आज ७ नोव्हेंबर..आज मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या *सुनीता देशपांडे यांची पुण्यतिथी*
जन्म :- ३ जुलै १९२५
पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. मा.पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. खरे तर सुनीताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटक आणि चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या. ‘वंदे मातरम्’ या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असे असूनही कलावंत म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. नंतर या दोघांनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्यांचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरू केले तेव्हा सुनीताबाईंची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रसिकांना ओळख झाली. कविता हा त्यांचा जीव की प्राण होता. मराठीतील अनेक कवींच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या काव्यप्रेमातूनच जाहीर काव्यवाचनाचा हा कार्यक्रम साकारला होता.
१९९० मध्ये ‘आहे मनोहर तरी’ हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याने साहित्य वर्तुळात तसेच पुलंच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले व गुजराथी आणि इंग्रजीत अनुवादित झाले तरी त्याला पुलंसारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचेच वलय होते. त्यानंतर मात्र ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’ आणि ‘सोयरे सकळ’ या त्यांच्या पुस्तकांनी त्यांची साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.. ‘प्रिय जी. ए.’ हे त्यांचे प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक. त्यांचे अत्यंत आवडते लेखक असलेल्या जी. ए. कुलकर्णीना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत वेगळे असे दालन ठरले आहे. पुलंच्या ठायी असलेल्या कलंदर वृत्तीला गोंजारत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्या दातृत्वासही सामाजिक जोड दिली. सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक सहवेदना असलेला एक कलावंत दडला होता. त्यामुळे लोकांची दु:खे एका कलावंताच्या नजरेने टिपल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या अनेक संस्थांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळू शकल्या. अनिल अवचट यांचे मुक्तांगण, पाल्र्याचा लोकमान्य सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद, ग्रामायन यासारख्या अनेक संस्थांना पुल – सुनीताबाईंनी अक्षरश: लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. त्या प्रत्येकवेळी त्याची वाच्यता होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली. त्यासाठी या दाम्पत्याने साधी राहणी पसंत केली. मा. सुनीता देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply