सफेद वालाच्या दाण्यावर जलरंगाने रंगविलेला नेपाळचा आर्य गणपती
नमो भगवते आर्य गणपती हृदयाय:|
भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
सूर्य विनायकास एक मस्तक व चार हात आहेत. एका हातात परशु तर दुसर्या हातात मोदक पात्र आहे तर तिसर्या हातात रद आणि चौथ्यात हातात जपमाळ आहे. हा विनायक दोन मूषकावर बसलेला आहे. पायात नक्षीदार चिलखत, चेहरा लांबट सोंड लहान व डोळे तिरकस दाखविले आहेत. कपाळावर तृतीय नेत्र किंवा शैवगंध असावे हे विशेष. सूर्याप्रमाणे त्याला तेजोवलय दाखविले आहे. मस्तकावर शिवा सारखा किरीट आहे. शिवपुत्र न मनातही ह्या गणेशाच्या आसनावर शिवपिंडी सारखे आकार दाखविण्यात आले आहेत हे आश्चर्य होय. याही पेक्षा जास्त आश्चर्यचकित करण्यास लावणारी गोष्ट म्हणजे हातातील जपमाळ व पायावरील नक्षीदार चिलखत हे जगात न आढळणारे दुर्मिळ स्वरूप येथे पहावयास मिळते. हे ह्या मूर्तीचे प्रमुख वैशिष्ठय मानावे लागेल.
सम्राट अशोकाची कन्या चारुमती हीने नेपाळात श्री गणेशाचे मंदिर बांधले ते ८व्या शकतील असावे त्या वेळेपासून श्री गणेशाची पूजा नेपाळात सुरु झाली असावी असे वाटते. एका भुर्ज पत्रावर श्री गणेश आवाहन मंत्र दिला आहे.
नमो भगवते आर्य गणपती हृदयाय:
आर्य गणपतीचे हे नामाभिधान लक्षात घेता श्री गणेश म्हणजे भारतीय आणि नेपाळ संस्कृतीचा अपूर्व संगम होय.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply