नवीन लेखन...

रविवार सकाळ!!‏

प्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ!! आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम!! इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे जगत असतात, किमानपक्षी सिनेमा तरी नक्कीच!! वर्षातील, ५२ शनिवार म्हणजे ५२ पार्ट्या, हेच इथल्या आयुष्याचे महत्वाचे सार आहे. शुक्रवार दुपार झाली की मुलगा, मुलीला घेऊन( बव्हंशी उलटे देखील!! म्हणजे मुलगी,मुलाला घेऊन!!) कुठे रात्र काढायची, याचे Plans ठरवायला लागतो.इथे, रात्रीचे जेवण साधारणपणे ७ पर्यंत घेतले जाते. नंतर मग सगळी रात्र ताब्यात घेण्यासाठी!! यातून कुठलाच समाज सुटलेला नाही. गोरे, काळे, भारतीय, सगळेच हा अलिखित नियम पाळत असतात.आठवड्याची सगळी धडपड ही शनिवार रात्रीसाठी असते!!
सुरवातीला मला हे जमवून घेणे अवघड गेले. संध्याकाळी सात वाजता, जेवण!! मुंबईकराला त्याचे अप्रूप वाटणारच.मला तर अजूनही वाटते. अर्थात, जिथे दुपारचा “लंच” म्हणजे एखादे Sandwich, तिथे मग रात्रीचे(!!) जेवण इतक्या लवकर क्रमप्राप्तच!!
इथल्या पार्ट्या देखील “परिटघडीच्या” असतात. मोजके  बोलणे(हा ब्रिटीश खाक्या!!), त्यातून ओठातल्या ओठात पुटपुटल्यासारखे शब्दोच्चार, (गरजूंनी परदेशी जाताना, अशा बोलण्याचा सराव किंवा निदानपक्षी ऐकण्याचा सराव जरुरीचा आहे!! अनाहूत सल्ला!!) अशी सुरवात असते. जरावेळाने, संगीत (अर्थात बहुतकरून पाश्चात्य अर्थात पार्टीत  गोरे किंवा काळे असेल तर!! भारतीय असतील तर “चटणी” नामक भयाण संगीताविष्कार सहन करावा लागतो!!) लागले की, हळूहळू लोकांना “कंठ” फुटायला लागतो. म्हणजे कुणी “गात” नाही पण लयीच्या अंगाने बोलणे सुरु होते. सगळा कारभार बहुतांशी उभ्यानेच!! कारण, इथे पार्टी म्हणजे, बव्हंशी Barbecue असतो. एका मोठ्या लोखंडी भांड्यात ( पातेलीपेक्षा घेर आणि आकार मोठे आणि मुख्यत: चौकोनी!!) त्यात, कोळसे घालायचे आणि पेटवायचे.
धगधगीत निखारे व्हायला लागले की त्यावर जाळी (लोखंडाची) ठेवायची आणि त्यावर मग, चिकन,मटण,सोया, पोर्क किंवा बीफ देखील, यांचे तुकडे (थोडा मसाला लावून ठेवलेले), याला  sausages, chops असे म्हणतात. भाजून करपले की  काढून हातातील प्लेटमध्ये वाढून घ्यायचे. बहुतेक पार्ट्यांमध्ये हाच “मेनू” असतो. फरक, मसाल्यामध्ये!! अर्थात, हातात, ग्लास हवाच!! त्यात, कधी बियर, कधी व्हिस्की असे पेय असते. एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हातात प्लेट, अशी कसरत करावीच लागते!! त्याबरोबर मग गप्पा मारायच्या, असाच बहुतेक पार्ट्यांच्या बाबतीत “सोहळा” असतो. इथे तसा औपचारिकपणा भरपूर. शक्यतो चेहऱ्याची घडी न मोडता, आपला वावर ठेवायचा आणि तत्सम पार्टी “जोक्स” एन्जॉय करायचे!!
हे जोक्स इतके भयानक असतात की, का हसायचे? हा मला नेहमीच प्रश्न पडतो!! समजा गोऱ्या लोकांच्यात पार्टी असेल तर, तिथे त्यामानाने मोकळेपणा (क्वचित नको तेव्हढा देखील!!) आढळतो. संगीतावर, जसे जोडपे असेल त्याप्रमाणे जोड्या तयार होतात आणि लगेच पाय थिरकायला लागतात. इथे, लग्नाची/बिनलग्नाची असला “बुरसटलेला” प्रश्नच उद्भवत नाही!! नृत्य करणे, हे महत्वाचे!! आपल्याला बघताना असे वाटते की  पाश्चात्य नृत्य एकसाची आणि सोपे आते पण प्रत्यक्षात असा प्रकार नसतो. Ball Dance, Salsa, Rap या सगळ्या संपूर्ण वेगळ्या नृत्यशैली आहेत. प्रत्येकाची पायाची, आणि तदनुशंगाने शरीराची हालचाल भिन्न आहे. खरे तर संगीतात देखील भिन्नता आहे. आपण बारकाईने ऐकत/बघत नाही. अनिलने देखील बरेचवेळा सहभाग घेतला आहे.
पहिल्यांदा अपरिचित/संकोची वाटते परंतु इथे तशी औपचारिकतेची बंधने नंतर गळून पडतात. परंतु गोऱ्या, काळ्या किंवा भारतीय समाजातील पार्टीची पद्धत ही बव्हंशी अशीच. प्रत्येक शनिवार याच धर्तीवर घालवली जाते. अनिल काही प्रत्येक शनिवारी असा जात नव्हता. त्याने देखील, नंतर स्वत:चे “ग्रुप्स” तयार केले. टिपिकल महाराष्ट्रीयन लोकांच्या पार्ट्या होतात. तिथे बरेचवेळा मानसिक कुतरओढ दिसते. बहुतेक सगळे, मध्यमवर्गीय संस्कृतीमधील परंतु काहीजण,इथले युरोपियन वातावरण बघून, थोडे बावचळलेले!! त्यामुळे, या संस्कृतीत वावरताना, मनाची कुतरओढ होताना दिसते. एकदम, आपली संस्कृती टाकून देता येत नाही आणि इथल्या संस्कृतीत लगेच सामावून घेणे अवघड जाते. खरेतर संस्कृती टाकायची गरज काय, हा माझा प्रश्न!!
शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळ, इथे “सोहळा” म्हणून साजरा करायची पद्धत आहे. गोऱ्या संस्कृतीने दिलेली, या देशाला देणगी!! जवळपास शतकाहून अधिक वर्षे गुलामीचे दास्य लादलेले, त्यामुळे, गोरे सोडले तर सगळ्यांचीच मानसिक स्थिती दोलायमान!! अजूनही त्या खुणा दिसतात. गोरा दिसला की दबकून बोलायचे/वागायचे, अशीच इथली मानसिक ठेवण आहे. अर्थात, असे जर असेल तर गोरे लोक, गुर्मीत राहणारच!! त्याचा प्रत्यय, आज २० वर्षे झली तरी येतो. त्यामुळे, इथल्या गोऱ्यांच्या पार्ट्या, घरे, गाड्या, राहणीमान सगळेच इतरांपेक्षा “उच्च”!!
अजूनही, पूर्वीच्या गोऱ्या लोकांच्या वस्त्या बघितल्या तरी कल्पना येते. नुसत्या वस्त्याच नव्हे तर त्या वस्तीतील हॉटेल्स, क्लब्स, मॉल्स सगळे वेगळ्या ठेवणीचे!! इथे, सहज मनात आले म्हणून भेटायला जाणे, हि अजिबात पद्धत नाही. अगदी, आपल्या आई/वडिलांना भेटायचे झाले तरी, फोनवरून भेटायची वेळ ठरवायची, शक्यतो, शनिवार दुपार किंवा रविवार दुपार!! संध्याकाळ, सोहळ्यासाठी रिकामी ठेवायची असते!! तुम्ही, कुणाच्याही घरी, “सहज या बाजूला आलो, तेंव्हा भेटूया” असे जाता येत नाही.
केवळ नजरेने “नापसंती” व्यक्त होते किंवा समजा गोरा असेल तर तोंडावर “नापसंती” ऐकण्याची तयारी ठेवावी!! एकांतवास या गोष्टीला, इथे अपरिमित महत्व दिले जाते, तरुणाईला!! इथे प्रत्येक वयोगटाचे समूह असतात. वयाची २१ वर्षे झाली की तो वेगळ्या गटात!! लग्न झाले की वेगळा गट!! तिशी, चाळीशीचे वेगळे गट!! इथली समाजव्यवस्थाच किडलेली आहे!! लग्न म्हणजे निरुपाय, असेच बहुतेकांचे मत आहे!! हे सगळे भारतीय संस्कृतीत राहिलेल्याला पचविणे अवघड असते.
शनिवारच्या पार्ट्यांत ह्या सगळ्या दृष्टिकोनाचा अनुभव येतो. ह्याशिवाय इथे वेगळे आनंदनिधान नाही!! फार तर, मॉल्समध्ये जाऊन खरेदी करणे( हे मात्र प्रचंड!!), तिथेच सिनेमाला जाणे किंवा तिथेच असलेल्या अप्रतिम पब संस्कृतीचा अथवा तरुण असलात तर वेगवेगळ्या क्लब्जचा आस्वाद घेणे!! आपल्याला ह्यामागील उद्देश नेमकेपणाने कळत नाही. पण इथला समाज ह्याच संस्कृतीत सुखनैव बुडालेला आहे. आता, हि संस्कृती बरोबर की चूक, हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांना नाही!! इथे एकत्र जमलो की निदान जे संगीत चालू आहे, त्याचा मनापासून “आस्वाद” घ्यायचा असे नसून, त्यात “दिखाऊ” वृत्ती अधिक!! साहित्यावर बोलायचे ठरले (असे फार क्वचित घडते, मला असा अनुभव फक्त २ वेळा आला आहे!!) ठरले तर आवड इतकी वेगळी असते की त्यावर काय बोलायचे, हाच मला प्रश्न!! संगीत हे संगीत म्हणून ऐकण्यापेक्षा त्यातील ठेक्यालाच अधिक महत्व!!
याचा कळस, भारतीय वंशातील लोकांना भेटल्यावर होतो. अशाच प्रकारे, अनिलची वर्षे गेली, जात राहिली. असे शेकडो शनिवार आले आणि रेनकोटवरून पाणी ओघळावे त्यप्रमाणे ओघळून गेले!! रविवार सकाळ, यातूनच उगवते. आदल्या रात्री अशाच पार्टीला गेल्याने, अंगात प्रचंड आळस भरलेला, त्यामुळे तसाच बेडवर पसरलेला!! बेडवरून खाली उतरावे, असेच वाटत नाही सकाळचे एव्हाना ९(च) वाजलेले असतात.आदल्या रात्रे थोडा पाऊस शिंपडल्याने बाहेर “गारठा” म्हणावा अशी थंडी पसरलेली!! त्यामुळे, अनिल आपले हात पसरतो आणि बाजूलाच असलेल्या सीडी प्लेयरचे बटण दाबतो!! सिस्टीममधून रागदारीचे सूर ऐकायला येतात आणि त्या सुरांच्या गुंगीत परत झोपेच्या अधीन होतो!!
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..