१३ डिसेम्बर १९८६- माळेगाव मधून चंबूगबाळे आवरून मी टेम्पोसह इस्लामपूरला भल्या सकाळी निघालो होतो, सामान टाकून परतायचे होते दिवसाखेरीच्या आत ! कुटुंब कबिला आधीच धाडला होता पुण्याला.
साधारण दुपारच्या सुमारास स्मिताच्या मृत्यूची वार्ता कानी आली.(वय ३२), माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी. १९७५ ते १९८६ एवढ्या इवल्याशा काळात दूरदर्शन, रंगभूमी, चित्रपट सगळ्या व्यासपीठांवरून लीलया वावरलेली.
कितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली- ” शक्ती ” मध्ये ! नुकतेच दिवंगत झालेले सार्वकालिक महान कलावंत दिलीपकुमार, जोडीला अमिताभचा अंगार, मध्येच शिडकाव्यासाठी शीतल (चित्रपटातील नांवही हेच असलेली) “राखी” यांच्या तुल्यबळ भूमिकांपुढे लहानखुरी स्मिता छोट्याशा भूमिकेत जमून गेली. तिची व्यथा,तीव्रता या तिघांपेक्षाही वेगळी होती आणि ती स्मिताने छान पेलली होती. अमिताभची हिरॉईन त्याच्या झंझावातासमोर टिकणे मुश्किल असते पण ही ठसा उमटवून गेली.
अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता.
आज आहे तेवढ्याच इंटेन्स- मुक्ता बर्वे आणि तापसी पन्नू.
कुटुंबातील कुतरओढ आणि उंबरठा ओलांडल्यावरचा जगाचा शामियाना- दोन्हीकडे (कर्तृत्व) असूनही अपयशी. कारण एकच- स्वतःचा अंतःस्वर ऐकणे.
” सुन्या सुन्या ” पार्श्वभूमीवर आणि भलाथोरला चष्मा लावलेली, उध्वस्त डोळ्यांनी अल्बम बघतानाची स्मिता तिच्या गमावण्याचे हिशेब मांडताना पराभूत वाटली.
कदाचित प्रत्यक्ष जीवनातही.
समुद्रकिनारा, पती आणि कन्येबरोबरचे अप्राप्य क्षण आणि ते धरून ठेवण्याची असोशी डोळ्यांमधून मुक्तपणे सांडणारी !
” उंबरठा ” मला सुरुवातीला खटकला – एखादा पुरुषही असा घराबाहेर पडला असता तर स्मिता इतकी किंमत त्यालाही चुकवावी लागलीच असती. त्यांत तिचं काय मोठंसं श्रेय?
पण नाही- इथे प्रार्थना होती तिची ” गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळू दे”
घरात राहून गंजलेल्या, काहीतरी करू पाहणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रीला उंबरठा ओलांडावाच लागतो. बाहेरच्या उनपावसात गेल्याशिवाय व्यक्तिमत्वाला वज्राची धार येत नाही. प्रश्न घरचेही सुटत नाहीत आणि आश्रमातीलही !
पण परतून घरी यावे तर घरटं /त्यातील पिल्लू अनोळखी झालेलं ! घरात-घराबाहेर दोन्हीकडे पराभव असतात आणि गंमत म्हणजे कर्तृत्व असूनही ते झेलावे लागतात. मग ओठ पुन्हा गंजतात.
या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्मिता धाय मोकलून रडली होती अशी पंडित हृदयनाथांनी आठवण सांगितली आहे. सुरेश भटांना स्मिताचे आंतरिक दुःख इतक्या आधी कळून शब्दबद्ध करावेसे वाटले असेल? तिच्या व्यक्तिगत उंचीला साजेशी वरच्या पट्टीतील चाल हृदयनाथांना आधीच सुचली असेल आणि लता मंगेशकर इतक्या सहजतेने हे गीत उंचीवर नेऊ शकल्या ते केवळ पुढेमागे स्मिताला त्याच तोलामोलाची श्रद्धांजली वाहता यावी याची आधीच कल्पना आली असेल म्हणून ?
मला मात्र ती तीव्र स्मिता १३ डिसेम्बरला या त्रिकुटाला सहजगत्या मागे टाकून “गगन सदन ” मध्ये पोहोचलेली दिसली.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply