मुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले
आनंद तर झालाच पण काळजीने घेरले
सुनेचे आगमन होणार घरात बदल होणार
माझा मुलगा अन संसारही तिचा होणार
आजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा
भांडीकुंडी अन घरभर पसारही माझा
आता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड
मनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड
भांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले
पण मनाचे भांडे खडखडच राहिले
कारण आजवर मीच होते गृहिणी सर्वश्रेष्ठ
माझेच पदार्थ वाटायचे सर्वांना चविष्ट
आता माझी घरावरची सत्ता जाणार
माझा काळजाचा तुकडाही तिचा होणार
कोणाला सांगणार मी बापडी ही व्यथा
माझ्यातली आई लपवत होती सारी अस्वस्थता
एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू
करू लागले तयारी मनाची होण्यासाठी सासू
शेवटी मनाला समजावले,
अरे सून तर येणार अन कुटुंबात बदलही होणार
पण आता कामांची विभागणी होणार
सारे तर नेहमीप्रमाणे पसारा करणार
पण आता आवरायला तिची मदत असणार
आजवर खूप केले संसार उभारण्यासाठी
आता थोडे जगू या फक्त स्वतःसाठी
आपली संसाराची खुर्ची जपून ठेवायचीच
पण आपल्या शेजारी तिची खुर्ची मांडायची
अशी झाली युती भावी सुनेशी मनाची
अन करू लागले तयारी मनापासून लग्नाची
आता तिच्या रूपाने आला आहे घरी आनंद
आता ठेवायचे आहे तिला कायम टवटवीत प्रसन्न
सौ. मंजुषा श्याम देशपांडे,
पुणे.
Leave a Reply