नवीन लेखन...

“सूर “जुने”.. ध्यास नवा”

“रविवार सकाळ .. सुट्टीची .. त्याचा दिवसातला दूसरा चहा .. पेपर वाचत .. बॅकग्राऊंडला रेडियोवर बाबूजींचं गाणं … बारीक आवाजात .. “तुझे गीत गाण्या ss साठी सूर लावू ss देss रे !!

ती .. तिला न चुकलेल्या ओट्यापाशी .. खट-खट , खाट-खाट-फटाट .. नुसत्या लायटरच्या ठिणग्या …. गॅस पेटता पेटेना .. “जळला मेला हा गॅस .. किती दिवस झाले शेगडी खराब होऊन !!.. सगळ्यांचा रविवार .. माझे मात्र सगळे वार सारखेच !!” .. आता तिच्या ठिणग्या ..

तो स्थितप्रज्ञ .. बाहेरून .. “अगं !!.. ही जाहिरात आलीये बघ !!.. ऑडिशन आहे गाण्याची .. महिला विशेष ” .. “बरं !! मग मी काय करू ?????.. “ “अगं .. किती वर्ष झाली तुला गाणं सोडून.. चालू कर पुन्हा !!”

कप घ्यायला बाहेर आली .. तेव्हा वयोगट दिसला .. जाहिरातीतला .. “जरा वाचा नीट .. १५ ते ३० वय म्हंटलंय .. इथे पंचेचाळीशी पार झाली !!” .. शिट्टी न होणाऱ्या कुकरकडे बघत …वैतागून .. “मनाचं वय बघायला सांगू की परीक्षकांना .. त्यात तू फिट्ट बसतेयस .. मनानी विशीत .. हाहा !!.. “ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”..

“कितीss चिडचिड करशील ??.. “सूर नवा .. ध्यास नवा” ची जाहिरात आहे म्हणून म्हंटलं आपलं !!“ .. “इथे आत्ता माझ्या आयुष्यात .. “कुकर नवा .. गॅस नवा”.. जास्त महत्वाचा आहे मला .. आज सुट्टी आहे तर संध्याकाळी घेऊन येऊया .. रोजचा त्रास संपेल एकदाचा !!” ..

“हाहाहा .. “कुकर नवा.. गॅस नवा” .. हे बाकी आवडलंय आपल्याला .. पण कमाल आहे.. इतक्या रागाच्या भरातसुद्धा विनोदबुद्धी सॉलिड जागृत असते तुझी !!”.. “पुरे आता .. आंघोळ उरका .. मशीन लावून टाकते !!” .. “हो गं !! जातो .. जातो.. पण ते गाण्याचा विचार कर बरं का !! .. त्या स्पर्धा वगैरे होत रहातात .. त्यांना करूदे ते .. नवीन गायक घडतील .. त्यांचं भविष्य घडेल .. पण तुझ्यासारखीनी किमान आपलं गाणं सुरू ठेवावं .. जगासाठी किंवा स्पर्धेसाठी नाही .. स्वतःसाठी .. .. स्वतःच्या आनंदासाठी .. इथे आमची इच्छा असून काही उपयोग नाही .. ना गाता येतं ना कुठलं वाद्य ..पूर्वी शाळेत बेंच आणि आता ऑफिसात टेबल बडवण्यापर्यंतच मजल आमची .. नुसतेच कानसेन .. पण तुझी कला जोपास तू .. त्यासाठी फुल्ल सपोर्ट आपला !! .. बाथरूम मध्ये टॉवेल ठेवत एकीकडे हा हवा भरत होता..

“निघा आता .. आवरा sss !!” शेवटी संध्याकाळी खरेदी झाली .. कुकर आणि गॅस शेगडीची. दिवस मावळला ..

सूर्याच्या शेडयूलप्रमाणे दूसरा उजाडला .. तो ऑफिसमधून आल्यावर आवरून हॉलमध्ये .. निवांत .. नेहमीप्रमाणे .. चहाची वाट बघत .. आज आतमध्ये गॅस एका झटक्यात लागला होता .. बहुतेक कुकर सुद्धा ..

एकीकडे गाणं गुणगुणणं सुरू होतं .. “राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा ssss .. पुढे झक्कास “आलाप” … एकदम ओरिजिनलवानी ..

तिच्या आवाजात वेगळाच आनंद , उत्साह.. ते ऐकून “जाणता-अजाणता हृदयी प्रीत जागलीच ” .. अन् आपसूक हा स्वयंपाकघराच्या दिशेने खेचला गेला ..

इतक्यात कुकरची शिट्टी वाजली .. “बघ बघ .. तुझं गाणं ऐकून कुकरलाही राहावलं नाही .. हाहाह ss “काहीतरीच काय हो ?”.. एकदम भरभरून , मनमोकळं हसत .. “म्हणून सांगते .. व्हॉट्सअप वरचे जोक वाचू नका जास्त !!“..

स्वारी खुशीत होती आज .. लांबून नजर बेडरूम मधल्या टेबलावर गेली .. बऱ्याच वरच्या खणातला इलेक्ट्रॉनिक तबला-तानपुरा खाली आलेला दिसला .. युरेका !! युरेका !! तिच्या आनंदाचं कारण समजलं ..

“”बघ .. तुझ्या मनात खोल , या संसाररूपी मातीखाली दडलेल्या संगीताच्या-गाण्याच्या रोपट्यावर त्या कार्यक्रमाच्या जाहिरातरूपी पाण्याचे काही थेंब शिंपडले गेले तर त्याला लगेच अंकुर फुटला .. “स्वरांकुर” .. आता त्याला तुझ्या रियाजाचं नियमीत खतपाणी दे .. आणि मस्त बहरूदे हा “गानवृक्ष” !!

“अहो काय तुम्ही ?? .. किती ss अलंकारिक बोलताय आता .. उगाच ?” ..

“हेहेहे .. पण हे व्हॉट्सअप ज्ञान नाही हं !!.. माझं स्वतःचं क्रियेशन आहे . .. गमंत सोड पण खूप छान वाटलं बघ !!.. त्या कार्यक्रमात फायनल १५-२० जण भाग घेतील पण त्या निमित्ताने घराघरातलं असं “लुप्त” गाणं जर जिवंत झालं तर अशा कार्यक्रमांचे “सुप्त” फायदेच म्हणायचे की हे !!!”

“अगदी खरं आहे तुंमचं !!”

“तुझ्या अंतरी दडी मारून बसलेले “जुने सूर” पुनर्जिवित होण्यासाठी “नव्याने ध्यास” घेतलास !! अभिनंदन !!.. एकीकडे टीव्हीवर चालू दे .. महिला विशेष “सूर नवा ध्यास नवा”ss.. अन् दुसरीकडे तुझ्यासारख्यांचा घरच्याघरी ……… “सूर “जुने”.. ध्यास नवा”….

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..