डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी आणि श्रीमती गंगुबाई हनगल या तयार झाल्या, तर त्यानंतर पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे दिवंगत पं. ए. के. अभ्यंकर घडले. पं. ए. के. अभ्यंकर हे देशपरदेशात आपल्या गायकीमुळे सुप्रसिद्ध असे नाव. गेल्या आठवडय़ात पं. अभ्यंकरांचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला.
‘आपल्या शिष्याने आळविलेले सूर’ हीच खरी गुरुदक्षिणा असं मानणाऱया पं. अभ्यंकरांनी अनेक शिष्य घडवले. या शिष्यांपैकी हिंदुस्थानी शास्त्र्ीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात गुंतलेली आणि गुरू पं. अभ्यंकरांचा सुमारे ३५ वर्षांचा सहवास लाभलेली डॉ. वरदा गोडबोले ही एक संस्कारसंपन्न गायिका.
१६ मे २०१३3 रोजी मी पं. ए. के. अभ्यंकर ऊर्फ पं. अच्युत केशव अभ्यंकर यांच्या घरी गेलो होतो. पं. अभ्यंकर तेव्हा ७६ वर्षांचे होते. त्यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला कित्येक दशकांचा प्रवास तसच दिवेआगर ते ठाणे व्हाया गिरगाव या प्रवासात त्यांची नोकरी, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, घरातले सदस्य आणि त्यांचे शिष्य अशा सगळ्या विषयांवर आम्ही सुमारे दोन – अडीच तास गप्पा मारत होतो. या दिग्गज गायकासोबत बोलता बोलता मध्येच त्यांना थांबवत त्यांची काही पोर्ट्रेट मी टिपली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांची शिष्या डॉ. वरदा गोडबोले उत्तम करत असल्याची पावती खुद्द त्यांनीच मला दिली. याच विश्वासानं मी त्याच दिवशी डॉ. वरदा गोडबोले यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची वेळ घेऊन दुसऱयाच दिवशी त्यांच्या घरी पोहोचलो.
वयाच्या सातव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात गुंतून पुढे गांधर्व महाविद्यालयातून पहिल्या श्रेणीत संगीत अलंकार ही पदवी, तर त्यानंतर गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताचार्य परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान पटकावणाऱया डॉ. वरदा गोडबोले या अभ्यासू गायिका. डॉ. वरदा यांना गायनाची आवड बालपणापासून होतीच. मात्र त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. संगीतासोबतच अभ्यासाची प्रगतीही त्यांनी समांतर गाठली. कला शाखेतल्या संस्कृत विषयाच्या पदवी परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्वाधिक गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावणाऱया डॉ. वरदा यांनी हाच यशाचा आलेख कायम राखत मुंबई विद्यापीठाच्या एमए संगीताच्या परीक्षेतही सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला.
सुमारे दोन तास यशाचा हाच आलेख समजून घेत मी डॉ. वरदा गोडबोले यांचे पोर्ट्रेट टिपत होतो. यादरम्यान त्यांच्या गुरूंविषयी त्या बोलत होत्या. श्रीमती लीलाताई शेलारांकडून प्राथमिक शिक्षण तर त्यानंतर पं. अभ्यंकर यांच्याकडे किराणा घराण्याचं शिक्षण तब्बल बारा वर्षे घेतलं. पं. अभ्यंकरांकडच्या या बारा वर्षांत डॉ. वरदा यांच्या गायकीने आकार घेतल्याचं त्या मानतात. त्यानंतर आग्रा घराण्यातील पं. यशवंत महाले, ग्वाल्हेर घराण्यातील पं. मधुकरबुवा जोशी तसेच अजय पोहणकर आणि डॉ. सुशीलाताई पोहनकर यांच्याकडे पूर्ण केलं, तर माणिक वर्मा यांच्याकडे नाटय़ संगीताचा अभ्यास त्यांनी केला.
एरवी मॉडेल फोटोग्राफी करताना अनेक बाबी लक्षात घेऊन फोटो टिपण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र गायक, गायिका यांच्या फोटोच्या वेळी त्यांचे हावभाव हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यांच्या पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या चेहऱयाचा तजेलपणा, डोळ्यांतली चमक, कलेबाबत असलेली ओढ, त्या कलेशी असलेली निष्ठा आणि त्यातला प्रामाणिकपणा या सगळ्यांची एकूण जुळणी करत टिपलेलं पोर्ट्रेट हे उत्तमच येत. इथे एरवी लागणाऱया मेकअप, हेअर, कॉस्च्यूम या बाबी तशा गौण ठरतात. डॉ. वरदा यांचे मी त्यांच्या घरी त्यांच्या तंबोऱयासोबत टिपलेले पोर्ट्रेट हे याचंच उत्तम उदाहरण.
यानंतरही डॉ. वरदा गोडबोले यांचे फोटोशूट करण्याची संधी मला अनेकदा आली. संगीत मैफलीत प्रत्यक्ष फोटोदेखील टिपण्याची संधी मला लाभली. मैफलीत उपलब्ध लाईटचा वापर करत कँडिड फोटो मी टिपले, तर विविध माध्यमांसाठी स्टुडिओतही फोटोशूट करायला मला मिळालं. स्टुडिओत लाइटींच्या सहाय्यानं फोटो टिपताना काही तास मला घालवायला लागले होते. केवळ फोटोशूटकरिता पोझेस न देता डॉ. वरदा यांनी त्या स्टुडिओतही आपला रियाझ सुरू केला आणि मला त्या रियाझावेळी फोटो टिपायला सांगितले होते.
डॉ. वरदा यांचा संगीत प्रवास मला मधूनमधून समजत होता. शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाची शिदोरी आपल्याकडे जमा केल्यानंतर डॉ. वरदा यांनी देशभरात विविध ठिकाणी आपलं गायन सादर केलं, तर ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमातल्या ‘नाथ हा माझा…’ या लोकप्रिय गाण्याचा आवाजही डॉ. वरदा यांचा आहे. संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने डॉ. वरदा यांनी स्वरदायिनी ट्रस्टची स्थापना केली.
या संस्थेच्या अध्यक्षपदी पं. अभ्यंकर हे होते, तर डॉ. वरदा यांच्याकडे शिकायला येणाऱया शिष्यांसाठी तसेच गायन, कथ्थक आणि तबला यांचे शास्त्रोक्त धडे देण्यासाठी स्वरदा संगीतालयाची स्थापना केली. आज शेकडो विद्यार्थी या संगीतालयात शिकत आहेत हे विशेष. संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत विविध घराण्यांची गायकी त्याच ताकदीनं सादर करत आपल्याकडे असलेल्या संगीताचा गुणोत्तराने प्रचार आणि प्रसार करणाऱया डॉ. वरदा गोडबोले यांनी नव्या पिढीसमोर आपला स्वतःचा आदर्श घालून दिला आहे.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply