नवीन लेखन...

सुपारीचं खांड

लग्न जुळवताना बबड्याचे आई वडील मुलीकडील नातेवाईकांना अगदी आवर्जून सांगतात, ‘आमच्या मुलाला साधं ‘सुपारीच्या खांडा’चही व्यसन नाहीहोऽ’
व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे. सदाशिव पेठेत रहात असताना आमच्या मागील वाड्यात देशपांडे काकू रहायच्या. त्यांना सुपारी खाण्याचं जबरदस्त व्यसन होतं. अंगकाठीने काटकुळ्या असलेल्या देशपांडे काकू कायम सुपारीची खांडं चघळताना दिसायच्या. फक्त सुपारी नेहमी खाल्ली तर जीभ जड होते, बोलताना अडखळायला होतं. त्यामुळे देशपांडे काकू जे काही बोलायच्या ते त्यांच्या घरच्यांशिवाय कुणालाही कधी कळत नसे.
सुपारीमध्ये तीन प्रकार आहेत, साधी, भाजकी आणि चिकणी. ज्यांना दात नाहीत, त्यांच्यासाठी कतरी सुपारी मिळते. चिकणी सुपारी ही खरंच देखणी असते. धोडी बसकी, पेढ्याच्या आकाराची, मरुन रंगाची असते.
तंबाखू हे भारतातील निम्म्याहून अधिक जनतेचे ‘कडक’ व्यसन आहे. मजूर, हमाल, कष्टकरी वर्ग हातावर चिमूटभर तंबाखू आणि चुना मळल्याशिवाय काम करुच शकत नाही. त्यामुळे ‘किक’ बसते आणि त्या बधीर अवस्थेतच काम निपटून टाकले जाते. संसर्गाने हेच व्यसन कलाकारांना, अभिनेत्यांना, अधिकारी, राजकारणी वर्गालाही लागलेले दिसते. काहीजण उघडपणे करतात तर काही आडोसा पाहून मळतात. चित्रपट सुरु होण्याआधी एक तंबाखू व्यसनावरील फिल्म दाखवली जाते. अवघ्या तीस वयाच्या तरुणाची तंबाखूने झालेली दुर्दशा पहावत नाही. ती फिल्म पाहिल्यावर पुढे सुरु होणारा चित्रपट पहाण्याची इच्छाच रहात नाही.
महाराष्ट्रातील स्त्रियांचं सर्वांत आवडतं कोणतं व्यसन असेल तर तंबाखूच्या मिशेरीचे. सातारी जर्दा हा सर्वोत्तम ‘ब्रॅण्ड’ मानला जातो. चिपळूणकर, इब्राहीम, गाय छाप हे मिशेरीसाठी नामवंत जर्दा आहेत. ही तंबाखू भाजायची आणि ती फळकुटावर वाटून त्याचे चूर्ण करुन बत्तीशीवर बोटाने पसरवायचे. मग जी ‘किक’ बसते, त्यामध्ये भरपूर कामे ‘मुकाट्यानं’ पार पाडली जातात. माझी आई मिशेरी लावायची. मी मंडईत जाऊन काळ्या तंबाखूची लांब पानं पावशेर विकत आणायचो. घरी आल्यावर त्याचा चुरा करुन तो स्टोव्हवर पत्र्याच्या झाकणात भाजला जात असे. खरपूस भाजल्या नंतर लाटणे किंवा खेड्यात फुंकणीने लाकडी फळकुटावर लाटून त्याचे चूर्ण केले जायचे. ती मिशेरी एका डबीत भरुन ठेवली जात असे. काही जण पिवळी तंबाखू (अकोला) भाजून त्याची मशेरी लावतात. आता माझ्या आईची गादी, परंपरेने पत्नी चालवत आहे. गाय छाप पुडीवरील वैधानिक इशारा वाचूनही हे मिशेरीवाले आपलं ‘व्यसन’ काही केल्याने स़ोडत नाहीत.
तंबाखूचे पान खाणारी मंडळी भारताएवढी जगात कुठेही नसतील. पानाच्या तंबाखूचे नंबरही असतात. १२०, २२०, कलकत्ता, किवाम, फुलचंद, इ. सरकारी इमारतींमधील जिन्यांचे कोपरे या पान खाणाऱ्यांनी रंगवलेले असतात. तिथे देवादिकांच्या टाईल्स लावूनही फारसा फरक पडत नाही. या सर्व पान खाणाऱ्यांच्या गळ्यात सक्तीने पिंकदाणी घातली तरच त्यांचे रस्त्यावर, जिन्यात थुंकणे थांबेल.
तीस वर्षांपूर्वी बाजारात सुगंधी तंबाखू उर्फ गुटखा आला आणि तरुणवर्ग व्यसनाधीन झाला. या गुटखा निर्मात्यांनी अब्जावधी रुपयांचा फायदा मिळवून तरुणपिढी बरबाद केली. कायद्याने बंदी घालूनही मागच्या दाराने गुटख्याची विक्री चालूच आहे. चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका स्मिता तळवलकरला गुटख्याचं व्यसन होतं, त्यामुळे ती कॅन्सरने गेली. तिच्या चित्रपटाची वेशभूषा सांभाळणारा आमचा मित्र अवधूत साने हा गुटख्याच्या अति सेवनाने गेला. मी जिथे झेराॅक्सचं काम करुन घेतो त्या एक्स पाॅईंटचा मालक हरी, हा गुटखा खाऊन काटकुळा झाला आहे. मी हजारदा सांगूनही ऐकतच नाही.
राम गणेश गडकरी यांनी आपल्या ‘एकच प्याला’ मध्ये सुधाकरसारख्या हुशार वकिलाची तळीरामने केलेली दयनीय अवस्था दाखवूनही आजचे सुधाकर सुधारत नाहीत. चित्रपट सृष्टीतील अण्णा देऊळगावकर नेहमी सांगायचे, ‘तुम्ही घोड्यावर स्वार व्हा, मात्र घोड्याला तुमच्यावर कधीही स्वार होऊ देऊ नका.’ आजकाल नव्याण्णव टक्के टाकळकरांवरती घोडेच स्वार झालेले दिसतात. सिने-नाट्य सृष्टीला या व्यसनाने ग्रासलेले आहे.
सिगारेट पैसेवाल्यांची, बिडी गरीबांची. दोन्हीही घातकच. सिगारेट, बिडी ओढून फुफ्फुस खराब होतात. वृद्धापकाळात जेव्हा दम लागू लागतो, एक्स रे मध्ये टीबी झाल्याचं निदान होतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. माझे एक प्रोफेसर मित्र आहेत, ते चेन स्मोकर आहेत. सत्तरीनंतरही मला सिगारेट ओढण्याने काही होत नाही असं मोठ्या फुशारकीनं सांगतात..
पत्ते खेळणं हा पूर्वी सुट्टीमधील टाईमपास होता. पूर्वी रविवारी चाळीत रहाणारी माणसं पत्त्यांचा डाव टाकायची. चहा, सिगारेट ओढत आठवड्याचा शीण घालवायची. काही वर्षांनंतर पैसे लावून पत्ते खेळणं सुरु झालं आणि जुगाराच्या व्यसनानं कित्येक जण कफल्लक झाले. जुगार आणि मटका या व्यसनाने मजूर वर्गाबरोबरच नोकरदार देखील भिकारी झाले.
रेस खेळणारे जास्त करुन श्रीमंतच असतात. एकदा घोड्यावर पैसे लावले की, तासाभरात निकाल लागतो. जर नशीब जोरावर असेल तर पैसे येतात, गेले तर घरी जाण्यासाठी ते टांगाही करु शकत नाही.
एकूण काय, माणसाचा जन्म मिळाला आहे तर आनंदाने जगा. व्यसनाधीनतेने स्वतःला व आपल्या प्रियजनांना दुःखाच्या खाईत लोटू नका. कारण…
जिंदगी, ना मिलेगी दोबारा..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
४-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..