याला मूल नाहीच दिलं. तरीही शालू गप्प राहिली. पण आता गेले आठ महिन्यांपासून आपण बिना नोकरीचे बसलोय.. ती एकटीच गाडा ओढतेय संसाराचा.. लॉकडाऊन मुळे आपली नोकरी गेली आणि आता वय म्हणा किंवा जगात आलेल्या मंदीचं सावट म्हणा कुणीच नोकरी देत नाहीये. घरात बसून नुसता कंटाळा आलाय. सकाळ संध्याकाळ चवी-ढवीचे पदार्थ बनवायला मिळतायत तेवढंच काय ते सुख. पण बाहेर पडावं वाटतंच नाही आजकाल. सगळ्यांच्या त्या चिकित्सक नजरा आणि कधीही न बोलणाऱ्यांचे मुद्दाम रस्त्यात थांबवून मारले जाणारे टोमणे. अगदी वीट येतो. शाल्मली केवढी समजूतदार आहे. तिने आजपर्यंत मला एकदाही याबद्दल काहीही विचारलं नाहीये. पण मलाच माझ्या नजरेला नजर मिळवायला लाज वाटते आजकाल. गावी असलेले आईबाबा कोरोनामध्ये खूप आजारी होते. आत्ता कुठे ते सावरतायत आजारातून तर त्यांना कुठे सांगू माझं हे रडगाणं. त्यामुळे त्यांना हे माहितीच नाहीये. शिवाय त्यांच्यासाठी झालेली हॉस्पिटलची बिलं देता देताच पुरेवाट झाली. सगळी सेविंग्ज संपली. नाहीतर एखादं छानसं हॉटेल…….”

असा विचार तो करत असतानाच कुरियर वाल्याने बेल वाजवली आणि त्याचे विचार तेवढ्यावरच राहिले. संध्याकाळी शाल्मली येईपर्यंत सगळी तयारी झाली होती. घर स्वच्छ आवरून ठेवलं होतं. कोकम सरबत, खोबऱ्याची बर्फी आणि गरमगरम उप्पीट, त्यावर घालायला बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं आणि बारीक शेव सगळं कसं त्याने छान मांडून ठेवलं होतं. “अरे वा.. काय मस्त सुवास येतोय. शांतनू तू ना एखादं हॉटेलंच काढायला हवं रे.. कसली चव आहे तुझ्या हाताला.. गेल्या वर्षभरात केवढं वजन वाढवलं आहेस तू माझं माहितेय का तुला?..” असं त्याच्या चेहऱ्याकडे बघतच ती पुढे गेली. तो हिरमुसला आहे हे तिला कळलं होतं. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण आज तिचा नूरच वेगळा होता. तिने छान तयारी केली. सुंदर साडी, त्यावर गजरा, कपाळी चंद्रकोर… तिच्या रूपाकडे पाहताच तो बाकी सगळं विसरला. “अगदी देखणी बायको केली आहे हो शांतनूने. दर वेळी असा कॉम्प्लेक्स मला दिलाच पाहिजे का शालू?” असं म्हणून तो रोमँटिक होत शाल्मलीच्या जवळ आला. त्यावर तिने त्याला नजरेला नजर देत म्हंटलं, “हो तर.. त्याशिवाय आमचे हे आमच्या जवळच येत नाहीत ना! म्हणून मग असा सगळा साजशृंगार करायला लागतो.” असं म्हणत तिने साडीच्या पदराचा शेव हलकेच उडवला. तेवढ्यात दरवाजाशी बायकांचा हसण्या खिदळण्याचा आवाज आला. म्हणून मग दोघे बाजूला झाले. सगळा कार्यक्रम छान चालू होता. पण एक प्रकारची कुजबुज कानी पडत होती. शेवटी शाल्मलीने विचारलंच.

“काय झालं सगळ्या हळूहळू काय बोलता आहात? आम्हाला दोघांना पण कळुदे.” त्यावर दोन तीन बायकांनी एकदम प्रश्नांची सरबत्ती चालूच केली. “काय ग शाल्मली, सध्या शांतनू घरीच दिसतो. कामाला जात नाही का? की काढून टाकलं? बरं जमतं बाई बायकोच्या पगारात घर चालवायला. नाहीतर आमच्याकडे…” त्या पुढे बोलणार इतक्यात शांतनू तिथून उठून जायला लागतो. त्याला हाताला अडवत शाल्मली म्हणते, ” हो आमचं दोघांचं ठरलं होतं हो काकू. की आता तो काही दिवस आराम करणार आणि मी नोकरी चालू ठेवणार. काय आहे न आमचं थोडं वेगळं आहे असं तुम्ही सगळ्याजणी नेहमीच म्हणता ना? मग काय हरकत आहे. नेहमी बाईनेच पुरुषाच्या पगारात घर चालवायला हवं असं नाहीये ना? आता काळ बदलला आहे सावंत काकू. आणि या काळात सगळ्यांच्याच घरात काही न काही उतार चढाव आलेच की. यामध्ये फक्त घरातल्यांनी नाही तर बाहेरच्यांनी पण सर्वतोपरी मदत करायला हवी की नुसते टोमणेच मारत रहायचं. आम्हाला काही हरकत नाहीये तर तुम्हाला कशाला चिंता. आम्ही दोघे आहोत त्यात सुखी आहोत आणि मी खंबीरपणे उभी आहे त्याच्यासोबत. लवकरच तो काहीतरी नवीन नक्कीच करून दाखवेल.” शाल्मली हे बोलताच सगळ्याजणी गप्प बसल्या. आणि शांतनूला खूप बरं वाटलं. सगळ्या गेल्यावर तो लाजेने मान खाली घालून शाल्मलीच्या जवळ आला. “शालू, मी खूप प्रयत्न करतोय गं नोकरी मिळण्याचे. पण नाही मिळत आहे. एकतर वय तरी मध्ये येतंय किंवा इतर काहीतरी खुसपट निघत आहे. मला माफ कर आज माझ्यामुळे तुला ऐकून घ्यावं लागतंय.” असं म्हणताच त्याच्या डोळ्यात अश्रू गर्दी करून उभे राहिले. शाल्मली त्याची मान वर करत गालातल्या गालात हसतच त्याला म्हणाली, “असं आसवं गाळत बसायचं नाही अजिबात. हे बघ तू हॉल मध्ये बस. मी येतेच तिकडे.” थोड्या वेळात ती आली तरी हा तोंड पाडून बसला होताच. आता मात्र ती खंबीर झाली, “ओ वर्तक साहेब, तुम्ही असं हातपाय गळून बसलेलं मला अजिबात चालणार नाही. कितीही संकटं आली तरी मी कायम तुझ्यासोबत आहेच. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना साथ द्यायची ठरलं आहे न आपलं.. हे घे..” तिने एक पाकीट पुढे केलं. त्याने उघडुन बघितलं तर त्यात पैशांची गड्डी होती. डोळे विस्फारतच त्याने विचारलं, “काय ग हे?” त्याला शांत करत शाल्मली म्हणाली, “अरे हो हो! मी दरोडा टाकल्यागत काय बघतोयस टकमक. हे घे आणि तुझं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण कर. आपलं एक झक्कास हॉटेल टाक बघू आपल्या ह्या कोथरूड मध्ये. तुझ्या हाताला खूप छान चव आहे असं आई नेहमी म्हणतात आणि मी अनुभवते आहेच गेली १५ वर्ष. खूप सुंदर स्वयंपाक करतोस तू. एखाद्या बाईला ही लाजवशील असा. मला माहितेय बाबा आणि आजींच्या हट्टामुळे तुला तुझं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. पण आता ही वेळ गेली नाहीये. अरे हे आपलेच आहेत.

मी शिकून इतकी वर्ष नोकरी करतेय तेव्हा तू एकही पैसा मागितला नाहीस. आईबाबांच्या आजारपणात पण मी म्हणाले तरी तू पैसे देऊ दिले नाहीस. पण आज मी हे माझ्या इंजिनिअर नवऱ्याला नाही तर, एका हॉटेलच्या भावी मालकाला देऊ इच्छित आहे. तसंही आता आपण चाळिशी ओलांडली आहेच. पाच सात वर्षांनी मी म्हणणार होतेच की आता नोकरी बास छानसा हॉटेलचा धंदा चालू कर. फक्त नोकरी गेल्यामुळे ती वेळ थोडी लवकर आली. पण काहीच हरकत नाही. देवाच्या मनात हेच असेल. उलट आत्ताच धावपळ चांगल्यापैकी जमेल. आणि मी आहेच सोबत कायम.” शांतनूच्या डोळ्यातून आनंदाने पाणीच वहायला लागलं. तो काहीच बोलू शकत नव्हता. काही क्षण शांततेत गेल्यावर शाल्मलीच पुढे म्हणाली, ” आणि हो आपलं हॉटेल छान सुरू झालं ना की हे मला व्याजासकट परत पाहिजेत बरं. एकही रुपया कमी चालणार नाही मला. सांगून ठेवते.!

चला बाई आता घरात वेगवेगळे पदार्थ करणं बंद होईल आणि त्यामुळे माझं वजन पण वाढणार नाही.. हुश्श!!” असं म्हणून तिने स्मितहास्य केलं आणि वातावरण छान प्रसन्न झालं. शांतनू ही खुश झाला. “काय गं शालू तू पण! एक सांगू.. तू नं ग्रेट आहेस. दरवेळी कुठून आणतेस इतका विचारी स्वभाव. तू इतका विचार करतेस माझा. आणि मी मात्र हा असा बेरोजगार! असो.. तू छान कल्पना दिली आहेस. आपण आपल्या हॉटेलला तू म्हणशील तेच नाव देऊ.” या विचारांनी दोघेही आनंदले. शाल्मली नवीन स्वप्न सत्यात उतरणार म्हणून देवाला साखर ठेवायला गेली. तिने मनातल्या मनात गोड सुखस्वप्न रंगवायला सुरुवात केली सुद्धा. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांतनू मात्र एकाच विचारात गढून गेला, “स्त्रीला एवढी धीरगंभीरता, समजूतदारपणा आणि खेळकर धडपड्या वृत्त्ती एकाचवेळी कशीकाय दाखवता येते बुवा….”

-सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

ll शुभं भवतु ll

(पोस्ट आवडल्यास नावासकट जरूर शेअर करा ही विनंती. फोटो गुगलवरून साभार)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..