नवीन लेखन...

दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे समर्थक जास्त धोकादायक

Supporters of Terrorists are More Dangerous

आपले सैन्य देशाच्या सीमांचे संरक्षण डोळ्यात तेल घालून करीत आहेत. हे करीत असताना पाकिस्तानच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद होत आहेत, तर काहींना दहशतवाद्यांशी लढतालढता वीरमरण येत आहे.आताही मध्यप्रदेशच्या भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून `सिमी’ या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसटल्याची घटना घडली. मात्र, कारागृहातून पळालेल्या या आठ दहशतवाद्यांना आठ तासांतच सोमवारी चकमकीत ठार करण्यात आल्याने पुढील फार मोठा अनर्थ टळला. या दहशतवाद्यांनी तुरुंगातून निसटताना सुरक्षा रक्षकाची गळा चिरून हत्या केली.

वाहिन्यांवर उथळ चर्चा बंद करा

भोपाळच्या तुरुंगातून सिमीचे जिहादी पळाल्याची बातमी ०१ ओक्टोबरचा सकाळी कळाली. अनेक वाहिन्यांवर मध्य प्रदेश सरकार, पोलिस आणि तिथल्या तुरुंग प्रशासनाला निष्काळजी,निक्कमे ठरवण्याची स्पर्धा चालू झाली. हल्ली जनता अशा बातम्या फारशा मनावर घेत नाहीत. कारण वाहिन्यांवर फार उथळ चर्चा चालतात आणि बातमीही सनसनाटी माजवण्यासाठीच चालते.

काही तासातच तुरुंगातून फरारी झालेल्या त्या आठ सिमी अतिरेक्यांचा खात्मा चकमकीत झाल्याची बातमी आली. मग थोड्या वेळापूर्वी जे पोलिस गाफील, नालायक व नाकर्ते होते, त्यांच्यावरच आता खोट्या चकमकीचा आरोप सुरू झाला. त्यासाठी सरकार व मंत्र्यांना जाब विचारण्याची स्पर्धा सुरू झाली.चर्चेत काही गांभीर्य नव्हते. अल्पावधीतच त्याच घटनेचे अन्य कोणी मोबाईल कॅमेर्याने केलेले चित्रण समोर आले. एक नव्हेतर तीन वेगवेगळी चित्रणे समोर आली. त्यातून चकमक खोटी ठरवण्यासाठी युक्तिवाद सुरू झाले. देशांच्या नागरिकांमधे भांडाभांडी लावणे,अतिरेकी विचार सरणीच्या लोकांना विना कारण प्रसिध्दी देणे,पुरेशी माहीती नसतांना अतिरंजीत बातम्या प्रसीध्द करणे बंद केले पाहीजे.

या दहशतवाद्यांना मध्यवर्ती कारागृहाच्या `बी’ ब्लॉकमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांनी पळून जाण्यासाठी चादरींचा उपयोग करत कारागृहाची भिंत ओलांडली. या सार्यांना `बी’ ब्लॉकमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दहशतवाद्यांनी बराक तोडल्यानंतर मुख्य सुरक्षारक्षक रामाशंकर याची स्टिलच्या जेवणाच्या प्लेटने गळा चिरून हत्या केली. दुसर्या पोलिसाचे त्यांनी हात-पाय बांधून ठेवले होते.मानिखेडा येथे हे दहशतवादी लपले असल्याचे पोलिसांना समजले. मनिखेडा येथे काही ग्रामस्थांनी त्यांना खडसावले असता त्यांनी ग्रामस्थांवर दगडफेक सुरू केली.

ग्रामस्थांना सुरुवातीला हे लोक चोर असावेत असा संशय आला. पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता नजिकच्या गावातील डोंगराळ भागात ते दडून राहिल्याची माहिती गावकर्यांनी दिली. त्यानंतर पोलिस आणि एटीएसने 10.30 वाजता भोपाळपासून 10 किलोमीटर दूर पर्वतावर या दहशतवाद्यांना घेरले. त्यांना प्रथम शरण येण्यास सांगितल्यावर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. सुमारे 45 मिनिटे चाललेल्या चकमकीत सर्व दहशतवादी ठार झाले.

पोलिस, सैन्यात भरती झालेला अतिरेककडून मारला जाण्यासाठीच

आठ खतरनाक आरोपी पोलिस गोळीबारात मारले गेले, त्याची चिंता व्यक्त करणार्यांना तुरुंगात बळी घेतला गेलेल्या रखवालदाराच्या मरणाची फिकीर नव्हती.पोलिस वा सैन्यात भरती झालेला माणूस हा अतिरेकी, खुनी वा जिहादी यांच्याकडून हकनाक मारला जाण्यासाठीच जन्माला आलेला असतो, असा काहींचा समज आहे. चर्चेत मारल्या गेलेल्या तुरुंग रक्षकाच्या हत्येविषयी एक खेदाचा दु:खाचा शब्द उच्चारला नाही. तो नि:शस्त्र मारला गेल्याची कुठली वेदना बातमीत वा चर्चेत दिसली नाही; पण आठ अतिरेकी मारले गेल्यावर चिकित्सा सुरू झाली. गुन्हेगार वा घातपाती असणे म्हणजेच निरपराध असणे आणि म्हणून चकमकीत तशा कुणाचा मृत्यू म्हणजे भयंकर गुन्हा घडल्याची चर्चा होते.उंटावरुन शेळ्या हाकणार्या तद्यांना हे कळत नाही हीच खरी समस्या आहे.

यापैकी दोघे 2013 मध्येही कारागृहातून पळाले होते. 2013 मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते.त्या सात दहशतवाद्यांना तीन वर्षांनी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तुरुंग अधीक्षकासह 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसने या चकमकीवर प्रश्नचिन्ह लावत घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर आम आदमी पक्षानेही चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मानवतावाद्यांची दहशतवादी पकड्ण्यासाठी खास पथके बनवावी

चकमक झाली तर त्यात पोलिस कसा मारला गेला नाही? कोणी पोलिस जखमी कसा झाला नाही? मारले गेले त्यांना शरण येण्याची संधी दिली होती काय? त्यांना जिवंत पकडणे शक्य असतानाही मारले काय? किती प्रश्नह विचारले जातात; पण अशा हत्यारबंद वा खतरनाक गुन्हेगारांना पकडणे म्हणजे कसा जीवावरचा खेळ असतो, याचे तरी भान प्रश्न विचारणार्यांना उरलेले आहे काय? पोलिसांनी जीवावर उदार होऊन गुन्हेगारांना सुखरूप पकडले पाहिजे, ही कुठली अमानुष अपेक्षा आहे?

मानवतेचा इतकाच पुळका ज्यांना आलेला असतो, त्यांनी आपली खास पथके बनवावीत आणि असे प्रसंग येतील, तेव्हा पुढाकार घेऊन कोंडीत सापडलेल्या दहशतवादी वा गुन्हेगारांना सुखरूप पकडण्यासाठी सज्ज रहावे. म्हणजे मग पोलिसांना खोट्या चकमकी करण्याची गरज भासणार नाही, की संधीही मिळणार नाही. किती मानवतावादी त्यासाठी आपला जीव धोक्यात घालायला तयार होतील? ज्यांचा मानवतावाद गुन्हेगारांच्या सुरक्षेसाठीच राखीव आहे आणि पोलिसांचा बळी जाण्याच्या बळावर उभा आहे, त्यांच्या कुठल्याही शब्दावर विश्वायस ठेवण्याची गरज नाही. इतकाच भोपाळच्या घटनेने दिलेला धडा आहे. कुठूनही सरकारी यंत्रणेला किंवा पोलिस सेनादलाला नामोहरम करण्यापलीकडे अशा लोकांचा कुठला अन्य हेतू नसतो.या सगळ्यांनवर कायदेशीर कारवायी केली पाहिजे.

दहशतवाद्यांचे मनोबल वाढविण्याची स्पर्धा

कैदी पळाले म्हणून सरकारची निंदा करायची.मात्र अल्पावधीत कैदी सापडले आणि चकमकीत मारले गेल्यास सरकार पोलिसांवर हत्याकांडाचा आरोप करायचा.असे बोलणारे, प्रश्नल विचारणारे किंवा शंका निर्माण करणारे ठराविक लोक; आपल्या ओळखीचे झाले आहेत. सीमेवर किंवा अन्य कुठल्या चकमकीत नागरिक वा पोलिस मारले जातात, तेव्हा यापैकी कोणी एकही अश्रू ढाळायला पुढे आलेला दिसणार नाही. विविध बॉम्बस्फोट व मुंबईतला कसाब टोळीचा हल्ला, यात शेकड्यांनी माणसे किडामुंगीसारखी मारली गेली. तेव्हा यापैकी एकही मानवतावादी पुढे आला नाही; पण त्यापैकी कसाब वा याकुब मेमन, अफजल गुरू यांना फाशी देण्याच्या वेळी आकांत करायला हीच मंडळी पुढे होती. हे आता नेहमीचे नाटक झाले आहे.जिहादी, नक्षलवादी वा दहशतवादी यांची पाठराखण करणार्यांचे चेहरे आता आपल्याला माहित आहेत.
आपल्याच देशातील काही लोकात ‘पोलिसांनी काय हे क्रौर्य केले? पोलिसांनी काय हे अमानुष व निर्घृण काम केले?’ असे वक्तव्य करून दहशतवाद्यांचे मनोबल वाढविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हा खेळखंडोबाच आहे. त्याचे समर्थन कोणी करू नये. दिवाळीच्या धामधुमीचा फायदा घेत तुरुंगातून पळून जाण्याचा कट ‘सिमी’च्या आठ अतिरेक्यांनी रचला व त्यात ते यशस्वी झाले. रामशंकर या तुरुंग रक्षकाची गळा चिरून हत्या केली. चादरीचा दोरासारखा वापर करून भिंतीवरूनच उड्या मारून सिमीचे हे अतिरेकी पसार झाले, पण भोपाळपासून जवळच पोलिसांनी त्यांना घेरले व ठार केले. प्रश्न आहे की, अतिरेकी चकमकीत मारले गेले म्हणून सरकारचे कौतुक करायचे, की तुरुंग फोडून अतिरेकी पळून गेले म्हणून सरकारवर फ़क्त टिका करायची?

कुचकामी सुरक्षा यंत्रणा व गुप्तचर विभाग

भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगात हे एव्हढे मोठे व वेगळेच कारस्थान शिजत असताना तेथील सुरक्षायंत्रणा, तेथील गुप्तहेर किंवा तत्सम यंत्रणा काय करीत होत्या?. कारण हा मोठा कट शिजत असल्याचा सुगावाच कुणाला लागू नये हे कसले द्योतक आहे? जेलमधून पळून जाण्यास यांना कोणी मदत केली याचा कसून तपास सुरू असून घरभेद्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत.या अक्षम्य हेळसांडीची चौकशी झालीच पाहिजे व सत्य लवकरात लवकर बाहेर येऊन दोषींना कठोर शासन होणे गरजेचे आहे.

हे आठही दहशतवादी ‘सिमी’चे आहेत व त्यांचे कारनामे राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात इतकी मोकळीक कोणी मिळवून दिली? बाहेरून त्यांना मदत झाली आहे व याबाबत माहिती मिळवण्यात आपली सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग कुचकामी ठरला आहे. भोपाळ तुरुंगात अनागोंदी होती, भिंती कमकुवत असल्याचे आता उघड झाले आहे हे गंभीरच आहे. भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान होते.

दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मध्य प्रदेश तुरुंग उपमहानिरीक्षक, भोपाळ मध्यवर्ती तुरुंग अधीक्षक, उपतुरुंग अधीक्षक आणि सहायक तुरुंग अधीक्षक या चार वरिष्ठ अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिकार्यांचे केवळ निलंबन करून भागणार नाही तर या घटनेच्या मुळाशी जाऊन त्याला खतपाणी घालणार्यांच्या मुसक्या आवळल्या तरच सर्वसामान्यांना शासनाबाबत विश्वास वाटू लागेल.

चौकशी होण्याआधीच दहशतवाद्यांना निरपराध ठरविण्याची स्पर्धा

अजून या घटनेची चौकशी होण्याआधीच, या भयंकर दहशतवाद्यांना निरपराध ठरविण्याचा चंग बांधल्यासारखी विधाने होत आहेत. जेल तोडून पळणारे अतिशय गंभीर गुन्हे करणारे आरोपी होते, दहशतवादी होते, हे न पाहता त्यांना चकमकीत पोलिसांनी ठार का मारले? असा प्रश्न विचारला जात आहे. जेल तोडून पळून जाताना या दहशतवाद्यांनी जेलमधील मारलेल्या पोलिस शिपाई रमाशंकर यांच्याबद्दल सहानुभूतीचा एकही शब्द तोंडातून निघत नाही. जेलमधून या आठ जणांना मुद्दाम सोडण्यात आले की काय? यांना दहशतवाद्यांचे समर्थकच म्हणावे लागेल! दहशतवादी मारले गेल्याबद्दल यांना दुःख होते. पोलिस शिपाई मारल्या गेल्याचे यांना दुःख नाही. अर्थात, ज्यांची मनोवृत्ती भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर ‘सर्जिकल अटॅक’ करून त्यांना ठार मारले, तर सैन्याला पुरावे मागण्याइतकी असेल, तर ते दहशतवाद्यांची बाजू घेणे साहजिकच आहे. २००८ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत अनेक निरपराध लोक मारले गेले होते. त्यामध्ये या भोपाळ जेल फोडणार्या आठ दहशतवाद्यांचा हात होता. खांडवा येथे जातीय दंगली घडवून अनेकांचे प्राण आणि मालमत्तेचे नुकसान करण्यात कारणीभूत असल्याचा यांच्यावर आरोप होता.

राजकारणातील दहशतवाद्यांचे समर्थक धोकादायक

निरपराध नागरिकांच्या रक्ताला चटावलेले तर अधिकच भयंकर गुन्हेगार असतात. ते हिंदू आहेत की मुसलमान, हे पाहून त्यांच्याशी व्यवहार करायचा नसतो. ते गुन्हेगार आहेत, जेल तोडून पळालेले आहेत, पोलिस शिपायाचा खून करून पळालेले आहेत, अशा खुनी गुन्हेगारांना दिसताक्षणी गोळी घातलीच पाहिजे. त्यांनी प्रत्युत्तर दिले की नाही, त्यांनी पोलिसांवर गोळी चालविली की नाही, असले प्रश्न उपस्थित करून काही राजकारणी जातीय खेळ खेळत आहेत. जेवढे हे सिमीचे दहशतवादी धोकादायक आणि दोषी आहेत त्यापेक्षाही जास्त त्यांचे हे राजकारणातील समर्थक धोकादायक आणि खतरनाक आहेत. हे देशाच्या सैन्यावर संशय घेतात, हे पोलिसांवर संशय घेतात, एवढेच नाही, तर हे पाकिस्तानी मीडिया आणि पाक सैन्यावर विश्वास ठेवतात, हे दहशतवाद्यांचा कैवार घेतात. यांना जनतेने संधी मिळताच अद्दल घडविली पाहिजे

आर्य चाणक्य याने सुमारे २५०० वर्षांपूर्वी सांगितले होते की, ज्या वेळेस देशातील गुंड, राजकीय नेते आणि बुद्धीजीवी अस्वस्थ होतील आणि कोणत्याही फूटकळ मुद्यांवरून आकांडतांडव करायला सुरूवात करतील तेव्हा त्या देशातील सरकार अत्यंत चांगले, लोककल्याणकारक असा जनताभिमुख कारभार करत आहे असे जनतेने बेमालूम समजावे. आर्य चाणक्याचे हे वक्तव्य सद्यपरिस्थितीला शंभर टक्के लागू होते आहे.

दहशतवादाला राजकीय हत्यार बनविणे गैर आहे. दहशतवाद व मानवाधिकार यांचे संतुलन कसे साधायचे? भोपाळची चकमक खरी असेल तर पोलिसांचे कौतुक केले पाहिजे आणि चमकम ‘बनावट’ असली तरी देशाविरुद्ध कट रचणारे व बॉम्ब बनवणारे लोक मारले गेले आहेत हे विसरू नये.अनावधाने झालेली चुक चकमकी सारख्या कारवायात माफ़ असते, पण जाणुन बुजुन घेतलेला निर्णय माफ़ केला जाउ नये.

मुख्यमंत्री चौहान यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहे.आरोप करणार्यांना आता न्यायालयीन चौकशी समीतीसमोर साक्ष देण्यात भाग पाड्ले पाहीजे.आशा करुया की या सगळ्या पैलुवर न्यायालयीन चौकशी समीती विचार करेल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..