बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे. तो लगेच दिसणारे चित्र काढण्याचा प्रयत्न करी. बाबू माझा शालेय जीवनामधील मित्र. परंतु गरिबी मुळे तो फक्त शालेय शिक्षणच पुरे करु शकला.
माझी आवड माझ्या स्वभावाची ठेवण ही बऱ्याच अंशी त्याच्याशी मिळती जुळती होती. म्हणून आमच्या दोघांचे बरेच सख्य जमले होते. तो स्वत: खूप कष्टाळू होता. इतरांचेही कामे करण्यात त्याला समाधान व आनंद मिळत होता. अभ्यासात फार हुशार नव्हता. परंतु सर्व सामान्य विद्यार्थी म्हणून शिस्तप्रिय व सुस्वभावी होता. त्याचे हस्ताक्षर चांगले होते. रांगोळ्या काढण्यात तरबेज होता. प्रत्येक घटनेमध्ये दिसणाऱ्या वेगळेपणात त्याचा दृष्टीकोन शास्त्रीय उकल करण्याच होता. असलेल्या ज्ञानाच्या मर्यादा, कदाचित त्याचा तर्कबुद्धीला बंधनकारक होत असाव्यात. एकदा गावी गारांचा पाऊस पडला. आम्ही अंगणात होतो. टप टप पडणाऱ्या गारा त्याने गोळा केल्या. माझ्या हातावर ठेवल्या. याला गारा का म्हटले, कळत नाही. हे बर्फाचे खडेच आहेत. ढग तर हवेचे वाफेचे असतात, त्यात पाणी असते. मग गारा कोठे बनतात.त्याला वेळ लागत असेल ना ? पाणी पडताना गारा बनतात कि वरच बनून जमिनीवर पडतात.” अशी प्रकारची अनेक प्रश्ने, त्याचा मनांत येत असत. आणि ते तो प्रकट करीत असे. इंद्र धनुषाचे रंग दाखविताना, त्याचे विश्लेषण करतना त्याला समाधान वाटत होते. बागेमधली उमललेली फुले बघताना, “ ही किती छोटी काळी, ही त्यापेक्षा मोठी, ही तर टपोरी काळी, हे बघ ही फुलण्याची क्रिया सुरु झालेली काळी, आणि हे पूर्ण ” उमललेले फुल. “ फुलांच्या उमलणाऱ्या क्रिया तो अतिशय बारकाव्याने बघत होता. निरीक्षण व वर्णन करण्यात त्याला आनंद होत असल्याचे जाणवत होते. परंतु फुले पाने वा काळ्या तोडण्यास त्याचा विरोद्ध असे. निसर्गाला त्याच्याच पद्धतीने फुलू द्या, सुगंध देऊ द्या व झाडावरच कोमेजून जाऊ द्या. ती नंतर जमिनीत जातील. “ हे त्याचे सांगणे असे. सहलीला गेलो असता, एक धबधब्याजवळ आम्ही उंचा वरून पाण्याचे पडणे बघत होतो. ” लक्ष दे, तू ऐकलस ते. पाणी पडण्याच आवाज कसा येतो बघ. सतत अधून मधून कमी जास्त, किती लयबद्ध, आणि पुन्हा त्याच प्रकारे चक्राप्रमाणे भासणारा. ए ही गमत बघ. कसे पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतात. आणि त्यावर पडलेल्या सूर्य किरनामुळे तेथेही आकाशात दिसणारे इंद्र धनुष्य दिसत आहे.” बाबू हे वर्णन तल्लीन होऊन करीत असे. फक्त हे घडले, असे दिसले, हाच त्याचा बघण्या बोलण्यातील आनंद दिसला. हे असे कां घडते ह्याचे शास्त्रीय कारण समजण्याची त्याची झेप दिसली नाही.
कोकिळेच्या मारलेल्या ताना, पक्षाचा चिवचिवाट वा कलकलाट , ऐकून तो माझेही लक्ष त्यांच्या आवाजाकडे देण्यास सुचवीत होता. पौर्णिमेचे चांदणे, थंडगार हवा हे त्याचे लक्ष खेचीत होते. त्यांचा मंजुळ आवाज ऐकून
” बघ ही हवा माझ्या कानात कांही तरी सांगत आहे. पण मला तिची भाषा येत नाही. “ तो हसायचा.
अझ्याक न्युटनने झाडावरून पडणाऱ्या फळाकडे बघीतले आणि जगाला गुरुत्वाकृष्णाचे ज्ञान मीळाले. जार्ज स्टीवन्सन याने गरम चहाची किटली व त्यावर वाफेमुळे हलणारे झाकण
बघीतले, आणि वाफेच्या शक्ती बद्दल शोध लावला. वाफेचे इंजिन बनविले. जगातले अनेक शोध फारसे शिक्षण न घेतलेल्या संशोधकांनी लावले. ते दैनंदिन निसर्ग बघत होते. असे का घडते ह्याची त्यांना उत्सुक्ता लागली. जगाला शोध कळले. बाबू हा देखील त्याच पठडीतला होता. समोरच्या प्रत्येक नैसर्गिक हालचालीमधला अविष्कार तो हेरत होता. त्याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. निसर्ग योजनांचा परिचय करून घेत होता. त्याची बाल वयातील चौकस बुद्धी, निसर्गाचे निरीक्षण, त्याचे कारण जाणण्याची जिज्ञासा विलक्षण होती. आज वाटते की त्याचात एक सुप्त शास्त्रज्ञ लपलेला होता. तो उफाळून बाहेर आला नाही.
हे बाबूचे नव्हे,- – तर जगाचे दुर्भाग्य नव्हे काय ? .
— डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply