स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-thinkmaharashtara
सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराया गं माझा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखकनी तू विमला’
‘पद्ममनाथा नारायणा’
Leave a Reply